Thursday 24 August 2017

हायड्रोजन फ्युल वेह्कल.. एक नवीन सुरवात... विनीत वर्तक

अनेकदा आपल्या मनात प्रश्न उभा रहातो कि अवकाशा मध्ये धडपडण्यासाठी इस्रो सारख्या अवकाश संस्था इतके पैसे खर्च आणि संशोधन करत असतात. त्याचा सामान्य माणसाला काय फायदा? किंवा त्यांच्या ह्या संशोधनाने तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? आता कोणी असा विचार करत असेल कि इस्रो ने क्रायोजेनिक इंजिन बनवल पण त्याने आमची गाडी थोडीच चालणार आहे का? आमची एस.टी. किंवा पी.एम.टी. किंवा बी.एस.टी. ह्या गाड्या चालणार असतील तर आम्हाला त्याचा फायदा. तर ह्याच उत्तर होय असच आहे. अगदी क्रायोजेनिक इंजिन जरी ह्या गाड्यात लागणार नसल तरी क्रायोजेनिक इंजिन बनवताना केलेल्या असंख्य अभियांत्रिकी संशोधनातून सामान्य माणसाच आयुष्य बदलवून टाकणाऱ्या गोष्टी समोर येत असतात.
क्रायोजेनिक इंजिन बनवताना लागणार इंधन म्हणजेच लिक्विड हायड्रोजन. मग ह्या हायड्रोजन ला आपण इंधन म्हणून वापरू शकलो तर? ह्याच उत्तर होत हायड्रोजन फ्युल वेह्कल. हायड्रोजन चा वापर इंधन म्हणून करू शकतो हे आधीच सिद्ध झालेलं होत. पण त्याचा इंधन म्हणून वापर करण तितक सोप्प नाही. पेट्रोल आणि डीझेल सारख इंधन नुसत जाळून त्या पासून उर्जा निर्माण करत अनेक विषारी वायू आसमंतात सोडत हे इंजिन चालत नाही. तर ह्याच्या अगदी विरुद्ध ते चालते. हायड्रोजन फ्युल वेह्कल असते झिरो एमिशन. म्हणजे ह्यातून उत्पन्न होणारा कोणताच घटक निसर्गात कार्बन उत्सर्जन करणारा नसतो. ह्याचे बाय प्रोडक्ट असतात पाणी आणि हिट.
कम्प्रेस्ड केलेल्या हायड्रोजन सोबत हवेतील ऑक्सिजन चा संयोग घडवून आणला जातो. ह्या केमिकल प्रोसेस मध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. ह्याचा वापर करून इलेक्ट्रिक मोटार चालवली जाते. ह्या इलेक्ट्रिक मोटार ने वेह्कल. अर्थात वाचाताना हे सोप्प वाटत असल तरी हायड्रोजन च विघटन तसेच तो स्टोअर करणे अतिशय कठीण आहे. तसेच एखाद्या गाडी मध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा आणि एकंदर गाडीचा वेग, त्याची भार वाहून नेण्याची क्षमता, त्यात प्रवास करणाऱ्या लोकांची सुरक्षा आणि सगळ्यात महत्वाच त्याला द्यावी लागणारी किंमत ह्या सर्व गोष्टींचा विचार करून अशी एखादी यंत्रणा किंवा गाडी बनवण सोप्प मुळीच नाही.
इस्रो कडे हायड्रोजन ला ताब्यात आणि त्याचा वापर कसा करावा ह्या विषयाची सगळी मांडणी होती. पण गाडीतील त्याच्या नियोजनासाठी त्याच क्षेत्रातील एखाद्या निष्णात कंपनीची गरज होती. स्कूटर वर जाणाऱ्या ३ माणसाना बघून जिद्दीने नफा-तोट्याचा विचार न करता भारतीयांसाठी जगातील सर्वात स्वस्त कार बनवणाऱ्या टाटा मोटर्स ने ह्याही वेळेस पुढाकार घेतला. २००६ साली टाटा मोटर्स लिमिटेड व इंडिअन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो मध्ये करार झाला. गेले एक दशक ह्यावर काम केल्यावर भारतातील वाहतूक व्यवस्था, भारतातील प्रदूषण, भारतातील कार्बन उत्सर्जन ह्या सगळ्यात अमुलाग्र बदल करण्याची ताकद असलेली भारतातील पहिली हायड्रोजन फ्युल बस रस्त्यांवर काही दिवसांपूर्वीच धावली.
ह्या बस साठी लागणारी हायड्रोजन स्टोअर आणि फ्युल सेल ह्याच तंत्रज्ञान इस्रो तर बस चा आराखडा व त्याची बांधणी टाटा मोटर्स ने केली आहे. २०१५ साली जगात पहिली हायड्रोजन कार आलेली असताना २०१७ मध्ये भारताने स्वबळावर हायड्रोजन फ्युल बस रस्त्यावर आणावी हे खूप मोठ परिवर्तन आहे. कारण अस तंत्रज्ञान प्रगत देश विकत नसतात किंवा विकल तरी त्याची किंमत खूप जास्त असते. ह्या बस चा सगळ्यात मोठा फायदा असणार आहे तो म्हणजे ह्यातून उत्सर्जन होणार ते फक्त पाणी. जर भारतीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ह्या बसेस आणल्या तर किती करोडो रुपयांचं इंधन तर वाचेलच पण त्या सोबत निसर्गाची हानी आपण प्रचंड प्रमाणात कमी करू शकणार आहोत. अर्थात हि सुरवात आहे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरायला वेळ लागेलच.
अनेकदा आपल्या समोर येणाऱ्या अनेक नवीन तंत्रज्ञाना बद्दल अनभिज्ञ असतो. त्याचा मूळ उगम कुठे झाला ह्या बद्दल काही माहित नसल्याने अनेक महाभाग ४५० कोटी रुपये मंगळ मोहिमेसाठी का खर्च केले? अथवा ६५० टनाच रॉकेट सोडून काय दिवे लावले? अस म्हणण्यात दिवस सार्थकी लावत असतात. पण ह्या मोहिमेतूनच आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या शोधांना जन्म देत असतो हे विसरू नये. आपल संशोधन नुसत मोठ्या मोहिमांसाठी न ठेवता सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या तसेच भारताच्या ग्रीन ऊर्जेकडे जाणाऱ्या पावलांना बळ देणार हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या इस्रो च्या वैद्नानिकांच अभिनंदन तसेच अश्या प्रयोगांना नफा- तोटा न बघता त्यात देशसेवा अस मानून पहिली हायड्रोजन बस तयार करणाऱ्या टाटा मोटर्स च्या अभियंत्यांना सलाम. हायड्रोजन ची हि नवी सुरवात आपल्याला एक अखंड ग्रीन उर्जेचा पुरवठा करणारी असू देत ह्याच आशेवर त्याच स्वागत.

No comments:

Post a Comment