Thursday 24 August 2017

ग्रेव्हीटेशनल वेव्ह विश्वाचा एक नवीन दरवाजा... विनीत वर्तक

 जानेवारीत अमेरिकेतील लिगो (The Laser Interferometer Gravitational-wave Observatory ) ह्या प्रयोगशाळेने तिसरी ग्रेव्हीटेशनल व्हेव (गुरूत्वाकर्षण लाट) ओळखली आहे. सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने हि मोठी घटना नसली तरी अवकाश विज्ञानाच्या दृष्टीने खूप मोठी घटना आहे. हे इतक का महत्वाच हे जाणून घेण खूप रंजक आहे. आत्तापर्यंत आपल्या विश्वाचा सगळा अभ्यास हा प्रकाशाशी निगडीत होता. पण १०० वर्षापूर्वी अल्बर्ट आईनस्टाईन ने प्रकाशापलीकडे गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याची दृष्टी दिली. आईनस्टाईन ने सांगितल होत कि जेव्हा दोन तारे किंवा दोन ग्रह एकमेकांभोवती गुरुत्वाकार्षाणामुळे फिरतात. तेव्हा विश्वाच्या पोकळीत त्याने कंपन निर्माण होत असणार. हि कंपन शांत पाण्यात दगड टाकल्यावर होणाऱ्या पाण्याच्या तरंगा प्रमाणे पूर्ण पोकळीत प्रवास करत असणार. हा विचारच मोठा क्रांतिकारी होता. हि कंपन गुरूत्वाकर्षणा प्रमाणेच अदृश्य असल्याने ती समजण्याच कोणतच साधन त्याकाळी अस्तित्वात नव्हत.
आईनस्टाईन च्या ह्या नवीन विचारांवर त्याकाळी खूप कमी जणांचा विश्वास होता. पण बऱ्याच जणांना आईनस्टाईन ची उपलब्धी माहित होती. आईनस्टाईन चुकीचा नव्हता. त्याने केलेला विचार अगदी तंतोतत खरा निघायला पुढची १०० वर्ष जावी लागली. ग्रेव्हीटेशनल वेव्ह मोजण किंवा तीच अस्तित्व शोधण खूप कठीण आहे. ती प्रकाशाच्या वेगाने अवकाशात जात असते. हि व्हेव आपल्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आकुंचन आणि प्रसरण करते. ग्रेव्हीटेशनल व्हेव तयार होण्यासाठी प्रमुख तीन कारणे आहेत. एक म्हणजे सुपरन्होवा किंवा हायपरन्होवा दुसर म्हणजे दोन प्रचंड मोठे गुरुत्वाकर्षण असणाऱ्या ताऱ्यांच एकमेकांभोवती परिवलन आणि तिसर दोन कृष्णविवर एकमेकांभोवती त्याच परिवलन आणि नंतर त्याच एकरूप होण. ह्या गोष्टीतून तयार होणारी व्हेव खूप कमी शक्तीची असते. अश्या गोष्टी पृथ्वीपासून खूप लांब अंतरावर घडत असतात. त्यामुळे पृथ्वीवर पोहोचेपर्यंत ती खूप क्षीण झालेली असते. म्हणूनच तीच अस्तित्व ओळखणे तितकच कठीण काम आहे.
२०१५ साली जेव्हा लिगो तयार होऊन काम करायला लागल तेव्हा एक पहिल्यांदा आपल्याला हि व्हेव पृथ्वीवर कळाली. हि व्हेव १.३ बिलियन म्हणजे १.३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झाली होती. म्हणजे १.३ अब्ज वर्षापूर्वी निघालेली हि व्हेव तब्बल ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर यायला इतकी वर्ष लागली. आत्तापर्यंत प्रकाश हे एकाच माध्यम घेऊन आपण विश्वाकडे बघत आलो आहोत. पण जेव्हा ह्या व्हेव नी १.३ अब्ज वर्षापूर्वीची माहिती पृथ्वीवर पोचवली त्या वेळेस आपण एका नवीन दरवाजातून विश्वाकडे बघू लागलो. आईनस्टाईन ने ते स्वप्न बघितल आणि लिगो ने तो दरवाजा शोधला. ४ जानेवारी २०१७ ला जेव्हा तिसरी व्हेव लिगो ने शोधली ती तब्बल ३ अब्ज वर्षापूर्वी तयार झाली होती. म्हणजे त्यावेळेचा पूर्ण इतिहास हि व्हेव आपल्या सोबत घेऊन प्रवास करत होती. ह्या व्हेव च्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत ज्याबद्दल आपण अजून अनभिज्ञ आहोत. गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पूर्ण बदलून जाणार आहे.
भारतासाठी अभिमानाची गोष्ट हि कि लिगो तयार करण्यात भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत. आईनस्टाईन च्या ज्या थेअरी ऑफ रीलेटीवीटी वर आपण आज हे शोधू शकलो आहेत. ते लिगो उपकरण बनवण्यात भारतीय वैज्ञानिकांच योगदान प्रचंड आहे. जगातील १००० हून अधिक वैज्ञानिकात भारताच्या अनेक संशोधकांनी आपल योगदान दिल आहे. लिगो मध्ये दोन आर्म काटकोनात चार किलोमीटर चे असतात. जेव्हा ग्रेव्हीटेशनल व्हेव पृथ्वीवर आदळते. तेव्हा तिच्या आदळण्याने ह्या आर्म च्या लांबी मध्ये फरक होतो. हाच फरक लेझर, मिरर आणि अतिसूक्ष्म बदल नोंदवणाऱ्या उपकरणांनी बंदिस्त केला जातो. आनंदाची बातमी अशी कि अस लिगो भारतात बांधण्यासाठी युनियन केबिनेट ने फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजुरी दिली आहे. ६७ वैज्ञानिक १३ प्रयोगशाळान जश्या ( TIFR, IIT Bombay, IIT Madras, IUCAA Pune, RRCAT Indore, UAIR Gandhinagar, IIT Gandhinagar, IIT Hydreabad etc.) ह्यात सहभागी आहेत. लिगो तयार झाल्यावर अश्या व्हेव चा अभ्यास भारतीय वैज्ञानिकांना भारतात करता येणार आहे.
आईनस्टाईन ने बघितलेलं आणि अभ्यासलेल स्वप्न आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला माहित असलेल्या गोष्टी खूप कमी आहेत. आजवर प्रकाश ह्या एकाच दरवाज्याने आपण विश्व बघत आलो. पण आता ग्रेव्हीटेशनल व्हेव मुळे अजून एक दरवाजा उघडला गेला आहे. ह्यातून विश्व समजून घेणे मोठे रंजक असणार आहे. ह्यात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक तितकाच समतोल वाटा उचलत आहेत हे बघून खूप छान वाटले. विश्वाच्या ह्या नव्या दरवाज्याच स्वप्न बघणारा आईनस्टाईन आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे लिगो चे सर्वच संशोधक ह्यांना सलाम.

No comments:

Post a Comment