Thursday 24 August 2017

आय इन द स्काय... विनीत वर्तक

आय इन द स्काय... विनीत वर्तक

येत्या २३ जून रोजी इस्रो पुन्हा एकदा नवीन उड्डाणासाठी सज्ज होत आहे. यावेळेस भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या 'कार्टोसॅट-२' या उपग्रहाचं प्रक्षेपण आपल्या वर्कहॉर्स म्हणजेच 'पी.एस.एल.व्ही-सी३८' रॉकेटच्या साहाय्याने करत आहे. या उपग्रहाला भारताचा आकाशातील डोळा असं म्हटलं जात आहे. 'कार्टोसॅट-२' हा एक पाळत ठेवणारा उपग्रह असणार आहे. गुप्तहेराप्रमाणे शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर त्याची करडी नजर असणार आहे.

'कार्टोसॅट-२' ला पोलार सन सिंक्रोनाइज्ड कक्षेत सोडण्यात येणार आहे. जमिनीपासून ५०५ किमी अंतरावर या उपग्रहाची कक्षा असणार आहे. इकडे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक की या उपग्रहाला काही दिवसांपूर्वी सोडलेल्या रॉकेट मधून का नाही सोडण्यात आलं? दुसरं, त्यासाठी वेगळ्या रॉकेटची गरज का? तर काही दिवसांपूर्वी प्रक्षेपण झालेला 'जीसॅट-१९' हा भूस्थिर उपग्रह आहे. याचा अर्थ साध्या भाषेत असा आहे, की पृथ्वीच्या परिवलनाचा वेग आणि उपग्रहाचा वेग हा सारखा आहे. त्यामुळे हा उपग्रह पृथ्वीवरून ध्रुव ताऱ्यासारखा एकाच ठिकाणी स्थिर दिसेल. ह्याची कक्षा साधारण ३६,००० किमी वरून जाते. पण 'कार्टोसॅट-२' हा पोलार उपग्रह आहे. हा अश्या पद्धतीने भ्रमण करतो, की सूर्याच्या त्या भागातल्या वेळेप्रमाणे तो प्रवास करतो. म्हणजे मुंबईत जर दुपारी ३ वाजता हा उपग्रह आपल्या डोक्यावर असेल, तर तो शांघायमध्येही दुपारी ३ वाजता असेल. म्हणजे पृथ्वीच्या ज्या भागावरून सूर्य प्रवास करेल. त्याच भागावरून त्याच वेळी हा उपग्रह प्रवास करेल. 

'कार्टोसॅट-२' हा रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे. ह्यावर पॅनक्रोमॅटिक कॅमेरा बसवलेला आहे. हा कॅमेरा अतिशय high रीझोलुशनचा आहे. ०.६५ मीटरपेक्षा कमी ह्याची रेंज आहे. म्हणजे ५५० किमीवरून ०.६५ मीटर पेक्षा कमी भागात घडणाऱ्या घटनांचे सुस्पष्ट फोटो घेण्याची याची क्षमता आहे. हा कॅमेरा ४५ अंशातून फिरवता येऊ शकणार आहे. म्हणजे आपल्याला हव्या त्या भागाचे हव्या त्या ठिकाणावरून फोटो काढण्याची क्षमता असणार आहे. १२६ दिवसात १८६७ वेळा पृथ्वीभोवती फिरून पूर्ण जगाचं निरीक्षण करण्याची क्षमता ह्याची आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे, की जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात चाललेल्या गोष्टी तो आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी बंदिस्त करणार आहे. प्रत्येक १२६ दिवसात एखाद्या ठिकाणी झालेले बदल टिपण्यास हा सक्षम आहे. तसेच ह्याच्या स्टीअरिंग कंट्रोलमुळे हा वेळ कमी जास्तही करता येणार आहे.

भारताचा सर्जिकल स्ट्राईक अगदी बुल्स-आय(नेमका) असण्यामागचं खरं कारण होतं, 'कार्टोसॅट-१' ने दिलेले डोळे. ह्या उपग्रहाच्या मदतीने भारतीय सेनेला दशहतवादी कुठे लपले आहेत? किती आहेत? त्यांची हालचाल? त्यांचा दारुगोळा याची खडानखडा माहिती सतत लाइव्ह मिळाली होती. आकाशातून कोणाला कळून न देता हा उपग्रह सतत ह्या गोष्टींवर नजर ठेवून होता. म्हणूनच एकही सैनिक न गमावता ६० पेक्षा जास्ती दहशतवाद्यांचा खात्मा आणि एकाच वेळी मल्टीपल टार्गेटवर हल्ला करण्यात भारतीय सेनेला यश आलं. 'कार्टोसॅट-२' मुळे अजून एक डोळा संरक्षणाच्या दृष्टीने भारतीय सेनेला मिळणार आहे. इकडे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे, की जगातील मोजक्याच देशांकडे हे तंत्रज्ञान आहे. भारताचा नंबर यात खूप वरचा आहे. ह्या उपग्रहाचं काम हे फक्त सैनिकी आणि संरक्षणासाठी न राहता सामान्य लोकांसाठीही खूप मोठी उपलब्धी असणार आहे. अनेक शासकीय संस्था आपल्या कामासाठी 'कार्टोसॅट'च्या फोटोचा वापर करत आहेत. कोणतंही विकासाचं काम करण्यासाठी त्या भागाचा नकाशा काढण्यासाठी अनेक वेळा त्याचं सर्वेक्षण करावं लागत होतं. पण 'कार्टोसॅट'मुळे हे काम कोणतंही मनुष्यबळ वाया न घालवता होत आहे. ह्यामुळे इस्रोकडेही मागणी अश्या उपग्रहांनी काढलेल्या फोटोसाठी होत आहे.

'कार्टोसॅट-२' जगातील सर्वोत्तम रिमोट सेन्सिंग उपग्रहांपेकी एक आहे. ज्या गोष्टी भारतासाठी महत्वाच्या असणार आहेत, म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल किंवा इतर सेन्सिटिव्ह भाग, त्यांचे नुसते फोटो काढून हा उपग्रह थांबत नाही, तर त्याच व्हीडीओ रेकोर्डिंग करून ते कॉम्प्रेस करून पुन्हा पृथ्वीवर पाठवण्याची ह्याची क्षमता आहे. तसंच १०० से.मी. चं रिझोल्युशन असणारे फोटो काढण्याची याची क्षमता आहे. याआधी भारताला असे फोटो काढण्यासाठी अमेरिकेला २० डॉलर प्रती किमी भाडे द्यावे लागत होते. आता भारत स्वबळावर हे करू शकतो आहे.

भारतीय राजकारणात पुरावा मागण्याची चढाओढ सुरूच असते. सर्जिकल स्ट्राईक केल्यावर सैन्याच्या मनोबलाचं खच्चीकरण ह्याच राजकारण्यांनी पुरावा मागून केलं होतं. कधीकधी अश्या राजकारण्यांकडे दुर्लक्ष करणं जास्तीच चांगलं, पण काहीवेळा असे पुरावे ठेवावे लागतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली बाजू भक्कम करण्यासाठी. पण त्याहीपलीकडे असे डोळे लागतात, की जे शत्रूला काही सुगावा लागू न देता शत्रूच्या प्रत्येक हालचालीची माहिती आपल्या देशातील सैनिकांना पुरवत राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी शोधलेल्या गनिमी काव्याला यशस्वी केलं होतं, ते त्यांच्या गुप्तहेरांनी. शत्रूला कोणतीही कल्पना न देता वार करण्यासाठी शत्रूच्या प्रत्येक हालचालीची माहिती आपल्याला ठेवावी लागते. हि माहिती असल्यावर गनिमी पद्धतीने केलेला वार सगळ्यात जास्ती घायाळ करतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच उमगलं होतं. आज ४०० वर्षांनी पुन्हा एकदा त्याच गनिमी काव्याचं उदाहरण आपण सर्जिकल स्ट्राईकमध्ये बघितलं. फरक इतकाच त्याकाळी जमिनीवरून गुप्तहेर होते, आज इस्रोमुळे आपण आकाशातून गुप्त डोळ्यांनी ते बघू शकलो. म्हणूनच येणाऱ्या काळात शत्रूला चारी मुंड्या चित केलं, तर त्यामागे ह्या आकाशातील डोळ्यांचा मोठा वाटा असणार आहे, यात शंका नाही.

तळटीप :- ही सर्व माहिती गुगल आणि इन्टरनेटवर उपलब्ध आहे. कोणतीही गोपनीय माहिती यात उघड करण्याचा हेतू नसून आपल्या देशाला सुसज्ज ठेवणाऱ्या संस्थांचा आणि उपकरणांबद्दल सर्वसामान्य माणसाला माहिती देण्याचा या लेखाचा हेतू आहे.

No comments:

Post a Comment