काही चित्रपट असे असतात कि नकळत ते तुम्हाला स्पर्शून जातात. तुम्हाला विचारात टाकतात. तुमच्या भावनांना वाट देतात. काही तर आपण आपल्या आयुष्याशी जोडून बघयला लागतो. पण काही असे असतात कि डोळ्यात पाणी आणतात. डोळांच्या कडा ओल्या आणि हातावर येणारे शहारे दोन्ही चा एकाचवेळेस अनुभव देणारे असे थोडेच. द लोंगेस्ट राईड हा २०१५ साली आलेला चित्रपट त्यातलाच.
जेव्हा बघयला सुरवात केली तेव्हा एक साधारण चित्रपट बघत आहोत असच वाटल. बुल राईड करणारा एक मुलगा आणि शिक्षणात धडपडणारी एक मुलगी ह्यांच्या प्रेमाची सुरवात तितकीशी ठाव घेत नाही. कारण अमेरिकन संस्कृतीशी आपण तितके लगेच रुळावत नाही. तरी निसर्गाच सुंदर चित्रण विशेषतः तलावाच्या बाजूला त्या दोघांची डेट नक्कीच सुंदर वाटते. चित्रपट सामान्य आहे अस वाटत असतानाच चित्रपट एक सुंदर वळण घेतो. त्या वळणासाठी चित्रपट मला खूप आवडला.
अपघात झालेल्या एका वृद्धाला इस्पितळात नेताना त्याने लिहिलेली पत्रे जेव्हा सोफिया च्या हातात पडतात. तेव्हा वेगळ्या प्रेमकथेची सुरवात होते. १९४० चा काळ त्यात पुढे जाणारी आयरे आणि रुथ ची प्रेमकथा खूप मागे घेऊन जाते. एक निरागस आणि लाजणारा मुलगा ते एक सैनिक ह्यातून त्या दोघांच्या आयुष्यात येणारे प्रसंग सुंदर चित्रित केले आहेत. युद्ध नेहमीच काही जखमा देऊन जाते. आयरे पण त्यातून सुटत नाही. त्या जखमेच्या व्रणांनी मात्र त्याच आयुष्य उध्वस्थ होते. पण रुथ साथ सोडत नाही. असा मागचा काळ ते आत्ताच सोफिया च प्रेम अस कथानक पुढे सरकत जाते.
सोफिया आणि ल्युक ची कथा जरी मनात भरत नसली तरी त्याच वेळी रुथ आणि आयरे आपल्या मनात रुंजी घालत राहतात. आयरे आणि रुथ दोघांच्या आवडी पूर्ण वेगळ्या असताना सुद्धा आयरे आपल्या प्रेमाला आनंदी बघण्यासाठी अनेक चित्राचं घरात संग्रह करत रहातो. रुथ प्रत्येक चित्रातून अर्थ शोधत असताना आयरे फक्त तिला बघत रहातो. अश्या वेळी एका लहान कोवळ्या ड्यानियल च्या येण्याने रुथ च आयुष्य काही क्षणापुरती बदलून जाते. पण तो अचानक त्यांच्या आयुष्यातून निघून जातो. ड्यानियल च्या जाण्याचा धक्का रुथ आणि आयरे च नात पण दोलायमान करतो. पण ड्यानियल कुठे जातो? त्यांना परत भेटतो का? ह्या प्रश्नांची उत्तर चित्रपटात बघणंच उत्तम.
रुथ आणि आयरे पुन्हा आयुष्याला सुरवात करून संपूर्ण आयुष्य जगतात. त्यावेळी आयरे रुथ ला अनेक पत्र लिहून आपला आनंद साजरा करतो. पाहिलं चुंबन ते पहिला कटाक्ष सगळच. एका सकाळी रुथ आयरे ला सोडून जेव्हा जगातून निघून जाते. आयरे जेव्हा हि गोष्ट सोफिया ला सांगतो. तेव्हा सोफिया स्वतःच्या आयुष्यात आलेल्या वादळांशी झगडत असते. आयरे तिला सांगतो, “ Love Require Sacrifice”, Always.. खूप काही आहे ह्या वाक्यात. ड्यानियल ने काढलेलं रुथ च एक चित्र घेऊन जेव्हा ड्यानियल ची बायको आयरे ला भेटते तो क्षण चित्रपटाचा कळस आहे. डोळांच्या पापण्या ओल्या आपोआप होतात.
ल्युक ला आपल्याला हव असलेल मिळवल्या नंतर जाणवते कि सगळ्यांच्या पलीकडे जे त्याला हव होत ते सोफिया आहे. तोवर आयरे ने संग्रही केलेल्या चित्रांच्या विक्रीच आमंत्रण त्याला मिळालेलं असते. १९४० मध्ये आयरे ने संग्रह केलेल्या चित्रांची किंमत मिलियन डॉलर मध्ये आजच्या काळात असते. विक्री सुरु करण्याआधी आयरे ने लिहलेल एक सुंदर पत्र त्याचा वकील वाचून दाखवतो. त्यात आयरे म्हणतो
“Ruth had an incredible eye for arts, but I only had eye for her. For me the greatest joy was not in collecting great work but for the person I collected with. These painting brought immense happiness for ruth and sharing that happiness was my life’s greatest privileged”.
“True work of art was the longest ride ruth and I share that’s called life”.
“True work of art was the longest ride ruth and I share that’s called life”.
रुथ आणि आयरे ची प्रेमकहाणी बघून सुन्न झालो. इतक सुंदर, साध आणि सहज प्रेम निभावता येत. चित्रपटातून ते अस भिडल मनाला निदान माझ्या तरी. सोफिया आणि ल्युक च काय होते. आयरे ने संग्रह केलेल्या चित्राचं काय होते? अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि हातावर शहारे आणि डोळांच्या कडा ओल्या करणाऱ्या रुथ आणि आयरे च्या प्रेमकथेसाठी चित्रपट बघायला हवाच.
सोफिया आणि ल्युक चित्रपटात नसले असते तरी चालले असते इतकी ती सुंदर कथा एलन अल्डा च्या अभिनयाने खुलून येते. तरुणपणीचा आयरे ज्याक हस्टन आणि रुथ चा अभिनय केलेली ओंना च्याप्लीन हिने सुंदर अभिनय केला आहे. ओंना ने अभिनयाचे गुण तिचे आजोबा म्हणजेच चार्ली च्याप्लीन कडून घेतलेच आहेत. मला आयरे आणि रुथ खूप भावले. कोणताही बडेजाव आणि प्रेमाला अतिरंजित न करता एक साध सरळ नात दाखवण्यात चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आहे.
No comments:
Post a Comment