Thursday 24 August 2017

एफ १६ मेड इन इंडिया??... विनीत वर्तक

आजच्या अनेक पेपरात एफ १६ हे जगातील नावाजलेल आणि अत्याधुनिक लढाऊ विमान भारतात बनणार अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. गोष्टी ची बातमी करताना त्याला ग्लोरिफाय करण्यात मिडीयाचा हात कोणी धरू शकत नाही. कारण शब्द कसे फिरवले कि त्याला प्रसिद्धी मिळते ह्यात सगळीच मिडिया चतुर आहे. काल प्यारीस एअर शो मध्ये लॉकहिड मार्टिन आणि टाटा एडव्हांस सिस्टीम ह्यात करार झाला. करार काय आहे कि जर एफ १६ भारताने विकत घेतल ते पण १०० च्या आसपास तर लॉकहिड मार्टिन ते मेक इन इंडिया द्वारे भारतात बनवणार. भारतात बनवण्यासाठी त्यांना एका सहकाऱ्याची गरज होती. तो सहकारी टाटा च्या रुपात भेटल्याची हि घोषणा होती.
एफ-१६ हे सुपरसॉनिक मल्टीरोल फायटर लढाऊ विमान आहे. कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक स्थितीमध्ये हे विमान अतिशय उत्कृष्ठ कामगिरी करू शकते. १९७६ पासून ह्या विमानाची निर्मिती सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत जगात ४५०० पेक्षा जास्ती विमान जगातील २५ पेक्षा जास्त देशात विकली गेली आहेत. ज्यात पाकिस्तान चा हि समावेश आहे. अमेरिकेने ह्या विमानाची ऑर्डर कधीच थांबवली असूनसुद्धा ह्याच्या कामगिरी मुळे ह्याला जगात मागणी आहे. जगात वापरत असलेल्या लढाऊ विमानाच्या संखेंत हे विमान आजही दुसऱ्या स्थानावर आहे. हे विमान स्वस्त ठेवण्यासाठी ह्याची निर्मिती करताना ८०% अल्युमिनियम अलोय, ८% स्टील, ३% कम्पोझीत्स, १.५% टायटेनियम वापरल गेल आहे. अस असूनसुद्धा हे विमान ९ जी फोर्स निर्माण करणाऱ्या हवेतील कसरती करणार जगातील पाहिलं लढाऊ विमान होत. हे विमान २ माख (२१२० किमी/ तास ) वेगाने उड्डाण भरण्यास सक्षम आहे.
भारताला अचानक एफ १६ ची गरज का पडावी आणि लॉकहिड मार्टिन ला अचानक टाटा सारखा सहकारी शोधण्याची गरज का पडावी ह्या मागच अर्थकारण आणि पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. भारताने काही वर्षापूर्वी एम.एम.आर.सी.ए अशी १२६ लढाऊ विमान घेण्याची निविदा काढली होती. जी डसाल्ट राफेल ने जिंकली. पण किंमतीवरून एकमत न झाल्याने हा सौदा फेटाळला गेला. त्यानंतर भारताने ५९,००० कोटी रुपयांना ३६ राफेल विमान उड्डाण भरणाच्या स्थितीत घेण्याचा सौदा केला. अस असल तरी भारताच्या वायूदलाकडे लढाऊ विमानांची संख्या कमी आहे. ४२-४४ स्क्वार्डन ची गरज असताना भारताकडे फक्त ३२ स्क्वार्डन आहेत. म्हणून हि संख्या वाढवण्यासाठी भारताला तातडीने विमानांची गरज आहे. ह्या स्पर्धेत असणारी सगळी विमाने हि दोन इंजिन असणारी होती. उदा. राफेल, टायफून, मिग -३५. फक्त एफ १६ आणि ग्रीपेन हि दोनच विमान सिंगल इंजिन होती.
राफेल आणि सुखोई एम के आय ३० सारखी पहिल्या फळीतील विमान घेतल्यावर भारताच लक्ष आता दुसऱ्या फळीतील विमानांकडे आहे. इकडे दोन इंजिनान पेक्षा सिंगल इंजिन असणारी लढाऊ विमाने स्वस्त पण त्याच वेळी शत्रूला रोखण्यास सक्षम अशी असणे गरजेचे आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात भारताला जवळपास २०० दुसऱ्या फळीतील लढाऊ विमानांची गरज भासणार आहे. हा सौदा कित्येक बिलियन डॉलर चा असणार आहे. मेक इन इंडिया हा त्यातला महत्वाचा घटक असल्याने कालचा सौदा खूप महत्वाचा असणार आहे. टाटा सारखा ब्रांड आणि लॉकहिड मार्टिन च तंत्रज्ञान ह्याकडे खूप आशेने बघितलं जाईल. जर भारताने अशी विमान खरेदी करण्याचा सौदा केला तर ती एफ १६ च्या ब्लॉक ७० ची असणार आहे. ह्या ब्लॉक मधील विमानात अजून काही विशेष प्रणाली जोडण्यात आल्या आहेत. जश्या APG-83 AESA रडार, Central Pedestal Display (CPD), Automatic Ground Collision Avoidance System (Auto GCAS) ह्या अश्या अनेक प्रणालीमुळे एफ १६ च्या ताकदीत कमालीची वाढ झाली आहे.
एफ १६ भारत घेईल किंवा अश्या प्रकारचा सौदा कागदावर जवळच्या भविष्यात नसला तरी मार्केट चा अंदाज घेऊन लॉकहिड मार्टिन ने पावल उचलली आहेत. कारण एफ १६ बरोबर ग्रीपेन हि रिंगणात आहे. आपण विचार करू कि तेजस सारख विमान असताना एफ १६ ची गरज का? तर तेजस प्रकल्प खूप हळू चालू आहे. तसेच तेजस ने युध्यात भाग घेतलेला नाही. तसेच त्याचे अपघात, त्याची कागदावरची वैशिष्ठे ह्या सर्वांचा खऱ्या युद्धात उपयोग अजून दिसायला वेळ लागेल. त्याच वेळेस जगात आत्ता ३२०० पेक्षा जास्ती एफ १६ हि २५ पेक्षा जास्त देशात उड्डाण भरत आहेत. एकाच विमानावर सगळी भिस्त न ठेवता त्याला सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या विमानांची जोड हे कोणत्याही हवाई दलाच सामर्थ्य असते. म्हणजे एखाद विमान निष्प्रभ ठरल किंवा काही तांत्रिक दोष निघाले तरी तुमच रक्षण करण्याची जबाबदारी दुसर लढाऊ विमान पेलू शकत. त्यामुळेच एफ १६ मेड इन इंडिया होईल का नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण जगातील सगळ्यात जास्त आयुध बनवणारी कंपनी आणि भारताचा सगळ्यात भरवश्याचा ब्रांड म्हणजेच टाटा ह्या दोघातील हे सहकार्य संधीची अनेक दार उघडेल ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment