चौकटीपलीकडची नाती... विनीत वर्तक
अनेकदा आपण आयुष्यात अश्या लोकांना भेटतो, की जिकडे अश्या लोकांना आपण समाजाने आखलेल्या चौकटीत बसवू शकत नाही. एखाद्या प्रवासातलं नातं असो वा फेसबुकवरून लाईकने सुरू होणारं नातं असो. मित्र, मैत्रीण, भाऊ, बहिण, प्रियकर, प्रेयसी किंवा अगदी नवरा, बायको या समाजाने आखलेल्या चौकटीत अशी नाती बसत नाहीत. काही वर्षं आधी प्रवास हे असंच एक ठिकाण होतं, जिकडे अशी नाती होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असायची. पण माहिती तंत्रज्ञानाच्या काळात फेसबुक आणि व्हाट्सअपमुळे चौकटीबाहेरची नाती जास्त निर्माण होऊ लागली.
काही तासांचं एकत्र येणं असो, वा प्रत्यक्ष बघण्यापलीकडे शहर, राज्य, देश यांच्या सीमा धूसर करत इंटरनेटच्या पडद्यातून एकत्र आलेले ते क्षण असो. आपल्या आयुष्यात या नात्यांना नकळत खूप महत्व असतं. असं काय असतं, की जे आपल्याला प्रत्यक्ष आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांकडून मिळत नाही? पण अशी धूसर नाती, ते आपल्याला एका भेटीत किंवा किंवा न भेटताही खूप काही देऊन जातात. काही वेळा ती टिकतात, बहरतात आणि कोमेजतात पण. अनेक वेळा आयुष्यभर साथ देतात, तशीच मुक्त आणि अपरिचित राहून. तर कधी फुलपाखरासारखी उडून जातात, हातावर रंग ठेवून.
अनेकदा यांना बसवण्यासाठी चौकट मिळत नाही, कारण आपण ती व्यक्तच करू शकत नाही. कधी कोणी आपल्याला विचारलं, की नक्की काय वाटतं, तर आपण सांगूही शकत नाही. म्हणूनच चौकटीत अश्या नात्यांना बसवणं एकतर त्यांचा आत्मा हिरावून घेतं, किंवा तोडून तरी टाकतं. मैत्र आणि प्रेम यांत बरंच अंतर आहे. मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडेही भावना असू शकतात. आपल्याला वाटणारं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा एकतर्फी पण असूच शकतो. तो अव्यक्तही असू शकतो. त्याला कारणे अनेक असतील. समाजाचा धाक असेल, दुसऱ्या नात्यातील कमिटमेंट असेल किंवा व्यक्त केल्यावर होणारे परिणाम असतील. पण ओढूनताणून ती नाती या नाहीतर त्या चौकटीत बसवताना दमछाक तर होतेच, पण त्या नात्यांचा आत्मा नक्कीच हरवतो.
नातं जर तितकंच मजबूत असेल, तर भावना पोहोचायला शब्दांची गरज नसते. न बोलतासुद्धा बरंच काही समोरच्यापर्यंत पोहोचत असतंच. प्रत्येक वेळी त्याला शब्दांच्या सोबतीची गरज नसतेच. म्हणून चौकटीच्या पलीकडेच ही नाती जास्ती खुलतात. किंबहुना चौकटीचा पिंजरा बाजूला केला, तर त्यातून मिळणारं स्वातंत्र्य हाच तर खरा त्यांचा जीव असतो. अनेकदा नकळतपणे आपण त्यांना पिंजऱ्यात बसवायला निघतो. घाबरतो, की अरे नक्की हे स्वातंत्र्य आपल्याला कुठवर घेऊन जाणार? याचे काही वाईट परिणाम तर नाही ना होणार? कोणी काय विचारलं तर मी काय सांगू? असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालतात. मग सुरु होतो तो प्रवास, ज्याचा शेवट ते नातं गुदमरेल तिथवर येऊन पोहचतो. इकडे मी एकतर्फी नात्यांबद्दल बोलत नाही, कारण त्यात भावना एकाच टोकाकडून असतात. पण जिकडे भावना दोन्ही टोकांकडून अश्या स्वतंत्र असतात, त्यात ते पिंजऱ्यात अडकवणं हे त्याचा शेवट ठरतं.
सगळ्याच गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. ते क्षण आणि ते अनुभव आपण जपायचे असतात. ते जपले की नातं पण आपसूक जपलंच जातं. मित्र/मैत्रीण का प्रियकर/प्रेयसी अश्या चौकटी निर्माण करताना त्याची व्याख्या काय हेच आपल्याला माहीत नसते, कारण ती खूपच सापेक्ष असते. एखाद्यासाठी ती भावनिक गुंतवणुकीवर अवलंबून असेल, तर कोणासाठी शारीरिक संबंधांवर, तर कोणासाठी प्रत्यक्ष भेटीवर किंवा कोणासाठी सोबतीवर. मग इतक्या वेगवेगळ्या सापेक्ष कल्पना असताना, आपण चौकटीची मांडणी कशी करणार आहोत? त्या मांडणीत बसवल्यावर जर आपल्या इच्छेला आणि निर्माण होणाऱ्या भावनांना मुरड घालणं हाच एक उद्देश असेल, तर मग त्यासाठी चौकटींची खरंच गरज आहे का? कारण चौकटीत न बसवतासुद्धा एकमेकांच्या भावनांचा, इच्छेंचा योग्य तो मान राखत ते नातं चौकटीबाहेर पण आपण जपूच शकतो.
आपल्याला एखाद्याविषयी का असं वाटतं? किंवा ते अनेक लोकांविषयी का वाटतं? अश्या प्रत्येक 'का'ला उत्तर मिळेलच असं नाही. सगळं काही असूनसुद्धा प्रत्येक नवीन माणसाकडून, नात्यांमधून नवीन काहीतरी हाताशी लागत असतं. नात्याचं मूळ जर मिळवणं नसेल, मग शारीरिक असो वा मानसिक, तर काही मागणं नसणारी अशी चौकटीबाहेरची नाती आपल्याला एक माणूस म्हणून तर जास्ती प्रगल्भ करतातच, पण एक माणूस म्हणून समोरच्याला समजून घ्यायला मदत करतात. आपल्याला आयुष्यात खूप आधार देतात. फेसबुक आणि व्हाट्सअपच्या जमान्यात अशी चौकटीबाहेरची नाती अनेक वेळा होतात. प्रत्येक वेळी ती शेवट पर्यंत टिकतील असं नाही. पण अनुभवलेले ते क्षण, भावना यांना चौकटीत बसवण्याची घाई नाही केली, तर त्या चौकटीबाहेरच्या नात्याचं आयुष्य वाढेल यात काही शंका नाही.
No comments:
Post a Comment