शाळेतील माझा आवडता तास असा प्रश्न जर मला कोणी केला तर आजही तो ऑफ पिरेड किंवा ज्या तासावर बाई किंवा सर येवो अथवा न येवो त्या तासामध्ये तुम्हाला आवडेल ते करण्याची मुभा दिलेला तो तास. सगळी बंधन जुगारून मोकळेपणी आपल्याला आवडेल ते करण्याचं स्वातंत्र्य देणारा प्रत्येक असा तास माझ्या चांगलाच लक्षात आहे. त्या तासात गप्पागोष्टी तर अखंड व्हायच्या पण त्याही पलीकडे मला वाटते तो क्रियेटीविटी चा तास होता. वाचनापासून ते खेळापर्यंत सगळ काही स्वमर्जीने. फुल्लीगोळ्या पासून ते करकटा ने बेंच वर रांगोळी काढण्यापर्यंत सगळ काही त्या तासात केल असेल.
शाळा म्हणजे ज्ञानाच घर पण ते डोक्यात भरलेलं किंवा जबरदस्ती चिकटवलेल जास्ती होत. शिक्षण पद्धती मध्ये स्वतःच्या बुद्धिमत्तेला वाव तसा कमीच होता. आपली आवड, आपल्या कल्पना, आपल काहीतरी हि भावनाच मुळी तिकडे अस्तित्वात नव्हती. पुस्तकांचे धडे, गणिताचे आकडे आणि विज्ञानाची सूत्र ह्यात दिवस काय वर्ष पण पटकन भरत होती. अनेकदा प्रयोग वही मध्ये निष्कर्ष आणि अनुमान हे दोन शब्द मला बुचकळ्यात टाकायचे. कारण त्याच्यात पण भोकमपट्टी असायची. प्रयोगाचा साचा सेम असल्यावर अजून दुसर काय होणार होत. पण ह्या सगळ्या एकसुरात सप्तसूर बाहेर काढणारा एक तास म्हणजे माझा आवडता तास.
मॉनीटर होण मला कधीच आवडायचं नाही. उगाच काय नुसतीच मुलांची नाव लिहायची आणि त्यापुढे फुल्या मारायच्या. आपल्या आवडत्या तासात वर्गाच्या समोर उभ राहून फुकट फुशारकी मारत रहाण मला कधीच आवडायच नाही. आवडत्या तासात गप्पा आणि माझ्यातल्या निरीक्षण क्षमता ह्यांना वाव देण मला खूप आवडायचं. अगदी काल झालेल्या क्रिकेट म्याच वरच्या गप्पा असतो वा बाजूच्या रांगेत बसलेल्या मुलीकडे बघण असो. सगळ कस आपण ठरवलेलं. पेनांची मारामारी आणि फुल्लीगोळा हे तर हक्काचे खेळ. त्या काळात किती तरी वह्या फुल्ली गोळ्यांनी भरल्या होत्या. निदान शेवटची १० पान तरी नक्कीच. काल मुलीसोबत फोन वर फुल्ली गोळा खेळलो पण तितकी मज्जा नाही आली. मग ती आणि मी पुन्हा एकदा पेन आणि कागद घेऊन खेळायला सुरवात केली. मला न राहवून त्या वेळेस शाळेची आठवण झाली. त्या काळी इतका त्याचा अभ्यास केला होता कि समोरचा काय खेळणार हे आधीच माहित असायचं.
इथून पुढे काय? किंवा कोणत क्षेत्र निवडणार असले फालतू प्रश्न त्या काळी अश्या तासांना पडले नाहीत. कारण रविवारी म्याच कुठे खेळायची ह्याचे विचार डोक्यात सुरु. वर्गात पण क्रिकेट खेळण्याचे प्रताप करून झाले होते. पुठ्ठ्याची ब्याट आणि कागदाच्या गोळ्याचा चेंडू शेवटचा बेंच ब्याटींग वाला तर पहिला बोलिंग वाला. मधले सर्व क्याच करणारे ह्यात बर मुलीही सामील व्हायच्या. त्यामुळे हा आवडता तास कधी संपू नये असच वाटायचं. नवीन तास सुरु झाला तरी मागच्या तासात केलेल्या मज्जेचा पाढा मनात सुरु असायचा. म्हणून आवडत्या तासा नंतर जर एखादा नावडता तास असेल तर आम्ही वर्गाबाहेर हमखास जायचोच. कारण एकतर काही कळायचं नाही आणि कळल तरी लक्ष नसायचं.
पण हे आवडते तास मित्र जोडणारे होते. त्याकाळी जोडलेले मित्र आजही टिकून आहेत. भले ते २०-२५ वर्ष भेटलेले नसो पण भेटले कि निदान खांद्यावर हात टाकून चल बसुया एकदा म्हणणारे तरी आहेत. कशासाठी बसुया हा वादाचा विषय असला तरी त्या बसण्यामागच्या प्रेमाला हे आवडते तासच कारणीभूत होते. आज माझ्या मनापासून मला हि वाटते कि मुलांना निदान आठवड्यातून एक तास असा असावा खरे तर रोज एक असावा. जिकडे त्यांना वाटेल ते करू देण्यात याव. अगदी गप्पांपासून ते खेळापर्यंत. ज्याला जे आवडेल ते. कारण इंग्रजी, गणिताचे तास लक्षात नाही रहात. लक्षात रहातात ते असेच ऑफ तास. ज्याला आपण मनातून जगतो. माझ्या मुलीने पण अशीच मज्जा करावी अस मला वाटते. परवाच सई मला म्हणाली, बाबा, मला क्लास च मॉनीटर केल. मी तिला म्हंटल चांगल झाल पण मी म्हंटल मग आता तुला बोलता येणार नाही ऑफ पिरेड मध्ये. तर खट्टू झाली थोडी कदाचित माझ्या बोलण्याचा अंदाज तिला यायला वेळ लागेल. पण काळ बदलला तरी आवडत्या तासांची मज्जा कमी झालेली नाही हेच खर.
No comments:
Post a Comment