Thursday, 24 August 2017

१८० दिवसांसाठी ठरलेली १००० दिवसांची सफर... विनीत वर्तक

१८० दिवसांसाठी ठरलेली १००० दिवसांची सफर... विनीत वर्तक

जेव्हा भारताने अवकाशात आपल्या कक्षा रुंदावायला सुरूवात केली, त्यावेळेस चंद्र हा पहिलं लक्ष्य होतं. चंद्रावर तिरंगा रोवताच भारताने आपलं पुढलं लक्ष ठरवलं, ते म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ मोहीम चंद्रमोहिमेपेक्षा खूप वेगळी होती. यावेळेस एक उपग्रह मंगळावर पाठवून मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास आणि त्याची काही छायाचित्र घेता येईल अशी साधी उपकरण त्यात बसवली होती. कारण तिकडे पोहोचणं म्हणजेच एक रॉकेट विज्ञान होतं. पाण्यात पहिल्यांदा सूर मारताना आपण बॅकस्ट्रोक आणि किती वेळात अंतर कापू याचा विचार नाही करत, आपलं लक्ष्य असतं, पोहायला यायला हवं. भारताचं लक्ष्य तेच होतं, कसंही करून मंगळाच्या कक्षेत उपग्रह पाठवणं. म्हणूनच १८० दिवस पुरेल इतकं इंधन आणि उपग्रहांच्या उपकरणांचं आयुष्य गृहीत धरलं गेलं. पण काळाच्या मनात वेगळंच होतं. १९ जून, २०१७ रोजी भारताच्या 'मॉम'ने, तब्बल १००० दिवस मंगळाच्या कक्षेत पूर्ण केले असून आजही त्यावरील उपकरणे पूर्ण क्षमतेने काम करत आहेत.

आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत उपग्रह स्थापन करणारा भारत जगातील पहिला देश तर ठरलाच, पण मंगळावर चीन, जपानसारख्या तगड्या स्पर्धकांना मात देत तिथवर पोचणारा पहिला आशिया खंडातील देश ठरला. 'मॉम' मोहिमेने अनेक रेकॉर्ड तोडले व काही नवीन रेकॉर्डही घडवले जे की नजीकच्या भविष्यात तुटणं अवघड दिसत आहे. ४५० कोटी रुपयांच्या खर्चासह 'मॉम' मोहीम जगातील सर्वांत स्वस्त इंटर प्लॅनेटरी मोहीम आहे. नुसत्या खर्चापलीकडेही या मोहिमेला अनेक गोष्टींसाठी जगात नावाजलं गेलं, ते म्हणजे कमीत कमी खर्चात आखलेली मोहीम, कोणत्याही मोहिमेचं आकलन, प्लॅनिंग आणि त्याची अंमलबजावणी कमीत कमी वेळात. या मोहिमेने इंटर प्लॅनेटरी मिशनचा खर्च कित्येक देशांच्या आवाक्यात आणला. त्यामुळेच येत्या काळात भारताच्या मदतीने यु.ए.ई.सारखे देश मंगळावर जाण्याची स्वप्नं बघत आहेत.

'मॉम' वरील उपकरणं काय करत आहेत? तर मॉमच्या कॅमेराने आत्तापर्यंत ७१५ पेक्षा जास्ती मंगळाचे फोटो भारताकडे पाठवून दिले आहेत. हे फोटो मंगळाच्या विविध भागांतून तसेच विविध कालखंडात घेतलेले आहेत. यांवरील बाकीच्या उपकरणांनी गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण चालू आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे, की कोणताही शोध लागण्याआधी मिळालेली माहिती अनेक वेळा तपासून बघावी लागते. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने चूक कि बरोबर हे तपासून बघावं लागतं. मगच तो शोध म्हणून मान्यता पावतो. त्यामुळे एखादा शोध नाही लागला, तरी या उपकरणांनी मंगळ ग्रहाच्या आपल्याला माहीत असलेल्या माहितीत खूप भर टाकली आहे यात शंका नाही.

इस्रोने या मोहिमेची आखणी आणि प्रत्यक्ष उपग्रहाची रचना इतकी चोख केली आहे, की इस्रोचे अध्यक्ष ए.एस.किरणकुमार यांच्या मते 'मॉम' अजून कित्येक वर्षं मंगळाभोवती फिरत राहील. अजूनही 'मॉम'वर ३० किलोग्राम इतके इंधन शिल्लक आहे. वर्षाला २ किलोग्राम याप्रमाणे जरी इंधन लागलं तरी त्याचं आयुष्य एक साधा माणूस पण काढू शकेल. पण इस्रो इकडे किती हे सांगत नाही, कारण जो उपग्रह १८० दिवसांसाठी बनवला होता, त्याने १००० दिवसांचा परतावा आधीच दिला आहे. आता जे काही मिळेल तो बोनस आहे. बोनस किती वर्षं चालेल, ते मोजण्यापेक्षा त्याचे फायदे आपण घेणं हेच महत्वाचं.

आपल आयुष्य संपून गेल्यानंतर सुद्धा 'मॉम'ने जून २ ते जुलै २ २०१५ या काळात ब्लॅकआउट फेजमधून ते यशस्वीपणे बाहेर आलं. मे १८ ते ३० मे २०१६ या काळात व्हाईटआउट फेजमधून यशस्वीरित्या बाहेर आलं. ब्लॅकआउट फेज म्हणजे सूर्याची किरणे सोलार पॅनेलवर न पडल्यामुळे उर्जा निर्मिती बंद होते. या काळात 'मॉम'च्या कम्प्युटरने सगळी उपकरणं बंद करून मंगळाभोवती प्रवास फक्त बॅटरीच्या मदतीने चालू ठेवला. माणसाला व्हेन्टीलेटरवर ठेवल्यावर जी अवस्था असते, तीच ही होती. फक्त श्वास चालू तर इकडे प्रवास. या फेजनंतर उर्जा मिळताच पुन्हा उपकरणं सुरु करून त्यावरून माहितीचा शोध मंगळावर चालू झाला. दुसरी फेज व्हाइटआउट, यात सूर्य आणि मंगळ ह्यामध्ये पृथ्वी आल्याने सोलार रेडिएशनमुळे पृथ्वीशी संपर्क करणं यानाला शक्य नव्हतं. या काळात 'मॉम'च्या कम्प्युटरने सर्व सूत्रं आपल्या हातात ठेवून 'मॉम'चा प्रवास आणि उपकरणांची माहिती जमा करणं असं अखंडितपणे सुरु ठेवलं.

इकडे हे खूप महत्वाचं आहे, की असा उपग्रह आणि त्याची उपकरणं तयार करणं, की जी अवकाशाच्या निर्वात पोकळीतही आपलं ठरवलेलं कार्य सुरू ठेवतील. असं इंजिन तयार करणं,  की जे १००० दिवसांनंतर पण शांत राहून पुन्हा न धक्का मारता स्टार्ट होईल,  हे खूप अद्भुत असंच आहे. 'मॉम' काय शोध लावेल, हा पुढचा भाग, पण असा उपग्रह त्यावरील उपकरणं आणि त्यावरील त्याला जिवंत ठेवणारी व्यवस्था निर्माण करून १८० दिवसांचा ठरवलेला प्रवास, जेव्हा १००० दिवस ते करते,  तेव्हा त्या मागच्या सचोटीसाठी, मेहनतीसाठी आणि अभियांत्रिकीसाठी उभं राहून सॅलुट ठोकण्यापलीकडे निदान मी तरी अजून काही करू शकत नाही.

No comments:

Post a Comment