मैत्री मग ती कोणाशी का असेना आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे. असा एकही व्यक्ती शोधून मिळणार नाही कि ज्याने कधी मैत्री केलीच नाही. त्यामुळे पाण्यासारखी नितळ आणि गरजेची असलेली मैत्री आपल्या आयुष्याचा भाग हवीच. पण नुसती ती केली म्हणजे सर्व काही झाल का? मैत्री सुद्धा एक नात आहे आणि ते निभावाव लागते. त्याची बांधणी करावी लागते. ते जपाव लागते. सगळ्यात महत्वाच ते जगाव लागते.
व्होडाफोन चा एक सुंदर व्हिडीओ सध्या फिरतो आहे. त्याच टायटल आहे लुक अप. आभासी जगात आपल्या मैत्रीला विसरून गेलेल्यानो लुक अप. नुसत स्मायली आणि HBD अक्षरांनी शुभेछ्या देणाऱ्यानो लुक अप. क्षण न उपभोगता त्याला क्यामेरात आणि सेल्फी मध्ये बंद करणाऱ्या सर्वानीच लुक अप. लुक अप कुठे आणि कोणाला तर आपल्या मैत्रीत. कारण तुमची मैत्री पण तुमच्या प्रमाणे आभासी होत जाते आहे. अजून वेळ नाही गेलेली. लुक अप.
आभासी जगात राहून आपण पण आभासी होत आहोत. एकमेकांना मित्र म्हणवणारे खरेच आभासी झालो आहोत. आपल्या मित्र मैत्रिणीनां आणि त्यांच्या मैत्रीला पण. आज मैत्र दिवस. अनेक शुभेच्छाचे मेसेज फेसबुक आणि व्हास्त अप नुसते आदळत आहेत. मी स्वतःला एक प्रश्न विचारला कि ह्यातला मी एकतरी लिहिला आहे का? माझ्या मित्रासाठी / मैत्रिणीसाठी. तिच्या / त्याच्या विषयी मला काय वाटते? मला त्या मैत्रीतून काय मिळाल? माझ्यासाठी त्या मैत्रीच महत्व काय? मी पण घाण्याला जोडलेल्या बैलाप्रमाणे फक्त ओढायच म्हणजेच आलेल कॉपी पेस्ट करून पुढे पाठवायच का? असे अनेक प्रश्न आज डोक्यात आहेत.
आज इतके मेसेज आलेत पण एकपण पत्र नाही आल. एका मित्राने एका मित्राला किंवा मैत्रिणीला लिहलेल. मैत्रदिनाच्या शुभेछ्या काय फक्त फोरवर्ड करून देता येतात का? का नाही कोणाला अस वाटल कि आज मी सांगाव आज तुझी मैत्री माझ्यासाठी काय आहे? त्यातून मला काय मिळाल आणि तुला काय दिल. खरे तर मैत्रीत हिशोब मांडू नये मुळीच पण आपल्याला आतून वाटणाऱ्या भावनांना मांडायला कसला आला आहे हिशोब. म्हणजे एखाद्याने आपल्या कठीण क्षणात वेळ दिला असेल. पैसे, ओळख, आणि इतर कोणत्याही पद्धतीची मदत केली असेल. अगदी मदत केली नसेल तरी त्याच किंवा तीच असण हा तुमचा आधार असेल तर ते तुम्ही कधी सांगितल आहे का?
मित्र आणि मैत्रीण म्हणजे काय फक्त खांदा द्यायला असतात का? गरज लागली कि असतात का? उत्तर नाही असेल तर मग ह्या शिवाय आपल्याला त्यांची आठवण कधी येते? आलीच तर ती आल्यावर एक फोन, एक भेट, एक कॉफी, एक जेवण, एक सहल ते एक पिकनिक अस किती वेळा करतो. किंवा अस काही न करता पण नुसतच बोलण्याची तल्लफ आली हे किती वेळा सांगतो. आपण कोणत्याही टोकावर असो. समोरून आलेलं असा कोणताही क्षण आपल्याला शब्दांपलीकडे अत्युच्य समाधान देतो. बघा कधी प्रयत्न करून. मित्राला आणि मैत्रिणीला तुम्ही दिलेलं गिफ्ट लक्षात रहाणार नाही किंवा तुम्ही मैत्रदिनी कोणता मेसेज फोरवर्ड केला ते लक्षात रहाणार नाही. लक्षात राहील ते तुम्ही दिलेले क्षण. मग ते कसेही असो. तो एक फोन, ते पत्र, ती एक कॉफी, ती भेट, तीच ती पिकनिक किंवा तोच तो क्षण जो तुम्ही दोघे एकत्र अनुभवलेला असेल.
अजून वेळ गेलेली नाही. मैत्र दिवस संपला म्हणून तुमची मैत्री नाही. मोबाईल च्या स्क्रीन मध्ये डूबण्यापेक्षा त्याच मोबाईल वरून केलेला एक फोन कॉल कि मला तुझी आठवण येते किंवा आपली मैत्री माझ्या आयुष्याचा एक घटक आहे. हे एक वाक्य त्या शब्दांन पलीकडे अत्युच्य समाधान देईल. जेव्हा तुम्हाला कोण अस समोरून कॉल करेल किंवा भेटेल किंवा विचारेल तेव्हा होणारा आनंद परमोच्च असेल ह्यात शंका नाही. आज मैत्र दिनाच्या दिवशी मी तरी लुक अप करतो आहे. प्रत्येकाने ठरवायचं क्षण पकडायचे कि अनुभवायचे? आजपर्यंत क्षण पकडत आलोत एकदा अनुभवून बघा त्यासाठी जास्ती काही करायची गरज नाही जस्ट लुक अप.
No comments:
Post a Comment