Thursday, 24 August 2017

हृद्यांतर... विनीत वर्तक

हृद्यांतर हा विक्रम फडणीस चा चित्रपट काल पहिला. ह्या चित्रपटाबद्दल उत्सुकता आधी होतीच. चित्रपटाचा स्क्रीनप्ले Saurabh Bhave. (सौरभ भावे) ह्याने लिहिला आहे त्यामुळे चित्रपटाच आकर्षण थोड जास्तीच होत. सौरभ माझ्या बहिणीचा म्हणजे स्नेहल चा नवरा. सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे ची जोडी ह्यामुळे खूप चांगला चित्रपट असेल ह्याची खात्री होतीच.
चित्रपटाची सुरवात हॉस्पिटल च्या सीन मध्ये होते. त्यामुळे हा चित्रपट खूप भावनात्मक असेल हा केलेला अंदाज अगदी खरा ठरला. किंबहुना त्यापेक्षा हा चित्रपट खूप खोलवर रुजला. चित्रपटातील काही दृश्य इतकी सुंदर आहेत कि डोळ्यातून पाणी आपोआप येते. चित्रपट बघताना ह्या गोष्टी कधी आपल्या बाबतीत घडल्या तर असा विचार करत आपण त्यात आपसूक गुंतत जातो. चित्रपटाचा शेवट माहित असला तरी तो तिथपर्यंत जाताना खूप आपला वाटतो. एका डोळ्यातून पाणी तर एका डोळ्यातून समाधान तर गड आला पण सिंह गेला अशी संमिश्र भावना चित्रपट आपल्या मनात ठेऊन संपतो.
एक सुखी कुटुंब, दोन यशस्वी आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात वरच्या पातळीवर असणारे कुटुंब प्रमुख, दोन गोंडस मुली. असा चित्रपटाचा प्रवास सुरु होतो. काहीतरी मिळवताना काहीतरी सुटल्याची भावना निर्माण होताना नक्की काय चुकल? कोणाच आणि किती? असे अनेक प्रश्न नवरा आणि बायको नात्यात निर्माण होत जातात. आपल्या परीने दोघेही बरोबर असताना उत्तर शोधण्यासाठी संवाद मात्र दोघांना हि करावासा वाटत नाही. ह्यामुळे गुंते सुटण्याएवजी अधिकच वाढत जातात. अश्याच एका वळणावर एक मोठा प्रश्न निर्माण होतो. ज्याने सगळ्याचं आयुष्य बदलून जाते. एका क्षणात होत्याच नव्हत होताना आणि मोठ्या कष्टाने उभा केलेला डोलारा कोसळताना नक्की आपण काय कमावल ह्याचा विचार आपण हि करू लागतो. ह्या वळणावर येणारे अनेक फाटे नवरा- बायको ह्या नात्याला तर एक आई, एक बाप, एक मुलगी, एक भावंड म्हणून कुठे घेऊन जातात हे चित्रपटात बघण उत्तम. कारण ते बघण्यापेक्षा ते अनुभवण आपल्या आयुष्यात हृद्यांतर करेल हे नक्की.
सुबोध भावे ने अभिनयात जीव ओतला आहे. मुरलेला आंबा असच मी म्हणेन. मुक्ता तर लाजववाब. मुक्ताने आईचा अभिनय करताना ती किती सशक्त अभिनेत्री आहे ह्याचा प्रत्यय दिला आहे. एकाच वेळी आई, बायको आणि मुलगी ह्या तिन्ही ठिकाणी ती परफेक्ट आहे. दोन्ही मुलींचा अभिनय पण खूप सुंदर आहे. स्पेशली तृष्णीका शिंदे च कौतुक कराव तितक थोडच आहे. वयाच्या मानाने तिचा अभिनय नक्कीच वाखाणण्याजोग्या आहे. एकच खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटात विनोद घुसवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न. ज्याची खरच गरज नव्हती अस मला वाटल.
शामक डावर चा वावर तितकासा छाप टाकत नाही. पण छाप टाकतो तो हृतिक रोशन. एकही संवाद नसताना नुसत्या चेहऱ्याच्या एक्स्प्रेशन वरून भावना दाखवण्यासाठी हृतिक ला शंभर मार्क. चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे संगीत. काही गाणी तर गुणगुणावी अशीच आहेत. चित्रपट निर्मिती मध्ये प्रचंड मेहनत घेतली आहे ते दिसून येते. राहण्याचं घर, त्यांचे कपडे, एकूणच चित्रपटाचा लुक खूपच सुंदर आहे. विक्रम फडणीस चा टच त्यात दिसून येतो. एकूणच काय तर एक सोडू नये असा चित्रपट. हृद्यांतर आपल हृद्यांतर करतो का? ह्याच उत्तर ज्याच त्याने शोधायचं पण बघताना आपल्याला जाणीव तरी नक्की करून देतो ह्यात शंका नाही. मराठीत खूप सुंदर चित्रपट येत आहेत. त्यातील एक सुंदर चित्रपट चुकवू नये असाच.

No comments:

Post a Comment