Thursday 24 August 2017

सेन्स एट... विनीत वर्तक

सेन्स एट नावाची सिरीज सध्या बघतो आहे. नेटफ्लिक्स ची हि सिरीज मला खूप आवडली. ह्या सिरीज चे दोन एपिसोड प्रसारित झाले आहेत. प्रत्येक एपिसोड मध्ये ११-१२ भाग असून पहिल्या भागापासून ह्या सिरीज ने उत्कंठा वाढवली आहे. आत्मा हा विषय आपल्याकडे तसा खूप चघळून झाला आहे. शरीरापलीकडे माणसाचा आत्मा हा जिवंत असतो. तो स्थळ, काळ, अंतरापलीकडे जाऊ शकतो हे आपल्याला आधीपासून माहिती आहेच. त्याच आत्म्या वर बसलेली सिरीज म्हणजे सेन्स एट.
एक आत्मा आठ शरीरात जन्म घेतो. हि आठ शरीर जगाच्या सर्व कोपऱ्यात विखुरलेली असताना. आत्म्यामुळे एकमेकांशी अंतरापलीकडे एकमेकांशी जोडली जातात. जोडताना आत्मा एक असला तरी विचारांची बैठक, त्यांची जडणघडण हि वेगळी झालेली असताना शरीर आणि आत्मा ह्यांचा ताळमेळ ते कसा करतात आणि हा आत्मा कोणाचा असतो? त्या मागचा इतिहास आणि भविष्य हे सेन्स एट मधेच बघण उत्तम. वेगवेगळे देश अगदी मुंबई पासून अमेरिकेपर्यंत, तर तिकडे आफ्रिके पासून युरोप पर्यंत अश्या सगळ्या ठिकाणी ह्या मालिकेचे शुटींग झाले आहे. म्हणूनच हि मालिका पटकन आपल्या मनाचा ठाव घेते.
सेन्स एट मध्ये एल.जी.बी.टी., न्युड असे काही सिन्स असले तरी त्यात कुठे अश्लीलता जाणवत नाही. कथानका ची मांडणी तशी झाली असल्या कारणांने. लेसबियन आणि गे अश्या संबंधाना अनेक देशात मान्यता असल्याने त्या त्या देशांच्या दृष्ट्रीने तिकडे अश्या संबंधांकडे बघण्याचा दृष्ट्रीकोन वेगळा आहे हे ओळखून हि सिरीज बघावी. मला सगळ्यात जास्ती आवडले असेल ते आत्मा ह्या गोष्टीला मध्यवर्ती ठेऊन केलेली कथानकाची मांडणी.
आत्मा हे आपल्या कडे ज्ञात गोष्ट आहे. आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून आपल्या संस्कृतीत अनेक पद्धती आहेत. पण ह्या आत्म्याला आपल्याकडे भयाची जोड दिली आहे. त्यामुळे आत्मा वगरे विषय निघाला कि आपल्याला भीती वाटते. पण जर असे आत्मे जुळले तर? किंबहुना अस होतेच न. सोलमेट ज्याला म्हणतात ते तेच असते न. आपण काय विचार करतो? किंवा आपल्या मनात काय चालू आहे? हे देहबोलीतून न सांगता सुद्धा समोरच्या पर्यंत पोहचते म्हणजे तिकडे ते आत्मे जुळत असतील किंवा काहीतरी नक्कीच कनेक्शन असेल. त्याला आपण काही नाव देऊ ऑरा, आत्मा अस काहीही. पण काही असल्याशिवाय अस जुळून येण अशक्य असते.
इंटरनेट च्या जमान्यात असा अनुभव अनेकवेळा येतो. देशाच्या, धर्माच्या भिंती पलीकडे कोणीतरी आपल्याशी अस कनेक्ट होत कि आपल्याला कधी कळत नाही अस कस शक्य आहे? ज्या माणसाला आपण ओळखत नाही, बघितलेलं नाही किंबहुना कधी तर कोणत्या देशात वास्तव्य करतो हे माहित नसते. त्याची संस्कृती, भाषा काही माहित नसताना फक्त शब्दांपलीकडे जेव्हा आपण कनेक्ट होतो ते वेगळ असते. प्रत्येकवेळी ते प्रेम असते अस नाही. जे नेमक सांगायचं आहे त्यासाठी शब्दांची गरज नसते. मग अगदी खट्टू होण असू दे किंवा आनंदात असण असू देत. ते ह्या सर्व भिंती ओलांडून जेव्हा समोरच्या पर्यंत पोचते तो अनुभव वेगळाच असतो. ह्याच्या पुढे जाऊन जेव्हा त्या व्यक्तीच असण पण आपल्याला जाणवते तेव्हा ते कनेक्शन वेगळ्या लेवल वर असते.
विज्ञानाच्या भाषेत कदाचित ह्या गोष्टी आपण कोणाला सांगू पण शकत नाही. कारण ते अनुभवणं आपण कोणाशीच शेअर करू शकत नाही. म्हणून अश्या गोष्टी एकतर काल्पनिक वाटतात किंवा त्याचा अनुभव येईपर्यंत आपण त्या स्वीकारत नाहीत. एखाद्या गोष्टीची आधीच जाणीव होते अस अनेकदा आपण अनेकांकडून ऐकल असेल. पण ते केव्हा आणि कस हे मात्र कोणीच उलगडून सांगू शकत नाही. त्याच आकलन होण्यासाठी आपल्याला अनुभव घ्यावाच लागतो. सेन्स एट बघताना पुन्हा एकदा त्या ताकदीची जाणीव आपल्याला होते. अर्थात त्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अनेक अनुत्तरीत प्रश्नांना उत्तर नसतात पण म्हणून त्या गोष्टी अस्तित्वात नसतात. अस होत नसते. उद्या कदाचित विज्ञान इतक सक्षम असेल कि आत्मा,ऑरा सारख्या गोष्टींची उत्तर त्याच्याकडे असतील. तूर्तास सेन्स एट ह्या सुंदर सिरीज ला एन्जोय करतो आहे.

No comments:

Post a Comment