Thursday 24 August 2017

अपंगत्वाला पांगळं बनवणारा माणूस, 'मेजर जनरल इयान कार्डोझो'... विनीत वर्तक

अपंगत्वाला पांगळं बनवणारा माणूस, 'मेजर जनरल इयान कार्डोझो'... विनीत वर्तक

'मेजर जनरल इयान कार्डोझो' हे नाव ऐकलं, की पहिला प्रश्न मनात येईल, की कोणाचं नाव आहे हे? भारतीय आहेत का? कारण आपली भारतीय असण्याची व्याख्या आधी आडनावावरून सुरू होते. आपल्याकडे नको त्या लोकांना हिरो बनवण्याची घाई असते. १० शतक मारणाऱ्या खेळाडूवर शाळेत धडा येतो किंवा १०० चित्रपट करणारा हिरो मिलेनियम सुपरस्टार बनतो. पण आपल्या जिद्दीपुढे अपंगत्वाला पांगळं करणारे मेजर जनरल इयान कार्डोझो मात्र भारतीयांना कधीच दिसत नाहीत.

इयान कार्डोझो '५ गोरखा रायफल'मध्ये १९७१ सालच्या युद्धाच्या वेळी मेजर या हुद्द्यावर कार्यरत होते. युद्धात मेजर इयान कार्डोझो यांचा पाय लँडमाईनवर पडला. त्यावेळी झालेल्या स्फोटात त्यांच्या पायाला प्रचंड जखमा झाल्या. त्यांना त्या अवस्थेत जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या पायाच्या जखमा इतक्या होत्या, की पाय कापण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता, तेव्हा मेजर इयान कार्डोझो यांनी तिथल्या डॉक्टरला विचारलं, 'तुमच्याकडे मॉर्फीन आहे का बेशुद्ध करण्यासाठी?'. डॉक्टर म्हणाले, 'नाही'. मग त्यांनी विचारलं, 'तुम्ही माझा पाय कापू शकाल का?' डॉक्टर म्हणाले, 'आमच्याकडे काहीच हत्यार नाही, की आम्ही ऑपरेशन करू शकू'. एका सेकंदाचा विलंब न लावता त्यांनी जवळच असलेल्या आपल्या सैनिकाला बोलावलं, आणि विचारलं, “माझी खुकरी कुठे आहे”? त्याने क्षणाचा विलंब न लावता त्यांना आणून दिली. त्या सैनिकाला मेजर इयान कार्डोझो यांनी सांगितलं, 'या खुकरीने माझा पाय काप'.

रक्ताच्या थारोळ्यात पूर्ण पाय आणि असंख्य वेदना असताना त्या सैनिकालाही खुकरीने पाय कापण्याचं धैर्य झालं नाही. त्याने तसं करण्यास नकार दिला. दुसऱ्या क्षणी मेजर इयान कार्डोझो यांनी खुकरी आपल्या हातात घेतली, स्वतःच्या हाताने आपला पाय कापल्यावर ऑर्डर केली, की 'जा, आता ह्याला दफन करा'. स्वतःचा पाय स्वतःच्या हाताने कापायला काय धैर्य लागत असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. इथवर मेजर इयान कार्डोझो थांबले नाहीत, आता कापलेल्या भागावर शस्त्रक्रियेची गरज होती. कमांडींग ऑफिसरने त्यावेळेस म्हंटलं, की “तू खूप लकी आहेस. आत्ताच आम्ही युद्धात एका पाकिस्तानी सर्जनला बंदी बनवलं आहे, तो तुझ्यावर शस्त्रक्रिया करेल", त्यावर मेजर इयान कार्डोझो यांनी सांगितलं, माझ्यावर कोणताही पाकिस्तानी डॉक्टर शस्त्रक्रिया करणार नाही. मला माझा भारत परत हवा आहे. अरे, कुठून येते ही देशभक्ती, आणि हा जाज्वल्य देशाभिमान!  आपण करंटे आहोत, आपल्यांत ह्याच्या एक शतांशही देशाचा अभिमान नाही.

मेजर इयान कार्डोझो यांना दुसरीकडे हलवण्यासाठी युद्धामुळे चॉपरही मिळत नव्हतं. तेव्हा त्यांनी दोन अटींवर आपल्या कमांडींग ऑफिसरला स्वतःवर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. त्यातली पहिली गोष्ट होती, ती म्हणजे, एक वेळ मेलो तरी चालेल पण माझ्या रक्तात पाकिस्तानी माणसाचं रक्त मिसळणार नाही. दुसरी म्हणजे,  पूर्ण शस्त्रक्रियेच्या वेळी कमांडींग ऑफिसर म्हणजे ते स्वतः, ती पूर्ण होईपर्यंत समोर राहतील. यामागे कारण होतं, की त्याकाळी भारतीय सैनिकांना शस्त्रक्रियेच्या वेळी त्रास देण्याचे प्रकार पाकिस्तानी डॉक्टरकडून घडले होते. या दोन अटींचा मान ठेवून मेजर मोहम्मद बशीर यांनी मेजर इयान कार्डोझोवर शत्रक्रिया केली.

त्या पायाच्या जागेवर मेजर इयान कार्डोझो यांना लाकडी पाय बसवण्यात आला. युद्ध संपलं, पण पुढे काय? मेजर आपल्या जबाबदाऱ्या पूर्वीसारख्या पूर्ण करू शकणार नाही असं म्हणत डॉक्टरांनी अपंगत्वाची जाणीव त्यांना करून दिली, पण मेजरनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपली शारीरिक क्षमता वाढवायला सुरूवात केली. एक लाकडाचा पाय असणाराही दोन सामान्य पाय असणाऱ्या लोकांपेक्षा वरचढ ठरू शकतो, हे सिद्ध करण्याचा मेजरनी चंग बांधला. भारतीय सेनेच्या शारीरिक चाचण्यातून जाण्यास डॉक्टरांनी त्यांना मनाई केली. पण त्यांच्या इच्छेपुढे आणि जिद्दीपुढे डॉक्टर नमले. त्या चाचणीत मेजर इयान कार्डोझो यांनी ७ ऑफिसरना मागे टाकले. हे सातही ऑफिसर सामान्य पाय आणि फिजिकली फिट असणारे होते.
एकदा त्यांनी आर्मीच्या व्हाईस चीफना विचारलं, मी अजून काय करू शकतो? त्यावर ते म्हणाले, माझ्यासोबत जम्मू आणि काश्मीर ला इथून चल. आर्मी व्हाईस चीफ ६००० फुट उंचीवर हेलिकॉप्टरने पोहोचण्याअगोदर मेजर इयान कार्डोझो हे, तो रस्ता पायी चढून गेले. हे बघून त्यांची केस त्यांनी त्या काळी भारताचे सैन्य प्रमुख टी.एन.रैना यांच्याकडे पाठवली. सैन्य प्रमुखांनी त्यांना त्यांच्यासोबत लडाखला येण्याचा आदेश दिला. लडाखला डोंगरात आणि बर्फात चालताना बघून सैन्य प्रमुखांनी त्यांना बटालियनची (एका बटालियन मध्ये १०० ते २०० सैनिक असतात) कमांड दिली. अश्या प्रकारे ते भारतीय सैन्यातील पहिले अपंग कमांडिंग ऑफिसर बनले. त्यानंतरही अनेक स्पर्धेत आणि कामात एखाद्या धडधाकट ऑफिसरला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली. त्यांच्या या अतुलनीय जिद्दीला सलाम म्हणून त्यांना ब्रिगेडची जबाबदारी देण्यात आली (एका ब्रिगेडमध्ये ४००० इतके सैनिक असतात).

'आपला स्वतःचा पाय का कापला?', असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, की मला लाचार व्हायचं नव्हतं. त्या तुटलेल्या पायाचं ओझं मला वाहायचं नव्हतं. पाय गेला म्हणून मी संपलो नव्हतो, माझ्यात तीच धमक बाकी होती, माझ्यात तोच सैनिक जिवंत होता, माझ्यातली विजीगीषु वृत्ती जिवंत होती, मग घाबरायचं कशाला? अपंगत्वाला त्यांनी आपल हत्यार बनवलं. मग जे मिळवलं, तो इतिहास आहे. या हिरोने तरुण पिढीला जो संदेश दिला आहे, तो त्यांच्या शब्दांत, 

 “You have only one life to live, live it to full. You have 24 hours in a day: Pack it up”. 

अपंगत्वालाही पांगळं बनवणाऱ्या  या जिगरबाज, शूरवीर, पराक्रमी सैनिकी अधिकाऱ्याला माझा साष्टांग दंडवत. देशभक्ती काय असते, ते अश्या मेजर जनरल इयान कार्डोझोचं आयुष्य बघितल्यावर कळते. तुम्ही दुसऱ्या मातीचे आहात सर. आम्ही करंटे म्हणून जन्माला आलो, आणि तसेच जाऊ. पण अपंगत्वालाही पांगळं करणारे तुमच्या शसारखे अधिकारी भारतीय सैन्यात आहेत, म्हणून आज भारत अखंड आहे. तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांना माझा पुन्हा एकदा दंडवत.

No comments:

Post a Comment