काल सिद्धांत गणोरे ची बातमी ऐकून सुन्न झालो. आपल्याच जन्मदात्या आईवर हल्ला व १२ जखमा करत थंड डोक्याने तिची हत्या करत “टायर्ड ऑफ हर” अस रक्ताने आई च्या मृतदेहा शेजारी लिहित क्रूरतेची सीमा बदलवून टाकली. आपल्याला हव तस वागू न दिल्याने चिडून आपण एकदाच सूड घेतला अस जबानीत त्याने सांगितल आहे.
ह्या हत्याकांडाने अनेक प्रश्न समोर आले आहेत. प्रतिथयश कुटुंब, एक चांगले संस्कार असलेल मध्यमवर्गीय कुटुंबात अशी घटना अनेक प्रश्न निर्माण करते. आई म्हणून आपल्या कर्तव्यात आई कमी पडली असेल, एक बायको म्हणून कमी पडली असेल, अनेक बंधन तिने लादली असतील पण ह्या सगळ्यावर उपाय म्हणून तिचा जीव घेण असू शकत नाही. फेसबुक, व्हात्स अप वरचा संचार त्याच व्यसन, सतत फोन मध्ये खेळण समजून गुंतणं किती भयानक परिणाम समोर आणते आहे.
आई – वडीलांतील भांडण किंवा बेनबाव असोत किंवा मुल म्हणून वेगळ समजून घेण्यात आई नक्कीच कमी पडली हे स्पष्ट आहे. पण म्हणून त्याचा उपाय तिला संपवून टाकणे कसा असू शकतो? माझ्या मते तोच सगळ्यात कठीण भाग आहे. आधीच्या काळी आताच्या मुलांपेक्षा जास्ती बंधन होती. फोन तर त्याकाळी अस्तित्वात नव्हतेच. पण अगदी टी.व्ही. च्या वेळा हि ठरलेल्या असायच्या. पार्टी हा शब्द तर दूरचा होता. मित्रांसोबत बाहेर जातो. हे वाक्य सांगणे म्हणजे पूर्ण चारित्र्य पडताळणी पेक्षा जास्ती प्रश्न यायचे. कोण? कुठला? ते किती वेळ? यायची वेळ हि ठरवली जायची. न आल्यास पुन्हा कधी न पाठवण्याची धमकी सुद्धा. त्याच वेळी हे कर किंवा हे करू नकोस असे अनेक उपदेश ऐकावे लागायचे ते वेगळेच. अस असून सुद्धा आई-वडीलान बद्दलची चीड किंवा राग हा तात्कालिक असायचा. कारण मनात कुठेतरी हे सगळ आपल्या भल्यासाठी आणि आपल्यावरील प्रेमापोटी आहे हे पक्क माहित असायच.
वडील मंडळीचा धाकामध्ये आई नेहमीच आपल्या पदरात सामावून घ्यायची. कधी आई कडक असेल तर बाबांकडे हा रोल असायचा. अगदी दोघेही कडक असतील तर हाच रोल मित्र-मैत्रिणी कडे जायचा. जाऊन दे रे म्हणत अनेकवेळा अनेक पार्ट्या आपण सोडून दिल्या असतील. पण कधी आई- वडिलांना उलट बोलण्याएवढी हिंमत झाली नाही. त्याला संस्कार म्हणा वा अजून काही. पण आज काळ बदलला. आई- वडील त्यांच्या फोन मध्ये आणि नोकरीत, धंद्यात व्यस्त झाले. रात्रीच्या वेळी एकत्र भेटणार कुटुंब व्हात्स अप वर कुटुंब ग्रुप करून मेसेज ची देवाणघेवाण करू लागले. हीच गत मैत्री मध्ये झाली. वर्चुअल च्या जाळ्यात आपण असे की गुंतलो कि भावना व्यक्त करण्यासाठी कोणीच मिळेना. आपला आय क्यू नक्कीच वाढला पण आपला ई क्यू घटत गेला.
भावनांचे हिंदोळे सांभाळून घ्यायला आपण कमी पडू लागलो. अनेक छोटे – मोठे भावनिक हिंदोळे आपल्या वरती प्रचंड परिणाम घडवायला लागले. त्यामुळे त्याला व्यक्त होण्यासाठी मार्गच शिल्लक नसताना त्याला मुळापासून संपवण्यासाठी त्या व्यक्तीनांच संपवण्याचा मार्ग अधिक सोप्पा वाटायला लागला. त्याचीच परिणीती म्हणजे काल झालेली घटना. आई च न समजून घेण समजू शकतो. पण कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलाला मित्र- मैत्रिणी नसतील का? आई च्या अश्या संशयी स्वभावाला कदाचित उत्तर नसेल पण प्रश्नच न उदभवू देण्यासाठी अनेक मार्ग होतेच. फक्त तिला संपवण्याचा मार्ग समोर येतो हे कुठेतरी भीतीदायक आहे. प्रश्न कोणाच चुकल हा नाही तर प्रश्न आहे चुकलेल्या भावनिक रस्त्यांना सुधारण्यासाठी आपण कोणते वळण घेतो तो प्रश्न खूप महत्वाचा आहे. कुठेतरी अश्या भावनिक हिंदोळ्यानां सामोरे जाण्यासाठी ई क्यू कमी असलेल्या पिढीला खूप काही शिकवावं लागणार आहे.
सगळ्यात मोठा अपराध जो असतो जो थंड डोक्याने केला जातो. करताना अपराध्याला आपण काय करत आहोत ह्याची पूर्ण कल्पना असते. तसेच अपराध केल्यावर त्याचा कोणता क्लेश त्याला होत नाही तर आसुरी आनंद होतो. तसेच आपण खूप चांगलच केल असा भाव असतो. कालच्या घटनेत ह्या सर्व गोष्टी समोर आल्या. म्हणूनच ह्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले. काय चुकलं एका आईच? काय चुकलं एका वडिलांचं? काय चुकल कुटुंब म्हणून? काय चुकलं एक समाज म्हणून? काय चुकलं बातमी वाचून? सगळच विचार करण्यासारखं. सगळ्याच प्रश्नांची उत्तर नाही मिळाली. पण मला प्रश्न पडले ह्याच समाधान वाटल. कारण वाचून पुढे जाण्याइतक्या माझ्या भावना संपलेल्या नाहीत ह्याच समाधान. तुमच काय?
No comments:
Post a Comment