Thursday 24 August 2017

एक उत्तम वक्ता, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे... विनीत वर्तक

राजकारणावर लिहणारा मी नाही. म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या बद्दल लिहू का नको ह्या संभ्रमात होतो. कारण ह्यांच्या नावाभोवती एका पूर्ण पक्षाच वलय बांधल गेल आहे. त्यामुळेच लिहताना राजकारण बाजूला ठेवून लिहण तस थोड कठीण आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाव मुंबई, महाराष्ट्राच्या अस्मितेशी आजही जोडलं जाते. कारण ह्या माणसात असलेली एक अदभूत कला. ती म्हणजे माणस जोडण्याची कला. ज्यावर त्या काळी हि मी प्रेम करत होतो व आजही करतो.
जेव्हापासून कळायला लागल तेव्हापासून हे नाव नेहमीच ह्या न त्या कारणाने समोर येत राहील. कधी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावरून तर कधी मुंबई शी जोडलेल्या भावनेतून. कारण काही असो पण राजकारण बाजूला ठेऊन ह्या माणसाच्या प्रतिभेने मला मोहिनी घातली. एक माणूस कोणतही राजकीय पद न स्वीकारता कस काय एक राजकीय पक्ष संघटना चालवू शकतो. ह्या प्रश्नाने मला भांडावून सोडल होत. खूप वर्ष मी ह्या प्रश्नाच उत्तर शोधात होतो. किंबहुना आजही त्यांच्या जाण्यानंतर हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
राजकारण आल कि चिखलफेक आली, हेवेदावे आले, एखादी विचारसरणी आली. पण ह्या सगळ्या पलीकडे स्वतःचा स्वार्थ आणि खुर्चीची चटक हि आलीच. खुर्ची साठी वाट्टेल ते करणारे राजकारणी आपण पहिले. किंबहुना भारताच्या राजकारणात त्यांची काहीच कमी नाही. खुर्ची न स्वीकारता मुंबई, महाराष्ट्र किंबहुना देशाच्या राजकारणावर आपला प्रभाव सोडणारे बाळासाहेब ठाकरे वेगळेच. मी काही त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा त्या विचारसरणी शी मिळती जुळती माझी विचारसरणी हि नाही. पण तरीही एक माणूस म्हणून मला नेहमीच त्याचं कुतूहल वाटत आल.
१९९२-९३ च्या दंगली मी खूप जवळून बघितल्या. मुंबई बॉम्ब स्फोटानंतर मुंबईच वातावरण ठवळून निघाल. कुठेतरी धर्म द्वेषाची धार त्याला होती. त्या नंतर दंगलीत मी जे बघितल त्याने मला हा प्रश्न पडला. म्हणजे आपले विचार सोडून कस काय कोणी एकमेकांचा सूड म्हणजे अगदी जीव घेण्यापर्यंत जाऊ शकते. मराठीची अस्मिता असो. मुंबईच्या लोकांच्या जीवनाचा प्रश्न असो. बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना ह्या एका हाकेवर लोक काही करायला तयार होते. माझ्या दृष्ट्रीने कुतूहल ते होत. नुसत शब्दांच्या जोरावर कस काय एक माणूस लाखो लोकांचे विचार कंट्रोल करू शकतो? आपण आपल्या घरात पण आपल्या माणसांचे विचार कंट्रोल नाही करू शकत. तर पूर्ण मुंबई किंवा पूर्ण महाराष्ट कस काय?
ह्या उत्तरासाठी त्यांची एक सभा मी अगदी लहान वयात शिवाजी पार्क ला बघण्यासाठी गेलो. मला ते वातावरण अनुभवयाच होत. ते शब्द, तो आवाज, ती जरब, तो मिश्कीलपणा, तो विनोद, ती नक्कल सगळच. अगदी कोवळ्या वयात येणाऱ्या प्रश्नांची उत्तर मला माझ्या परीने शोधायची होती. ती सभा झाली आणि ते बघून एक मात्र नक्की झाल कि हा माणूस वेगळा आहे. शब्दफेक, आवाजातील चढ उतार, दोन शब्दांच्या मधील शांतता, हाताचे हावभाव आणि एकूणच बॉडी ल्यांग्वेज ह्या पलीकडे मनाला साद घालण्याची कला त्यांच्यात होती हे मला कळून चुकल. आपली हि ताकद त्यांना खूप लवकर समजली म्हणूनच शिवसेना सारखा पक्ष इतके वर्ष आपल अस्तित्व मुंबई, महाराष्ट्रात टिकून आहे.
त्या सभेनंतर मी स्वतः कितीतरी वेळ एका वेगळ्याच ट्रान्स मध्ये होतो. त्यांचे शब्द असे डोक्यातून जात नव्हते. त्या वेळेस मला कळल कि मनाला साद घालण म्हणजे काय. राजकारण हे माझ क्षेत्र नव्हत न कधी असेल. पण राजकारणात त्यांच्या इतका साद घालणारा माणूस आजतागायत मला दिसला नाही. त्यांची शैली अशी होती कि शिव्या देताना पण त्यात विनोद वाटे. त्यातले शब्द जितके खटकत नसतील तितका त्याला हास्यातून मिळणारा प्रतिसाद समोरच्याला खटकत होता. हेच कुठेतरी एक अफाट प्रतिभा असलेला माणूस करू शकतो. त्यांच्या जाण्यानंतर पण अगदी जे त्यांचे शत्रू राहिले राजकारणात त्यांना पण मनातून वाईट वाटल ह्यात सगळ आल. कदाचित राजकीय भविष्यातून हायस वाटल असेल पण त्यांच्या प्रतिभेवर शत्रू पण प्रेम करत होता ह्यात शंका नाही.
मराठी माणसाची अस्मिता कोणी जागृत केली तर एकच नाव समोर येते. अर्थात त्यांची पद्धत चुकीची का बरोबर हा वादाचा विषय होऊ शकेल. पण मनाला साद घालण्याची त्यांची हतोटी मात्र एकमेव होती ह्यात शंका नाही. आज त्यांची आठवण यायला फेसबुक वर त्यांचा बघितलेला एक विडीओ. रजत शर्मा ह्यांनी घेतलेली ती मुलाखत बघितली आणि मी अगदी १० फुटावरून त्याचं एकलेल ते भाषण पुन्हा जाणवलं. आज इतके वर्षांनी सुद्धा पुन्हा ऐकताना ती जादू अजून कायम आहे. म्हणून एक पक्ष, एक नेता आणि एक सभा ४० पेक्षा जास्त वर्ष सांभाळू शकले ते ह्याच जादू वर. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे एक उत्तम वक्ता म्हणून आणि त्यांच्या शैलीसाठी कायम माझ्या मनात राहतील ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment