Thursday, 24 August 2017

पाण्यातील पाउस... विनीत वर्तक

तो आला, तो कोसळला, त्याने जिंकल असच काहीस आज वातावरण आहे. अर्थात दरवेळी तेच असते. तो येतो तेव्हा त्याच रूप कित्येकांना मोहून टाकते. त्याचा वेगळाच रुबाब आणि आपल्या सोबत तो इतक काय घेऊन येतो कि घेणाऱ्याला जास्ती वाटते. असाच तो बेभरवशाचा पण आला कि मोहून टाकणारा. तोच तो पाउस. मी कित्येक वेळा त्याला अनुभवल आहे आपल्या सगळ्यान प्रमाणेच. दरवेळी त्याला एका वेगळ्या रुपात पण अनुभवतो. ते रूप म्हणजे त्याच पाण्यातल रूप.
कामाच्या निमित्ताने खूप वेळा एक वेगळ जग मला अनुभवायला मिळाल आहे. सर्वसामान्य लोकांनी कधी न बघितलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टी अनुभवायला मिळालेल्या आहेत. पाउस पण त्यातलाच. नजर जाईल तिकडे पाणी आणि त्या पाण्यात कोसळणारा तो बघताना वेगळच वाटते. त्याला कोणताच अटकाव नसतो. तो झेप घेतो ते त्याच्याच स्वतःच्या रुपात विलीन होण्यासाठी. जिथून त्याचा जन्म झाला त्याच्यात तो पुन्हा स्वतःला विरघळवून टाकताना बघण खूपच वेगळ असते. मध्ये कोणताच अडसर नाही न झाडांचा, न मानवनिर्मित वस्तूंचा, न जमिनीचा. कोसळायच ते फक्त आपल्या जन्मस्थानात विरघळून जायला.
काल रात्री हेलीडेक वर फिरतानाच तो येणार त्याची चाहूल लागली होतीच. काळे ढग आसमंतात आपल अस्तित्व दाखवत होते. अंधार होताच त्या काळ्या ढगांनी चंद्राच अस्तित्व झाकून टाकल. विजेचा लखलखाट सर्व आसमंतात सुरु होता. इकडे वीज कोसळताना बघताना भीती पण वाटते. इकडे आकर्षून घेणार काही नसत तेव्हा विजेचा लोळ असा आवाज करत पाण्यात उडी मारतो. तेव्हा त्या प्रकाशात आणि आवाजात मनात थरकाप उडतो नक्कीच. पण त्या क्षणापुरताच. पुन्हा सगळ शांत होते. ऐकू येतो तो माणसाच्या अस्तित्वाचा आवाज करणारी रिग आणि समुद्राच्या लाटांचा आवाज.
आज सकाळपासून तो कोसळत होता. मस्त समुद्राला उधाण आल आहे. समुद्राच उधाण बघायचं असेल तर अस समुद्राच्या मध्ये रहाव. मग त्याचा अंदाज येतो. हेलकावे खाणाऱ्या बोटी कधी कधी पाण्यात गुडूप होतात तर कधी पाण्याच्या वर जातात. त्यांना आपटणाऱ्या लाटा इतक्या ताकदीच्या असतात कि बोटींची दिशा पण बदलवून टाकतात. सगळ्यात रोमांच येतो तो लाटांचा प्रवास बघताना नजर जाईल तिकडे नीळ पाणी क्षणक्षणाला एकसुरात अस खाली वर होत वेगाने पुढे जात असते. त्याच्या मध्ये जे काही येईल त्याला धडक देत त्यांचा प्रवास सुरूच रहातो. जस काही सैन्याची कवायत सुरु असताना एकसुरात, एकतालात सर्वच पुढे जात असतात.
खूप धुंद करणार वातावरण नेहमीच आपण एकटे असल्याची जाणीव करून देते. खर तर अश्या वेळी आपण स्वतःशीच जास्ती बोलू लागतो. त्या क्षितिजाकडे बघताना आपल्यात हरवून जातो. कधीतरी सुई प्रमाणे टोचणारा पाउस पुन्हा एकदा आपल्याला भानावर आणतो. भिजण्याची मज्जा इकडेच. कोणताच आडोसा मिळत नसताना बेधुंद होऊन भिजण हे मात्र अनुभवयाला पाण्यातला पाउस अंगावर घ्यायलाच हवा. पाण्यातल्या पावसाचा अंदाज येत नाही. पाण्याचे ओघळ कुठे दिसत नाहीत त्यामुळे पाउस किती जोरात आहे ह्याचा अंदाज येत नाही. म्हणून तर त्यात भिजण्याची एक वेगळीच मज्जा येते. कितीही भिजलं तरी थोड कमीच आहे असच वाटत रहाते.
स्वतःशी बोलायला लावणारा हा पाण्यातला पाउस दरवर्षी अनुभवायला मिळण म्हणजे माझ भाग्यच. अर्थात एकटेपणाची जाणीव पण तो तितकीच दरवर्षी न चुकता करून देतो. लहानपणी कागदाच्या होड्या करून चिखलाच्या पाण्यातून सोडताना वेगळीच मज्जा यायची. आज खऱ्या बोटी आणि फिशिंग बोटी ह्या अथांग समुद्रात बघताना बालपणाचे तेच क्षण समोर उभे राहिले. त्या कागदाच्या होडीतील मज्जा आज मी त्या बोटींकडे बघून अनुभवत होतो. स्वतःशीच खूप काही बोलत होतो. पावसात मनसोक्त भिजत होतो. त्याचा तो सुई प्रमाणे रुतणारा स्पर्श एक वेगळीच शिरशिरी अंगात निर्माण करत होता. पण रिग च्या आवाजाने भानावर आलो. ज्या कामाने हा पाण्यातला पाउस अनुभवायची संधी दिली त्याची वेळ झाली होती. पुन्हा एकदा मनोमन सगळ अनुभवून त्या पाणातल्या पावसाला मनोमन आभार मानून माझी पावल कामाकडे वळवली.

No comments:

Post a Comment