Thursday 24 August 2017

रॉकस्टार... विनीत वर्तक

रॉकस्टार ज्याला म्हणतात ज्याने आपल्या कामगिरीने जगाला वेड लावल असते. ज्याची प्रत्येक कामगिरी यशाने झळाळत असते. भारताचा खरा रॉकस्टार कोण असा प्रश्न केला तर अनेक लोक चित्रपटातील हिरोंची किंवा रॉक संगीतातील कोणाची नावे घेतील. पण ह्या सगळ्या पलीकडे आपल्या प्रतिभेने, कामगिरीने पूर्ण जगात कुतूहलाच विषय बनलेला एक भारतीय रॉकस्टार सध्या गाजतो आहे.
३९ सलग यशस्वी मोहिमा, २८ देशांचे २०९ विदेशी तर ४८ भारतीय उपग्रह आपल्या खांद्यावर वाहून प्रक्षेपित करणारा हा रॉकस्टार दुसरा तिसरा कोणी नसून भारतच वर्कहॉर्स किंवा पी.एस.एल.व्ही रॉकेट आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यावर इस्रो ने पी.एस.एल.व्ही. वर अजून जास्त लक्ष केंद्रित केल. दुसऱ्या स्टेज मधील सेपरेशन करताना हे अपयश आल. पण म्हणतात ना अपयश यशाची पहिली पायरी असते. त्या प्रमाणे पहिल्या अपयशाने खचून न जाता इस्रो ने पी.एस.एल.व्ही. मधील त्रुटी दूर केल्या. त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत ह्या रॉकेट ने आपल्या यशाचा आलेख इतक्या उंचीवर नेला कि त्याला आता दैवत्व प्राप्त झाल आहे. पहिल अपयश आणि एक अर्ध अपयश पलीकडे ह्या रॉकेट ने सगळ्या मोहिमा अगदी चोख फत्ते केल्या आहेत.
एकाच वेळी १०४ उपग्रह ह्या वर्षी प्रक्षेपित करून ह्या रॉकेट ने जागतिक विक्रम तब्बल तीन पटींनी मोडीत काढला. चंद्रयान तसेच मंगळ मोहीम फत्ते करताना भारताच्या अवकाश प्रगतीचा आलेख अटकेपार नेला. बर हे सगळ करताना आपल्या किमतीने कितीतरी देशांना तोंडात बोटे घालायला लावली आहेत. ९० कोटी रुपये प्रत्येक प्रक्षेपणाची किंमत असताना जगातील सर्वात स्वस्त पण त्याचवेळेस ९७% पेक्षा जास्ती यशाचा आलेख गेली २५ वर्षाहून शाबूत ठेवणाऱ्या रॉकेट कडे जगातील सगळ्या उपग्रह बनवणाऱ्या कंपन्या तसेच विद्यापीठ ह्यांच्या रांगा लागल्या नसतील तर नवलच.
२८ देश आणि त्यांचे २०९ उपग्रह हे सोप्प काम नाही. इकडे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे रॉकेट इतक टेलर मेड आहे कि ग्राहकाला जस हव तस, हव्या त्या कक्षेत तसेच उपग्रहाच्या असलेल्या आकाराप्रमाणे, वजनाप्रमाणे सगळे बदल करण्याची ह्याची क्षमता आहे. म्हणजे आपण जसे एखाद्या निष्णात टेलर कडे जाऊन अगदी भारीतल रेमंड च कापड द्यावं. आपण माप सांगू तस त्याने त्याचा कोट बनवावा. घातल्यावर तो अंगावर अगदी योग्य बसावा असच. हे सगळ करताना गेल्या २५ वर्षात आणि गेल्या सलग ३९ उड्डाणात १००% यशासह आपल्या गुणवत्तेच नाण खणखणीत वाजवत ठेवावं हे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. एकवेळ रेमंड चा कपडा दुसरा मिळेल पण हे तर रॉकेट विज्ञान आहे. म्हणूनच इकडच्या यशाची चव वेगळीच आहे. म्हणूनच ह्याला इस्रो च वर्कहॉर्स तर जगात रॉकस्टार म्हंटल जाते.
एकाच वेळी वेगवेगळ्या कक्षेतील उपग्रह असो. एकाच वेळी वेगवेगळ्या वजनाचे उपग्रह असो, एकाच वेळी १०४ उपग्रह असो. प्रत्येक वेळी दिलेल्या परीक्षेत त्याने पहिलाच नंबर काढला आहे. आता ह्या रॉकेट ची मागणी इतकी वाढली आहे कि इस्रो ने ह्याच्या कमर्शियल उड्डाणाची सुरवात केली आहे. इस्रो च प्रथम कर्तव्य हे देशाची प्राथमिकता आहे व त्या नंतर कमर्शियल रॉकेट उड्डाण. रॉकस्टार ची जागतिक बाजारात स्पेशली न्यानो आणि मायक्रो उपग्रहात इतकी आहे कि इस्रो ला आपल्या उद्दिष्ट पूर्ण करून उरलेल्या वेळात ती पूर्ण करणे अशक्य आहे. एका वर्षात १५-१७ उड्डाण इतकी हि मागणी आहे. पण इस्रो आपल्या उद्दिष्ठान वर काम करून हि मागणी पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच ह्याच तंत्रज्ञान भारतातील एखाद्या इंडस्ट्री कडे हस्तांतरण करून व्यापारिक स्वरूपात येणाऱ्या मागण्या पूर्ण करण्याचा इस्रो चा प्रयत्न आहे. ह्या रॉकेट चा दबदबा इतका आहे कि अमेरिकेतील रॉकेट इंडस्ट्री ला कायद्यात बदल करण्याची वेळ भासली. कारण रॉकस्टार च यश आणि त्याची किंमत ह्याची स्पर्धा सध्या तरी जगात कोणतेच रॉकेट करू शकत नाही आहे.
२६ मे १९९९ मध्ये पहिल्यांदा साउथ कोरिया व जर्मनी ह्या देशांनी पी.एस.एल.व्ही. वर विश्वास ठेवून आपले उपग्रह प्रक्षेपित करण्याची इस्रो आणि भारताला संधी दिली. त्यानंतर ह्याच्या यशाचा आलेख आणि जागतिक बाजारपेठेतील किंमत बघून अनेक देशांनी आपले उपग्रह पी.एस.एल.व्ही. च्या मार्फत प्रक्षेपित केले. जरी ह्यातून भारताला अगदी मोठ परकीय चलन मिळत नसल तरी ग्राहकाचा भारताच्या तंत्रज्ञानावरील विश्वास वाढतो आहे. ग्राहकाचा विश्वास हेच कोणत्याही धंद्याची वाढ करते. उद्या जेव्हा भारत मोठ परकीय चलन मिळवून देणार आपल सगळ्यात शक्तिशाली रॉकेट जी.एस.एल.व्ही मार्क ३ बाजारात उतरवेल तेव्हा हाच विश्वास पुढल्या करारांसाठी पहिली पायरी असणार आहे. म्हणूनच अस रॉकस्टार रॉकेट घडवणारे वैज्ञानिक आणि अभियंते तसेच सामान्य कामगार सुद्धा कौतुकास पात्र आहेत. तर पुन्हा एकदा ह्या रॉकस्टार रॉकेट साठी एकच वाक्य “यु जस्ट रॉक”...

No comments:

Post a Comment