Thursday, 24 August 2017

नऊ यार्डाची म्यारेथॉन... विनीत वर्तक

आत्महत्येच्या घटना ऐकून आणि अनेकांनी त्यावर लिहिलेलं बघून आयुष्य इतक कठीण असत का मला वाटायला लागल होत? इतके कठीण प्रश्न असतात कि जीवन संपवण हा उपाय शिल्लक असतो फक्त समोर. यशाची धुंदी आणि स्वतःला सिद्ध करण्यात आलेल अपयश परीक्षेतल्या मार्कांवर आणि नोकरीत मिळालेल्या पगारावर अवलंबून असते का? गोठलेल्या भावना आणि हरवत चाललेली माणुसकी ह्या सर्वात आपण खरी प्रगती केली का? असाच विचार मनात घोळत होता. त्या वेळेस एका जुन्या गोष्टीने लक्ष वेधल ते म्हणजे नऊ यार्डाची म्यारेथॉन.
म्यारेथॉन ती हि नऊ यार्डाची? तर हि गोष्ट आहे आयुष्य जगायला शिकवणाऱ्या एका गरीब स्त्रीची. उच्च विद्याविभूषित म्हणून जो काही माज, सन्मान आपण बाळगतो न त्या शिक्षणाने न शिकवलेला एक धडा ह्या मातेने आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे. काही लोकांनी त्यांच्या बद्दल वाचल असेल हि. पण त्यांच्या कडून शिकण्यासारख खूप काही आहे. त्या आहेत लता भगवान करे. गरीब शेतकरी असलेल्या ह्या मातेने आपल्या नऊ यार्डाच्या नउ वारी साडीत, अनवाणी म्यारेथॉन जिंकण्याचा वयाच्या ६१ वर्षी भिम पराक्रम केला आहे. ह्याच्या अर्ध्या वयात सुटलेले पोट, वाढलेले वजन, थोड चालून वय झाल म्हणणाऱ्या सो कॉल्ड आधुनिक स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या विचारसरणीला सणसणून थोबाडीत मारली आहे.
आपल्या नवऱ्याच्या आजारासाठी पैसे हवेत म्हणून जीवाच्या आकांताने धावणाऱ्या माउलीने स्पोर्ट्स शूज, ट्रयाक प्यांट घालून धावणाऱ्या अनेकांना लाजवेल ह्या चपळाईने म्यारेथॉन जिंकली आहे. एकदा नाही तर तब्बल तीन वेळा प्रौढ वयाच्या गटात धावताना वयाच्या ६७ वर्षी सुद्धा नऊ यार्डाची म्यारेथॉन जिंकली आहे. रुपये ५००० च बक्षीस ज्याने आपल्या नवऱ्याच्या औषधांचा खर्च निदान थोडा का होईना भागेल ह्या आशेने धावणाऱ्या ह्या माउली पुढे मी तरी नतमस्तक आहे.
आयुष्य म्हणजे काय तर हेच मी सांगेन. संपवण हा उपाय नाही तर जे आहे त्याला सगळ्या नियमांना तोडत स्वतःला सिद्ध करण हेच तर जीवन आहे. जाताना काही घेऊन जाणार नाही पण घेऊन जाऊ त्या ह्या आयुष्याच्या आठवणी आणि ठेवून जाऊ ते पुढल्या अनेक पिढीला आपल्या जिद्दीची कहाणी. नऊ यार्डाची म्यारेथॉन महत्वाची नाही. महत्वाची आहे ती वृत्ती. अनेक संकटात सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची मनीषा. पडलो तरी पुन्हा उभ राहून नेटाने सामना करण्याची प्रवृत्ती. वय, आपली जात, धर्म, आपल शिक्षण, आपल स्टेटस ह्या पलीकडे आपण आपल्या स्व ला दिलेली शक्ती.
लता करे नऊ यार्डाची म्यारेथॉन धावल्या तेव्हा जिंकण्यापलीकडे पर्याय नव्हता. नवऱ्याला औषध हवी असतील तर तो कप आपल्या हातात असायला हवा. ह्या साठी समोर एकच लक्ष्य. आयुष्य त्यांना हि संपवता आल असत. आयुष्यापुढे त्या हि हतबल होत्याच कि साध एम.आर.आय. काढायला पैसे नसणाऱ्या ह्या माउलीपेक्षा तुमची आमची स्थिती आयुष्याच्या कोणत्याही क्षणी चांगलीच आहे आणि असेल. मग एक माउली वयाच्या ६१ वर्षी आयुष्यापुढे हरायचं नाकारते मग तुम्ही आम्ही तर कोसो लांब आहोत. आयुष्यात कितीही पडला तरी पुन्हा उभ रहाता येते. नक्कीच सगळ्याच लता करे नसतील. पण त्यांची वृत्ती तर आपण नक्कीच शिकू शकतो.
गेल्या महिन्यात फेसबुक वरील एकाची आत्महत्या तसेच म्हसकर कुटुंबाच्या घरातील आत्महत्या ह्यावरून पुन्हा एकदा कुठेतरी आयुष्य आता हरते कि काय असच वाटत होत. सतत त्या बातम्या वाचून मला हळहळ वाटण्यापेक्षा चीड येत होती. एका अंड्याच्या आणि स्पम च्या मिलनातून सुरु झालेला प्रवास खरच इतक्या सोप्प्या रीतीने संपवता येतो? खरच आयुष्य इतक कठीण आहे? खरच आपण हरलो का? तेव्हा लता करे माउलींची आठवण झाली. त्यांच्या ह्या जिद्दीची आणि आयुष्याला कलाटणी दिलेल्या प्रवासाची नोंद त्या काळी बी.बी.सी. ने हि घेतली होती. कारण जगाच्या कोणत्या कोपऱ्यात नऊ यार्डाची म्यारेथॉन अजून कोणीच धावत नाही. पण आपण जगभरच्या बातम्या वाचताना आपल्या घरात मात्र डोकावून बघत नाही.
नऊ यार्डाची म्यारेथॉन माझ्यासाठी तरी नेहमीच आदर्श असेल. जेव्हा जेव्हा आळस येईल, जेव्हा जेव्हा मी पडेन, जेव्हा जेव्हा मी हरेन, जेव्हा जेव्हा आयुष्य नकोस वाटेल तेव्हा तेव्हा हि नऊ यार्डाची म्यारेथॉन मला आयुष्याची म्यारेथॉन धावायला नेहमीच उद्युक्त करेल ह्यात शंका नाही. त्या माउलीस माझा साष्टांग दंडवत.

No comments:

Post a Comment