Thursday, 24 August 2017

एक दिवस शाळेचा... विनीत वर्तक

आज पुन्हा एकदा शाळेत जाण्याचा योग आला. निमित्त होते शाळेच्या १९६५ ते २०१७ पर्यंत शाळेत शिकलेल्या आजी-माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन. खरे तर स्नेहसंमेलना पेक्षा आपल्या शाळेत पुन्हा एकदा जायला मिळणार ह्या उत्साहात मी होतो. पुन्हा एकदा ते वातावरण, त्या भिंती, ते बेंच, ते जिने, ते वर्ग, तेच शिक्षक पुन्हा एकदा अनुभवयाच होत. माझ्या त्या नरम मातीच्या भांड्याला कोणी आकार दिला असेल तर तो शाळेने. शिक्षण, खेळ, प्रगल्भता ह्या शिवाय शाळेने दिले ते मित्र, मैत्रिणी आणि त्या पलीकडे न विसरता येणारे क्षण.
कार्यक्रमा पेक्षा मला शाळा पुन्हा अनुभवायची होती. कार्यक्रमात मन रमत नव्हते मग गपचूप उठून वरच्या मजल्यावर गेलो. जाताना तो जिना खूप काही बोलत होता. एका भिंतीवर लावलेला तो आरसा आज तिकडे नव्हता. शाळेत असताना किती तरी वेळा त्याच्या समोर उभ राहून स्वतःला बघितल असेल. त्यावेळी न मोबाईल होते न सेल्फी. पूर्ण शाळेत स्वतःला बघण्याच एकच स्थान म्हणजे तो आरसा. पहिला मजला म्हणजे पहिली ते पाचवी चा काळ. पुन्हा एकदा त्या कोपऱ्यात गेलो. जिकडे नोटीस बोर्ड असायचा. आजही तोच नोटीस बोर्ड तसाच आहे. पॉलिश केल असेल हाच काय तो फरक. तिथला तो कोपरा म्हणजे मधल्या सुट्टीत आमची खेळायची जागा. डबा खाऊन एकमेकांना घसरून पाडापाडी खेळण्याच ते स्थान आज खूप शांत वाटल. जोशी बाई किती तरी वेळा येऊन ओरडल्या असतील. पण बाईंच ऐकणारा मी सज्जन मुलगा कधी नव्हतोच. आज ते आठवून पुन्हा ओठांवर हसू आल.
एक- एक करत प्रत्येक मजल्यावर जाऊन आलो. वर्गात जाऊन बसलो. ते बेंच बोलत होते नकळत. फळे बदलेले वाटले. पण बेंच तेच. करकटकाने केलेल्या रेघोट्या ते पेन रोवण्यासाठी केलेले खड्डे अजून तसेच आहेत. तेच काय कॉपी करण्यासाठी रंगवलेल्या भिंती पण तश्याच आहेत. गणिताच सूत्र किंवा सायन्स मधील आकृत्या सगळ्याच पुन्हा बोलत होत्या. आज शाळेत कोणीच नव्हत पण शाळा माझ्याशी खूप बोलत होती. तीच ती ग्यालरी जिकडून एकेकाळी खूप लांबचा परिसर दिसायचा. जिकडे ज्या दिवशी शिक्षा व्हायची त्या दिवशी मी शांतपणे बघत बसायचो शून्यात. जिकडून कधीतरी आपल्या आवडत्या मुलीवर कटाक्ष टाकले होते तीच ती ग्यालरी. ते ग्रील आजही तसेच जाणवले तुरुंगासारखे पण आज ते हवेहवेसे वाटत होते. पण शाळेच्या ग्राउंड वर आता कटाक्ष टाकायला कोणी नव्हत न मला शिक्षा देणार.
दरवाजे, खिडक्या, शाळेतील फोटो सगळ अजून तसच आहे अगदी लिफ्ट सुद्धा त्यातून सुटली नाही. सगळ्यात कोणाला बघून आनंद झाला तर तो शाळेतील शिपाई काकानां बघून. त्यांना हि ह्या कार्यक्रमासाठी आज आग्रहाच आमंत्रण होत. कधीकाळी शाळा भरण्यापासून ते सुटेपर्यंत. निरोप आणण्यापासून ते देण्यापर्यंत. बालवर्गा पासून ते १० वी पास होई पर्यंत ते नेहमीच दिसत होते. उशिरा बेल देण्यामुळे कधी राग तर पावसामुळे शाळा लवकर सोडण्याची बेल मारणारे ते काका आज समोर दिसताच डोळ्यातून दोन थेंब आपसूक बाहेर आले ते आपुलकीच्या भावनेने. शाळेवर सगळेच प्रेम करतात. पण वेळप्रसंगी निष्ठुर होऊन पण विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे ते शिपाईकाका मात्र नेहमीच वेगळे रहातात.
शाळेला जिवंत करतात ते शिक्षक. आज सगळे शिक्षक भेटले. माझ्या दुसरीच्या फोटोत असणाऱ्या जोशी बाईन पासून ते १० वी ला शिकवणाऱ्या लोपीस सरांपर्यंत. सर्वांच्या हातात माझ्या पुस्तकाची प्रत देताना मन भरून आल होत. पाटील आणि पवार बाईंनी तर अगदी हात पकडून हाच तो विनीत. किती खट्याळ होता आणि आता पुस्तक लिहील असा प्रश्नार्थक भाव आणि त्याच वेळी त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी दिसणार समाधान म्हणजे माझ्यासाठी शब्दात व्यक्त न करता येणारी पुंजी होती. साळसकर बाईंनी तर तुझे लेख वाचले अस म्हणून मलाच क्लीन बोल्ड केल. सावे सरांनी माझ्या लेखांच कौतुक फेसबुक वर केलच होत. पण आज पुस्तक हातात देताना त्यांचे कौतुकाचे बोल मला अजून प्रोत्साहित करणारे ठरले. लोपीस सर हा वेगळा विषय आहे. ज्या सरांना माझ्यासकट पूर्ण शाळा घाबरायची. त्यांच्या दोरीचे वेळ माझ्या पायावर कित्येक वेळा उठले असतील. त्या शिट्टीचा आवाज आला कि वर्गात पिन ड्रोप सायलेन्स असायचा. इतका धाक असणारे लोपीस सर फणसा सारखे आतून मृदू होते. कि आजही त्यांना स्टेज वर बोलावताच शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाउस पडला. माझे पुस्तक त्यांना देताना त्यांच्या सोबत फोटो काढण्याचा मोह मला आवरता आला नाही.
आज शाळेशी बोलायचं होत. पुन्हा एकदा बेंच वर बसून आयुष्याची १५ वर्ष जगलो. त्याच ठिकाणी. कस असते न रिवाइंड केल की आठवणी मुंग्यान प्रमाणे बाहेर निघतात. हे आठवू का ते अश्या गोंधळात पुन्हा एकदा निरोपाची वेळ येते. गेल्या वेळी निरोप घेतला त्याला २२ वर्ष झाली. आता निरोप घेताना पुन्हा कधी येईन हे माहित नाही. पण हा एक दिवस शाळेचा माझ्या आयुष्यात नक्कीच नेहमीच सोबत राहील. ज्या शाळेने मला उभ राहायला शिकवले. ज्या शिक्षकांनी विचारांना शिकवण दिली. त्यांच्या सोबत घालवलेला आजच्या दिवसातील प्रत्येक क्षण हा पुढच्या वाटचालीत अविस्मरणीय असेल ह्यात शंका नाही. माझ्या शाळेला आणि मला घडवणाऱ्या सर्व गुरुजनांना माझा साष्टांग दंडवत.

No comments:

Post a Comment