Thursday 24 August 2017

द इंटर्न... विनीत वर्तक

द इंटर्न... विनीत वर्तक

आयुष्याच्या अनेक पदरांचा वेध हॉलीवूडमधले जितके चित्रपट घेतात, तितके क्वचितच बॉलीवूड मधले घेतात. येत्या काही वर्षांमध्ये बॉलीवूड प्रेमाच्या बाहेर जाऊन चाकोरीबाहेरचे विषय हाताळायला लागला आहे. हॉलीवूड चित्रपटात आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे गोष्टी अतिरंजित न करता, अगदी जितक्या सध्या आणि सरळ पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न. काही अपवाद असतील, पण या अपवादात न मोडता जेष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील अनेक पदर उलगडणारा चित्रपट म्हणजे 'द इंटर्न'.

वयाच्या सत्तरीला आयुष्य पूर्णपणे उपभोगलेला एक सामान्य माणूस, अचानक आलेलं एकाकीपण पचवू शकत नाही. मग ते आपल्या साथीदाराचं सोडून जाणं असो, किंवा ४०-५० वर्षं रोजच्या शिरस्त्यातून मिळालेली सवड असो, ते पचवणं किती त्रासदायक आणि एकटं असू शकतं, याचा अंदाज आपण या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेवरून लावू शकतो. खरं तर चित्रपटाची सुरूवातच यामधून होते, की ज्येष्ठ नागरिकाच्या भूमिकेत प्रवेश केलेला असताना, मुला बाळांची कर्तव्यं पूर्ण केली असतानाही, आयुष्याच्या उत्तरार्धात खूप सवड असताना पुन्हा एकदा आपण एक वेगळी सुरूवात कशी करू शकतो, अश्या संभ्रमावस्थेत बेन असतो.

सगळं मिळालं असूनसुद्धा बेन पुन्हा इंटर्नशिपसाठी अर्ज भरतो. वयाची ४० वर्षं ज्याठिकाणी काम केलं, त्याच ठिकाणी त्या कंपनीचं अस्तित्व पुसलं गेलं असताना एका नव्या दमाच्या आणि पूर्णतः वेगळ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कंपनीमध्ये एक इंटर्न म्हणून काम सुरु करताना रॉबर्ट डीनेरोने पात्रात जीव ओतला आहे. जुन्या जमान्यातलं ऑफीस कल्चर ते नवीन पिढीचं ऑफीस कल्चर याचा सुरेख मेळ चित्रपटात साधला आहे. मग अगदी ती बेनची ब्रीफकेस असो, वा त्याचा सूटचा पेहराव असो. सगळीकडे त्याच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा तो पंच चित्रपटाच्या शेवटपर्यंत आपल्याला जाणवत राहतो. त्याच वेळी नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करणारी स्वतःची स्टार्टअप कंपनी उघडणारी ज्युल्स म्हणजेच ऍना हॅथवे फेसबुकच्या पिढीचं प्रतिनिधित्व करते. मग ते ऑफिसचा सेटअप, तिथलं वातावरण किंवा तिचं ऑफिसमधलं सायकलमधून वावरणं असो.

बेन जेव्हा ज्युल्ससाठी काम करायला लागतो. तेव्हा नकळत तिच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतो. हे आकर्षित होणं शारीरिक नसतं, तर तिच्या एकूण व्यक्तिमत्वाची पडलेली ती छाप असते, व हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात चित्रपट कमालीचा यशस्वी झाला आहे. बेनचं अगदी प्रांजळपणे कबुल करणं असो, वा तिच्याकडे बघणं असो, अश्लीलतेचा लवलेशही मनात न येता अश्या भावना जिवंत करणं म्हणजे क्लास. चित्रपट म्हणूनच वेगळी उंची इथे गाठतो असं मला वाटतं. बेनच्या फियोनाबद्दलच्या फिलिंग मात्र त्याच वेळी वेगळ्या असतात. या दोन व्यक्तिमत्वांबद्दल वाटणाऱ्या भावनांना वेगळं करण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे.

चित्रपटात मला काय आवडलं, तर माणसाच्या उत्तरार्धात येणाऱ्या समस्या, वाटणाऱ्या भावना, सगळं असून काहीतरी नसल्याची जाणीव, त्याच वेळी अगदी शारीरिक भावनांपासून ते अगदी किशोर, वयात आलेल्या मुलासारखं स्त्रीच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होणं हे सगळं इतक्या सुंदर पद्धतीने दाखवलं आहे, की चित्रपट मनात पोहोचतो. ज्युल्सच्या कंपनीमधील उलथापालथी, व्यक्तिगत आयुष्यात असलेले आणि निर्माण झालेले प्रश्न, एक नोकरी करणारी स्त्री ते आई आणि घरी असणारा नवरा या सगळ्या लेवल सांभाळताना होणारी घुसमट. त्याच वेळी बेनचं आयुष्यात येणं. बेन ज्युल्सला ह्यातून बाहेर काढतो का? बेन आणि जुल्सचं पुढे काय होतं, ते चित्रपटात बघणंच उत्तम. रॉबर्ट डीनेरो मला मुरलेला अमिताभ बच्चन वाटतो. जसा अमिताभचा क्लास वेगळा, तसाच डीनेरोचा. संवाद बोलण्याची सहजता ते कॅमेरा समोर वावरण्याची सहजता क्लास आहे. 'द इंटर्न' संपताना अनेक प्रश्न आणि अनेक उत्तरं देऊन जातो. चित्रपट बघताना ती एक कथा म्हणून बघायची, की त्यातल्या तरल भावना अनुभवायच्या हे मात्र प्रेक्षक म्हणून आपण ठरवायचं.

No comments:

Post a Comment