Thursday, 24 August 2017

ऑपरेशन थंडरबोल्ट (ऑपरेशन इंटेबे)... विनीत वर्तक

जगात अतिरेक्यां विरोधी ज्या मोहिमा झाल्या त्यात ऑपरेशन थंडरबोल्ट ला सगळ्यात वरच स्थान आहे. ह्या मोहिमेच यश हे जास्ती उजळून निघते ते ज्या ठिकाणी सफल केल गेल त्यामुळे. आपल्या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आपण कोणत्याही परिणामानां सामोरे जाण्यास तयार आहोत. त्याचवेळी माणुसकीच्या शत्रूंचा नायनाट करायचा असेल तर जहाल भूमिकाच योग्य आहे. चांगला आतंकवाद आणि खराब आतंकवाद अस काही नसते. आतंकवाद हा माणुसकीचा शत्रुच आहे हा संदेश तब्बल ४० वर्षांपूर्वी ज्या मोहिमेने जगात गेला. ती म्हणजे ऑपरेशन थंडरबोल्ट.
२७ जून १९७६ रोजी एअर फ्रांस चे २४८ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान प्यालेस्टाईन च्या अतिरेकी संघटना Popular Front for the Liberation of Palestine – External Operations हिच्या दोन आतंकवाद्यांनी अपहरण केल. तेल अवीव वरून फ्रांस साठी उड्डाण भरलेलं विमान अन्थेंस, बेंगाझी द्वारे इंटेबे इकडे नेण्यात आल. युगांडा देशाने ह्या अपहरणाच समर्थन करत ह्या विमानातील आतंकवाद्यांना संरक्षण दिल. इदी अमीन ह्या युगांडा च्या नेत्याने स्वतःहून विमानतळावर ह्याचं स्वागत केल. एखाद्या पाहुण्याच स्वागत कराव असा हा समारंभ होता. ह्यानंतर सगळ्या अपहरण केलेल्या लोकांना जवळच्या बिल्डींग मध्ये बंदिस्त करण्यात आल. १४८ प्रवाशांना पुढल्या दोन दिवसात सोडून देण्यात आल. एअर फ्रांस चे १२ कर्मचारी आणि ९४ ज्यू इस्राइल नागरिक मात्र बंदी बनवण्यात आले.
४० प्यालेस्टाईन आतंकवादी तसेच १३ इतर देशातील कट्टर आतंकवादी ह्यांच्या सुटकेच्या बदल्यात ह्या प्रवाशांना सोडण्यात येईल अशी अट त्यांनी इस्राइल सरकारला घातली. इस्राइल हा छोटासा देश असला तरी आपल्या नागरिकांसाठी काही वाट्टेल ते करण्यास मागे पुढे बघत नाही. इस्राइल ने एकीकडे चर्चेची तयारी दर्शवताना दुसरीकडे एक वेगळच ऑपरेशन हाती घेतल. ह्या ऑपरेशन च मास्टर माइंड होती मोसाद. मोसाद च्या सांगण्यावरून इस्राइल डिफेन्स फोर्सेस च्या कमांडोनी ऑपरेशन थंडरबोल्ट हाती घेतल. ह्या नावातच खूप काही आहे. वीज जशी काही कल्पना न देता चमकते. तिचा तो लोळ प्रचंड उर्जेचा साठा घेऊन जमिनीवर असा काही झेपावतो कि काही कळायच्या आत सगळच बेचिराख झालेलं असते. हे सगळ घडून गेल्यावर त्याच्या आवाजाने आपल्याला कळते कि किती प्रचंड नुकसान झाल आहे.
१०० कमांडो ना घेऊन इस्राइल च्या प्लेन नी आकाशात भरारी न घेता जमिनीपासून फक्त ३० मीटर वर उड्डाण केल. इजिप्त, सुदान, सौदी अरेबिया ला त्यांच्या ऑपरेशन चा कोणताही थांगपत्ता लागू नये म्हणून हि काळजी घेण्यात आली. ४००० किमी च्या अंतरावर इंधन न भरता उड्डाण भरण शक्य नव्हत. अश्या वेळी कोणत्या तरी आफ्रिकन देशाची मदत हवी होती. हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता त्याकाळी इस्राइल कडे नव्हती. म्हणून मोसाद ने केनिया ची मदत घेतली. केनिया मध्ये इंधन भरून रात्री ११ च्या सुमारास हि कार्गो प्लेन इटेंबे इकडे उतरली. कार्गो प्लेन असल्याने कोणाला काहीच संशय आला नाही. उतरताच त्यातून इदी अमीन च्या गाडी सारख्याच मर्सिडीज गाड्या बाहेर आल्या. त्या मागे त्याच्या ताफ्या सारख्या गाड्या. ह्यामुळे संशय न येता ह्या गाड्या त्या बिल्डींग जवळ पोचल्या. नंतर त्यातून इस्राइल कमांडोनी सूत्रे आपल्या हातात घेत अतिरेक्यांवर विजेच्या लोळाप्रमाणे वार केला. सर्व बांधकाना सोडवून त्यांना प्लेन मध्ये सुरक्षित नेण्यात आल. युगांडा आर्मी ला ह्याचा सुगावा लागल्यावर त्यांनी इस्राइल कमांडो वर गोळीबार सुरु केला. ह्यात ५ कमांडो जखमी झाले. एक युनिट कमांडर योनातन नेतनयाहू शहीद झाले. इस्राइल चे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहू ह्यांचे सख्खे भाऊ.
सगळेच्या सगळे ७ अपहरणकर्ते ह्यात मारले गेले. तसेच त्यांना मदत करणारे जवळपास ४५ युगांडा चे सैनिक ह्यात मारले गेले. ११ लढाऊ विमान मिग-१७ आणि मिग-२१ नष्ट करण्यात आली. १०२ लोकांना वाचवण्यात आल. ३ मारले गेले तर एकाला युगांडा मध्ये सोडावं लागल. काही वेळातच १०२ लोकांना सुखरूप इस्राइल मध्ये उतरवण्यात आल. काही कळण्याच्या आत इस्राइल आणि मोसाद ने जगातील एका यशस्वी ऑपरेशन ला मूर्त स्वरूप दिल. युनायटेड नेशन ने नेहमी प्रमाणे हे ऑपरेशन देशाच्या सार्वभौमत्वा वरील हल्ला अस म्हंटल. पण आपल्या देशाच्या निष्पाप नागरिकांसाठी केलेलं ऑपरेशन थंडरबोल्ट हे गरजेच होत व वेळ पडल्यास आपण पुन्हा अस करू अस इस्राइल ने निक्षून सांगितल.
ऑपरेशन थंडरबोल्ट ला आता ४० वर्ष होत आली. पण आजही ह्या ऑपरेशन ला जगात सर्वोत्तम समजल जाते ते मोसाद ने केलेल्या प्लानिंग आणि इस्राइल कमांडो नी दाखवलेल्या बहादुरी बद्दल. मोसाद ने ज्या छोट्या छोट्या गोष्टी, बारकावे लक्षात ठेवून ह्या ऑपरेशन ची मांडणी केली होती त्याला तोड नाही. ४० वर्षा पूर्वी ४००० किमी लांब अस ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या मोसाद ला आजही जगातले सगळे देश म्हणून वचकून आहेत. २०१५ साली पंतप्रधान मोदी जी-२० परिषदेसाठी तुर्की ला गेले होते. भारताने एस.पी.जी., रॉ, आयबी ह्यांच्या एजंट सोबत मोसाद ला सुरक्षा देण्याची विनंती केली होती. इस्राइल ने विनंती स्वीकारून त्या पूर्ण दौऱ्यात पंतप्रधान मोदी च्या दौऱ्यावर लक्ष ठेवले होते.
ऑपरेशन थंडरबोल्ट मधून भारताने शिकण्यासारख खूप काही आहे. आपल्याकडे देशभक्ती ची कमी नाही. कमी आहे ती निडरता दाखवण्याची. आम्ही कोणाला डिवचवत नाही पण आम्हाला डीवचल तर सोडणार नाही. असा इस्राइल सारखा संदेश भारताने देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी एखाद्या अपहरणाची वाट बघण्याची गरज नाही. सर्जिकल स्ट्राईक हा असाच एक छोटा थंडरबोल्ट होता. पण आता एका मोठ्या थंडरबोल्ट ची नक्कीच गरज आहे. ४० वर्षापूर्वी आपल्या नागरिकांसाठी सर्व जगाची बंधन जुगारून ऑपरेशन थंडरबोल्ट यशस्वी करणाऱ्या सर्वच सैनिकांना माझा सलाम. ह्या ऑपरेशन वर चित्रपट पण निघाला असून तो बघितल्यावर आपल्याला ह्या ऑपरेशन ची थोडीफार कल्पना नक्कीच येईल.

No comments:

Post a Comment