Thursday 24 August 2017

चंद्रावर एक से भले दो... विनीत वर्तक

ऐन तारुण्यात प्रेमाचे धुमारे फुटले कि चंद्र नेहमीच साक्षिला असतो. आपल्या पांढऱ्या शीतल प्रकाशामुळे अंधारात पण प्रकाश देणारा हा पृथ्वीचा उपग्रह अनादी काळापासून मानवाच आकर्षण राहिला आहे. चंद्रावर माणसाने पहिली स्वारी करून आता दशके उलटली असली तरी चंद्राबद्दल असलेली आस्था आजही कायम आहे. भारतीयांच्या मनात तर त्याच्याविषयी जास्तीच आस्था आहे. २००८ मध्ये भारतीय तिरंगा चंद्रावर फडकला. भारतीय चंद्रयान १ मिशन सोबत गेलेल्या नासा च्या उपकरणाने चंद्रावर पहिल्यांदा पाण्याच अस्तित्व शोधलं. ह्या घटनेला दशक उलटत असताना पुन्हा एकदा भारतीय तयार आहेत ते चंद्राच्या स्वारीसाठी, ह्या वेळेस चंद्रावर स्वारी करण्यासाठी एक से भले दो अस म्हणत भारतीयांनी कंबर कसली आहे.
हे वर्ष सरता सरता किंवा नवीन वर्षाच्या सुरवातील भारतातून दोन चंद्र मोहिमा एकाचवेळेस अवकाशात झेपावत आहेत. एक आहे ती इस्रो ची चंद्रयान-२ मोहीम. चंद्राच्या पृष्ठभागावर रोवर उतरवून त्याच्या भू भागाचा अभ्यास केला जाणार आहे. मिन्रोलोजिकल आणि एलिमेंटल अभ्यास ह्या रोवर द्वारा केला जाणार आहे. ३२५० किलोग्राम उड्डाण वजन असणाऱ्या रोवर ला घेऊन जी.एस.एल.व्ही २ आकाशात उड्डाण भरेल तेव्हा भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती आणि मिसाईल म्यान डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या स्वप्नांना एक मूर्त स्वरूप आपण दिलेलं असेल. २००८ साली सुद्धा चंद्राच्या पृष्ठभागावर तिरंगा सोडण्याची योजना सुद्धा कलाम सरांची होती. आज १० वर्षांनी पुन्हा एकदा भारत त्यांच्या अग्निपंखांवर स्वार होऊन चंद्राच्या दिशेने उड्डाण भरत आहे.
दुसरीकडे भारतात पहिल्यांदा देशातील तरुण विद्यार्थी आणि प्रायवेट प्लेयर एकत्र येऊन ३० मिलियन डॉलर बक्षीस असलेल्या गुगल लुनार स्पर्धेत भाग घेत आहेत. दिल्ली आय.आय.टी. मधून पास झालेल्या राहुल नारायण ह्याच्या देखरेखेखाली टीम इंडस हि एक स्टार्ट अप कंपनी चंद्रावर रोवर पाठवत आहे. गुगल च्या ह्या स्पर्धेत टीम इंडस सह अमेरिकेची मून एक्स्प्रेस, इस्राइल ची स्पा सेल आणि एक इंटरनेशनल टीम सिनर्जी मून ने भाग घेतला आहे. गुगल च्या ह्या स्पर्धेतील नियमाप्रमाणे एक रोवर चंद्रावर पाठवून त्याने ५०० मीटर अंतर चंद्राच्या पृष्ठभागावर कापायला हव. तसेच चंद्राचे हाय डेफिनेशन फोटो पृथ्वीवर पुन्हा पाठवणे आवश्यक आहे. जगातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एका भारतीय टीमने अंतिम चार जणात स्थान मिळवले आहे. त्यांची हि धमक लक्षात ठेवून इन्फोसिस फाउंडर नंदन निलकेणी ह्यांनी ह्या मोहिमेसाठी पैसे गुंतवले आहेत. तसेच इस्रो चे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन तसेच इतर माननीय वैज्ञानिक ह्यांनी आपल पाठबळ दिल आहे.
इस्रो ने टीम इंडस च्या प्रयत्नांना आपल्या सगळ्यात भरवश्या रॉकेट चे पंख लावून चंद्रावरच्या स्वारीच्या रथाच स्वारस्य केल आहे. इस्रो च वर्कहॉर्स आणि पाहिल्या चंद्र मोहिमेला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाणार पी.एस.एल.व्ही. रॉकेट इस्रो ने टीम इंडस ला त्यांच्या मोहिमेसाठी दिल आहे. तसा करार इस्रो ची एंट्रीक्स कोर्पोरेशन आणि टीम इंडस मध्ये झाला आहे. टीम इंडस आणि इस्रो ह्या दोघांच्या मोहिमीची उद्दिष्ठ वेगळी आहेत. त्यामुळे त्यांना वाहून नेणारे प्रक्षेपक पण. टीम इंडस कडे रोवर च तंत्रज्ञान होत पण तो रोवर चंद्रावर प्रक्षेपित करण्यासाठी लागणार रॉकेट नाही. जगातून एरियन सारख्या कंपन्या कडून प्रक्षेपित करण्यासाठी लागणारा पैसा पण नव्हता अश्या वेळेस इस्रो ने कमी पैश्यात आपल सगळ्यात भरवश्याच रॉकेट देण्याच मान्य केल. इकडे एक लक्षात घेतल पाहिजे कि पी.एस.एल.व्ही. रॉकेटसाठी बाहेरील देश रांगा लावून असताना अवघ्या एका वर्षाच्या आतमध्ये इस्रो ने पैसा न बघता एक पूर्ण रॉकेट टीम इंडस ला त्यांच्या स्पर्धेसाठी दिल. जगातली कोणतीही स्पेस एजन्सी अस करण्याआधी पैशाचा आणि व्यावहारिक दृष्ट्रीकोन समोर ठेवेल पण देशहितासाठी इस्रो ने पैसा बाजूला ठेवून तरुण मुलांच्या स्वप्नांना पंख दिले आहेत.
२०१७ च्या डिसेंबर महिन्यात टीम इंडस च रॉकेट उड्डाण भरेल तर जानेवारीत इस्रो च चंद्रयान मिशन चंद्राकडे उड्डाण भरेल. चंद्राची मोहीम काय एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासारखी नाही. आपण एका वेगळ्या ग्रहावर उड्डाण भरतो आहे. त्यामुळे एकाच वेळेस दोन मोहिमा आखताना तितकेच श्रम, मेहनत, संशोधन, अभियांत्रिकी तसेच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा कसून अभ्यास करण्याची गरज असते. एक छोटी चूक आणि आपण किती दशके पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा अस असताना ह्यात खूप मोठी रिस्क असते. त्यामुळे एकाच वेळेस दोन चंद्र मिशनवर काम करताना इस्रो आणि तिथल्या विज्ञानिकांची किती दमछाक होत असेल ह्याचा आपण विचार पण करू शकत नाही. असे मिशन हाती घेण्यासाठी तितकाच विश्वास आणि कमिटमेंट असावी लागते. येत्या काही महिन्यात हि दोन्ही मिशन चंद्राकडे रवाना होतील. चंद्रावर एक से भले दो ची हि मोर्चेबांधणी भारताच अवकाशातल नाण खणखणीत वाजवत ठेवणार आहे. ह्या मोहिमेसाठी इस्रो आणि टीम इंडस च्या सर्व अभियंते आणि शास्त्रज्ञांना खूप खूप शुभेछ्या.

1 comment:

  1. खूप छान बातमी आहे आपल्या भारतीयांसाठी अशीच प्रगती झाली पाहिजे आपल्या देशाची.

    ReplyDelete