Thursday 24 August 2017

न कळलेले गिर्यारोहण... विनीत वर्तक

पाउस सुरु झाला कि महराष्ट्रातील सह्याद्री हिरव्या रंगाने नाहून निघतो. एरवी रुक्ष वाटणारे दगड धोंडे आता हवेहवेसे वाटू लागतात. हिरव्या रंगात नटलेले आणि अंगावरून वाहणारे असंख्य पांढरे शुभ्र धबधबे मन मोहून टाकतात. निसर्गाच्या या रुपाला बघण्याची स्पर्धाच आजकाल सुरु झाली आहे. प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी निघणारे असंख्य पर्यटक. पर्यटक च ते कारण ट्रेकर आणि पर्यटक ह्यात खूप मोठा फरक आहे. एक स्याग पाठीवर घेऊन डोंगर चढला म्हणजे ट्रेकर होत नाही. पण नुसत्या कल्पनेने स्वतःला असे समजणारे खूप आहेत.
पर्यटक निघतात ते मज्जा करायला. मज्जेची संकल्पना प्रत्येकाची वेगळी असते. अगदी ती पिकनिक कम गिर्यारोहण करणाऱ्या व्यक्ती संस्थेपासून ते तिकडे हजेरी लावणाऱ्या प्रत्येकापर्यंत. त्यामुळेच प्रत्यक्षात कधी न बघता, भेटता आपण मज्जेसाठी बिनधास्त निघतो. वास्तविक गिर्यारोहण हा एक साहसी खेळ आहे. खेळ म्हंटला कि त्यात सराव हा आलाच. त्याच साहित्य हि आल. त्याचे काही नियम हि आले. तसेच हा साहसी खेळ असल्याने त्यात जोखमीचा भाग हि खूपच जास्ती असतो. म्हणतात तस हा पण कोणी लक्षात घेत नाही.
आठवडा संपून ऑफिस च्या क्युबिकल्स मध्ये दिवस घालवणारे अचानक बूट आणि स्याग घेऊन निघतात ते सह्याद्री अनुभवायला. पाउस हा नेहमीच भुलवतो. मनाला साद घालतो. पण सह्याद्री तसा नाही न. रांगडा सह्याद्री पावसात पण तसाच असतो. त्याच रूप बदलल तरी ते रांगडपण तसच टिकून असते. ते कोणाच्या लक्षात येत नाही. लाईट गेल्यावर त्याच्या नावाने खडे फोडणारे व बिल्डींग चे साधे दहा मजले न चढलेले सह्याद्री चढायला निघतात. इच्छा तिथे मार्ग अस असल तरी अर्धवट माहिती व नसलेली साधन ह्यामुळे साहसी खेळाची जोखीम कित्येक पट वाढते. निसरडे झालेले रस्ते, कधी न बघितलेला प्रदेश, जंगली वनस्पती, प्राणी, सरपटणारे आणि तिकडे अधिराज्य गाजवणारे प्राणी ह्यांचा काहीच अंदाज न घेता आपण त्यांच्यावर पाय देऊन गिर्यारोहण करतो. बरेचदा ते आनंददायी होते हि. पण एक डंख आणि आयुष्य उध्वस्थ अस असताना. किती लोक ह्या जोखमीचा विचार करतात?
काही पर्यटक क्युबिकल्स मधली मस्ती डोंगरात पण सुरु ठेवतात. जागेच भान यायला पैसा आणि स्वताच्या स्टेटस चा इगो उतरेल तेव्हा न. त्याच्या जोडीला मी काय काय करतो हे जगाला ओरडून सांगण्यासाठी सेल्फी असतेच. मग त्यासाठी थोडी अजून जोखीम. टोकाचे कातळ किंवा एखाद्या अश्या ठिकाणी घुसून कि जिकडून मी निडर असल्याची कल्पना येईल अश्या जागा शोधल्या जातात. अशी एखादी जागा मिळाली नाही तर गिर्यारोहणाला ला जाऊन काहीच मिळाल नाही. अशीच भावना त्यांची होते. कारण आजकाल गिर्यारोहण कम पिकनिक चा उद्देश तो झाला आहे. मी वेगळा कसा आणि मी कुठल्या टोकापर्यंत जाऊन सेल्फी घेऊ शकतो ह्यावरून माझ्या प्रतिभेचा अंदाज लावण्याची अहमिका सुरु झाली आहेच. कॉम्प्यूटर वर प्रोग्राम करण्यात माहीर असलेला मी ह्या बाबतीत मागे असण शक्यच नाही. हा माज सह्याद्री पुढे चालत नाही. म्हणून गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातांच प्रमाण वाढते आहे.
पिकनिक आणि गिर्यारोहण ह्या दोन्ही गोष्टी प्रचंड वेगळ्या आहेत. नक्की आपल्याला काय हव आहे? हा प्रश्न सगळ्यांनी स्वतःला जाण्याआधी विचारायला हवा. उत्तर गिर्यारोहण असेल तर काही गोष्टीची काळजी आपण घ्यायलाच हवी. प्रत्येक गिर्यारोहण संस्था जी कि रजिस्टर आहे. योग्य रीतीने गिर्यारोहणाच आयोजन करतात. आपण ज्या ठिकाणी जातो आहोत. तो ट्रेक कोणत्या दर्जाचा आहे हे समजून घेण अत्यंत महत्वाच आहे. सोप्पा, मध्यम, कठीण ह्या रीतीने आपण स्वतःची क्षमता ठरवावी. पहिल्याच दिवशी म्यारथोन धावायला घेतली तर जी हालत होईल तीच पहिल्या प्रयत्नात कठीण गिर्यारोहण करताना होईल. हे आपल्याला कळायला हव. हे कळत नसेल तर आपण पिकनिक ला जाणच इष्ट.
कोणतीही गिर्यारोहण संस्था हि जरी मदत करत असली तरी स्वतःची काळजी आपण स्वतः घ्यायची असते. कोणतीही संस्था आपल्यासाठी जबाबदारी उचलत नाही. ते मदत आणि गाईड करतात. त्यामुळे गिर्यारोहणाला जाताना अगदी पेहरावा पासून ते पाणाच्या बॉटल पर्यंत आपण एक दिवस आधी सगळ नियोजन कराव. गिर्यारोहण करताना लीडर ने सांगितलेल्या सूचना पाळाव्यात. तसेच ग्रुप सोडून इकडे, तिकडे आपल्या डी.एस.एल.आर ची क्षमता आणि आपल्या सेल्फी च्या नादात न भटकणे उत्तम. आपण जसे फोटो काढतो तसे हजारो लोक काढतात. पण आपण जो अनुभव घेतो तो आपला एकट्याचा वेगळा असतो. तेव्हा फोटो आणि सेल्फी पेक्षा अनुभवलं तर ते चिरकाळ टिकून आपल्याला आनंद देते. आपण अनुभवसंपन्न कस व्हायचं ह्याचा विचार आपण करायला हवा.
कोणताही गड, किल्ला, सुळका, घाटमाथा किंवा साधा डोंगर आपल्या सोबत एक इतिहास घेऊन आहे. जाण्याआधी त्याचा थोडा अभ्यास केला तर तो अनुभव वेगळ काहीतरी देतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी हि तटबंदी किंवा बुरुज बांधला. आपण जेव्हा तिकडे असू तेव्हा त्यांच्या स्पर्शाने पुलकित झालेल्या गोष्टीना स्पर्श करताना मिळणारा अनुभव कोणत्या सेल्फित मिळणार नाही. कोकणकड्यावर अगदी कड्यावर जाऊन त्याला बंदिस्त करण्यापेक्षा एक १०-१५ मिनिटे तिकडे डोळे बंद करून बसून त्या वाऱ्याला स्वतःच्या आत बंदिस्त केल तर तो क्षण तुमच्या आयुष्यातील एक अजरामर क्षण असेल. गोष्टी पकडता येत नाहीत. त्या अनुभव्यावा लागतात. तेव्हा पिकनिक आणि गिर्यारोहण ह्याची गल्लत न करता एक साहसी खेळ म्हणून गिर्यारोहणाकडे कडे बघा. गिर्यारोहण हे आरोहण आहे आपल्या स्व वर. त्याला हलके समजण्याची चूक आपल्या आयुष्यावर बेतू शकते. हे लक्षात असू द्या. तेव्हा पुढल्या वेळेस गिर्यारोहणाआधी पूर्ण तयारी करून क्षण अनुभवा. कदाचित ते तुम्हाला तुमचा सेल्फी नाही देणार पण तुमचा सेल्फ मात्र सुरक्षित ठेवतीलच पण त्या सेल्फ ला आदराची पण जोड देतील.

No comments:

Post a Comment