Thursday 24 August 2017

धुमकेतू ची दिवाळी - ययाती उल्कावर्षाव... विनीत वर्तक

आज सकाळ पासून धुमकेतू च्या खगोलीय दिवाळीची सुरवात झाली. ययाती तारकासमुहात ईशान्य आकाशात अंदाजे एकावेळी ५०-१०० च्या आसपास उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून नष्ट होतील. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतराला होणारी हि दिवाळी म्हणजे स्विफ्ट टटल धुमकेतू ने मागे ठेवलेल्या धुळीचा भाग होय. धुमकेतू नेहमीच माणसाला आकर्षित करत आलेले आहेत. अगदी काही शेकडो वर्षांपासून धुमकेतू बघितल्याच्या नोंदी अनेक संस्कृतीत मिळतात. कुठून येतात हे धुमकेतू? त्यांची कक्षा तसेच त्यांचा पृथ्वीला काय धोका हे जाणून घेण खूपच सुंदर आहे.
धुमकेतू म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झाल तर सुटलेले खडक. हे धुमकेतू क्यूपर बेल्ट आणि ओर्ट क्लावूड मध्ये तयार होऊन आपल्या अथांग पसरलेल्या विश्वाच्या पसाऱ्यात हे अगदी एकला चलो रे करत विहार करत असतात. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येताच त्याच्याकडे आकर्षित होतात. सूर्याच्या उष्णतेमुळे गरम होऊन आपल्या पाठीमागे अनेक वायू सोडतात. ह्या वायूंमुळे जो दिसणारा भाग तयार होतो तो म्हणजे कोमा. म्हाताऱ्या स्त्रीने मोकळ्या सोडलेल्या पांढऱ्या केसांप्रमाणे वाटणारा हा कोमा पृथ्वीच्या परीघापेक्षा १५ पट लांब पसरलेला असू शकतो. खरा धुमकेतू काही मीटर ते किलोमीटर चा असला तरीपण ह्या कोमामुळे तो आकाशात चटकन उघड्या डोळ्यांनी दिसून येतो. सोलार रेडियेशन आणि सोलर विंड ह्यामुळे कोमा तयार होतो. त्याची शेपटी म्हणजेच कोमा नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेने असते. ह्यात मूलतः पाणी आणि धूळ असते. सूर्याच्या जवळ येताना ह्या कोमा चा आकार प्रचंड वाढतो. परावर्तीत होणारा प्रकाश आणि आयोनायझेशन मुळे धुमकेतू ला त्याचा प्रकाश प्राप्त होतो.
धुमकेतू हे लंब गोलाकार कक्षेत फिरतात. ह्यांची कक्षा काही वर्षांपासून कित्येक मिलियन वर्षांपर्यंत असू शकते. उदाहरण द्यायचं झालच तर ह्याले धुमकेतू चा कालावधी ७६ वर्षांचा आहे. तर ह्याकुटेक ह्या धुमकेतू चा कालावधी ७०,००० वर्षांचा आहे. ह्याचा अर्थ इतके वर्षानंतर हे धुमकेतू विश्वाची सफर करून पुन्हा सूर्यमालेच्या कक्षेत प्रवेश करतील. आता इकडे मुख्य प्रश्न येतो तो म्हणजे ह्या सगळ्याचा पृथ्वी शी काय संबंध? सौरमालेतून जाताना समजा ह्या अश्या धूमकेतूंचा रस्ता आणि पृथ्वीचा रस्ता एकत्र झाला तर? ह्या जर तर ची उत्तरे आपण प्रत्येक सेकंदाला आजही शोधत आहोत. मानवाची विज्ञानातील प्रगती गेल्या ३००-४०० वर्षातील आहे. तर धुमकेतू ७०,००० वर्षाच्या कक्षेतून येत आहेत. त्यामुळे कोण कधी भेट देईल ह्याबद्दल आपण शाश्वत अस काहीच सांगू शकत नाही. तसेच ह्या कक्षा अवलंबून असतात त्या गुरुत्वीय आकर्षणावर. त्यामुळे त्यांच्या काक्षांबद्दल अगदी अचूक गणित मांडणे सोप्पे नसते.
एखादा ग्रह, तारा मध्ये आला तर धुमकेतूच्या ह्या कक्षा बदलू शकतात म्हणूनच आपली पृथ्वी जिवंत आहे. गुरु सारखा ग्रह आपल्या प्रचंड ताकदीच्या गुरुत्वाकर्षण बळावर असे छोटे,मोठे धुमकेतू स्वतः गिळंकृत करत आलेला आहे. एका अभ्यासाप्रमाणे जर गुरु ग्रहावर आदळणाऱ्या धुमकेतू, अशनी ह्याचं प्रमाण ८००० पट पृथ्वीपेक्षा जास्त आहे. ह्यावरून गुरु ग्रहाने अवकाशात व्ह्याक्युम क्लीनर चा भाग निभावल्याने पृथ्वीवर आपण शांत झोपू शकतो. १६-२२ जुलै १९९४ रोजी गुरु ने असाच एक शूमेकर लेव्ही-९ नावाचा धुमकेतू गिळंकृत केला होता. जर असा अपघात झाला नाही तर धुमकेतू गेल्यानंतर त्या रस्त्यात पाठीमागे राहिलेले असंख्य छोटे छोटे तुकडे, धूळ हि अवकाशात तशीच रहाते. जरी पृथ्वी त्या भागात त्याच वेळी नसली तरी तिच्या कक्षेच्या आसपास धुमकेतू चा मार्ग गेला असेल तर? किंवा पृथ्वी नंतर त्या भागात आली तर? त्या तर च उत्तर म्हणजे खगोलीय दिवाळी.
स्विफ्ट टटल हा असाच एक धुमकेतू पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून सौरमालेला दर १३३ वर्षांनी भेट देतो. गेल्यावेळी १९९२ साली तो आपल्या सौरमालेतून गेला. २६ किमी च डोक असलेला हा धुमकेतू ५८ किमी/ सेकंद वेगाने विश्वात फिरत असून २१२६ साली हा धुमकेतू पृथ्वीला टक्कर मारेल असा एक शोध समोर आला होता. समजा हि टक्कर झालीच तर डायनासोर ला नष्ट करणाऱ्या अशनी च्या टक्करी पेक्षा ३०० पट अतिसंहारक असेल अस शास्त्रज्ञांना वाटते. पण अजून काही शोधानंतर अशी शक्यता नसल्याच नासा ने जाहीर केल आहे. तर ह्या स्विफ्ट टटल ने मागच्या वेळी जाताना आपल्या मागे सोडलेल्या कचऱ्याचा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश म्हणजेच ययाती उल्कावर्षाव. दरवर्षी पृथ्वी जेव्हा ह्या भागात येते त्यावेळी मागे राहिलेल्या कचऱ्यातील काही भाग पृथ्वीच्या गुरुत्वाकार्षाणामुळे पृथ्वीच्या कक्षेत ओढला जातो. वातावरणाशी होणाऱ्या घर्षणामुळे रात्रीच्या अंधारात ह्या उल्का अगदी शेकडोच्या संखेने पृथ्वीकडे झेपावतात. मग जमिनीवरून दिसते ती खगोलीय दिवाळी. दरवर्षी होणाऱ्या ह्या दिवाळीसाठी शहराबाहेर जाऊन आनंद लुटण्याची तयारी किती जण करतात हा संशोधनाचा विषय आहे. कारण आपली दिवाळी फक्त प्रदूषणापुरती आणि आवजापुरती मर्यादित असल्याने निसर्गाची दिवाळी आम्हाला लक्षात हि नसते हीच आमच्या पिढीची शोकांतिका आहे.

No comments:

Post a Comment