Thursday 24 August 2017

२६ जुलै... विनीत वर्तक

२६ जुलै ह्या दिवसाच महत्व तस वेगळच आहे. अनेक चांगल्या वाईट गोष्टींसाठी हा दिवस माझ्या आयुष्यात नोंदला आहे. २६ जुलै चा तो मुंबईत पडलेला पाउस असो वा कारगिल ला टायगर हिल, तोलोलिंग च्या शिखारांसमोर उभ राहून साजरा केलेला विजय दिवस असो. ह्या दिवसाने माझ्या आयुष्यावर वेगळीच छाप सोडली आहे.
२००५ चा २६ जुलै कसा काय विसरू शकेन? दुपारी सुरु झालेला तो असा काही कोसळत होता कि आता बस असच म्हणावस वाटत होत. काही तासात मुंबई पाण्यात पूर्ण डुबली. त्यावेळी ह्यात असणाऱ्या कोणीच असा पाउस बघितला नव्हता. त्याकाळी मी भाभा अणुसंशोधन केंद्रात कामाला होतो. दुपारी २ वाजता घरी येण्यासाठी तिकडून निघालो. पण नॉर्थ गेट ते अणुशक्ती नगर च गेट येईपर्यंत ३ तास लागले. पुढे जायचा नाद मी सोडून दिला. अणुशक्ती नगर मध्ये रात्री मित्राच्या घरी राहायचा निर्णय माझा तो निर्णय अगदी योग्य ठरला. संध्यकाळ होता होता पाण्याचा जोर अणुशक्ती नगर च्या गेट वर दिसत होता. बस पण जाऊ शकणार नाही अश्या वेगात पाणी वहात होते. लोकांची तारांबळ बघून मी व माझ्या काही सहकाऱ्यांनी माणसांची साखळी बनवून लोकांना गेट च्या आतमध्ये घेत होतो. अर्थात काही वेळात तो नाद सोडून द्यावा लागला कारण पाण्याचा जोर खूप वाढला होता.
रात्री भुर्जी पाव खाऊन कशीबशी रात्र काढली. सकाळी ६:३० ला अणुशक्ती नगर वरून चालत निघालो. रस्त्यात काल रात्री पावसाने केलेल्या हाहाकाराचे दाखले मिळत होते. अणुशक्ती नगर ते चेंबूर मग तिकडून प्रियदर्शनी करत सायन गाठलं. पूर्ण रस्त्यात पाणीच पाणी. छाती एवढ्या पाण्यातून रस्ता काढत एकमेकांचा आधार घेत हा पूर्ण रस्ता चालत कापला. सायन वरून वांद्रे गाठलं. तोवर दुपारचे १२ वाजून गेले होते. तिकडेही ट्रेन किंवा कोणतीच सेवा चालू होण्याच कोणतच चिन्ह नव्हत. पोटात काल रात्री खाल्लेले दोन पाव. भुकेने कसतरी होत होत. पण सगळ्यांची अवस्था ती होती. हॉटेल वाल्याला विचारल तर त्याने जे उत्तर दिल ते ऐकून मी काही मिळेल ह्याचा नाद सोडून दिला. साहेब लोकांनी कोथिंबीर पण मागून खाली. आत्ता माझ्याकडे काहीच नाही. अशी अवस्था मी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती.
वांद्रे ते विलेपार्ले पूर्ण रस्ता कमरेएवढ्या पाण्यातून पार केला. थंडीने थरथरत होतो. सतत पाण्यात राहून विचित्र अवस्था झाली होती. विलेपार्ले ला रस्त्यावर एक समाजसेवी संस्था जाणाऱ्या लोकांना पार्ले जी बिस्कीट देत होती. ती तीन बिस्कीट मी कधीच विसरू शकत नाही. ते एक ग्लास पाणी जे कि मी ८ तासानंतर प्यायल त्या तीन बिस्कीटांन सोबत. तिकडून बोरीवली कडे प्रवास सुरु ठेवला. संध्याकाळी ६ च्या सुमारास घरी पोचलो. १२ तासात ४० किलोमीटर पेक्षा जास्ती अंतर पूर्ण पाण्यातून ३ बिस्कीट आणि एक ग्लास पाण्याने पूर्ण केल होत. २६-२७ जुलै २००५ हे दोन्ही दिवस कधीच विसरू शकणार नाही. आज १२ वर्ष झाली. पण सगळ्या घटना आजही समोर आहेत. आठवलं तरी आपण कस घरी आलो ह्याच मला आजही आश्चर्य वाटते.
२६ जुलै २०१५ कारगिल ला जवळपास एका आठवड्याच्या प्रवासा नंतर पोहचलो होतो. मनाली ते लडाख म्हंटल तर एक किंवा दोन दिवसांचा प्रवास पण निसर्गाच्या त्या तड्याख्यात असा काही सापडलो कि ३ दिवस रस्त्यावर काढले. एकवेळ पेंगोग लेक ला किंवा खारदुंगला ला नाही गेलो तरी चालेल पण २६ जुलै चा कारगिल कार्यक्रम मिस नव्हता करायचा. त्या दिवशी त्या शिखारांसमोर उभ राहून तिरंगा फडकताना बघताना अभिमानाने छाती फुलून आली. पण त्याच वेळी सैनिकांचे बलिदान आठवून डोळ्यातून पाणी आपसूक बाहेर आल. तिकडे येण्यासाठी निसर्गाने जो तडाखा दिला त्यानंतर पुन्हा कधी इकडे येणार नाही असच प्रत्येकाच्या मनात आल असेल. पण मग रोज हा तडाखा झेलणाऱ्या माझ्या सैनिकाच्या मनात काय असेल असाच विचार करत ते क्षण अनुभवत होतो. अनु मावशी मुळे अगदी प्रेस बॉक्स मधून फोटो काढण्याची संधी मिळाली. शहिदांच्या स्मृतीला अगदी जवळून वंदन करता आल. ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली हे सैनिक होते. त्या अधिकाऱ्याशी अगदी जवळून भेटण त्यांना स्याल्युट करता येण हा माझ्या आयुष्यातील एक परमोच्च क्षण होता.
काही दिवसाचं महत्व, आठवणी आणि तो दिवस आयुष्यात जपून ठेवावा असेच असतात. काही तर कधीच पुन्हा आठवू नये अश्या पण. दोन्ही टोकाच्या अनुभूतिनी ह्या दिवसाच माझ्या आयुष्यात स्थान आहे. एकीकडे पुन्हा २६ जुलै होऊ नये तर दुसरीकडे दरवर्षी त्या दिवशी मी कारगिल ला त्या आठवणी अनुभवव्या अस. आजपण तोच दिवस आहे २६ जुलै. आज पाण्यातून आपल काम करत असताना पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. मनोमन हीच इच्छा कि २६ जुलै २०१५ परत येऊन दे पण २००५ नको

No comments:

Post a Comment