तारेवरची कसरत नेहमीच दोन टोकांच्या मध्ये असते. कारण टोकावर राहून दुसऱ्या टोका बद्दल बोलणे किंवा बघणे सोप्पे असते. पण दोन्ही टोकांना समजून घेऊन दोन्ही टोकांचा सन्मान ठेवणे खूप कमी जणांना जमते. अस म्हणतात नात जोडण आणि तोडण खूप सोप्प असते. कठीण असते ते निभावण कारण जोडण एक टोक तर तोडण दुसर टोक त्यामध्ये जी काही कसरत असते ती मात्र ते नात निभावण्यात असते.
पुरुषी असल्याचा माज किंवा फेमिनिझम साठी असलेला अहंकार हि पण दोन टोकच. अनेकवेळा माणस ह्या दोन टोकांवर विहार करतात. काही पुरुषांना आपल्या लिंगाचा खूप माज असतो. स्त्री ला दुय्यम समजण्यापासून ते तिची अहवेलना करण्यात एक प्रतिष्ठा त्यांना मिळते. तर काही स्त्री च्या हाताखाली इतके दबलेले असतात कि घरगडी होऊन सुद्धा त्याच त्यांना काहीच वावग वाटत नाही. स्त्री सुद्धा दोन टोकांवर रमते. बऱ्याचदा पुरुषाच्या वजनाखाली दबलेली असते किंवा पुरुषार्थावर सतत संशय घेणारी असते. सगळे पुरुष सारखेच म्हणत आपल्या तालावर नाचवणाऱ्या स्त्रिया काही कमी नाहीत. पण टोकावर राहून आपण दुसऱ्या टोकाचे अंदाज कसे काय बांधू शकतो? किंवा समजून घेऊ शकतो?
सेक्स हा अजून एक असाच विषय जिकडे आपण टोकावर रमतो. एकतर काहीच माहित नसणारे किंवा घाण, विकृत, सरसकट वाईट लेबल लावणारे किंवा त्या बद्दल लाज बाळगणारे अस एक टोक तर सेक्स मध्ये सतत रमून समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे भोगी प्रवृत्ती ने बघणार दुसर टोक. सतत त्याचाच विचार. कधी समोर असणार अनुभवण्याची शिक्षण नसणारे एक टोक तर जे आपल नाही ते पण ओरबाडून त्यावर पाशवी हक्क सांगणार दुसर टोक. ह्या दोन्ही टोकांवर भावनांची आंदोलन परमोच्च असतात. पण समाधान मात्र कुठेच नसते. कारण समाधान हे दोन अपूर्णांकाच्या पुर्णत्वा मध्ये असते. ते मिळवायचे असेल तर सुवर्णमध्य गाठायला हवा. नाहीतर वर्षोनवर्ष आपण एकतर पाळणे हलवतो नाहीतर बलात्काराचे, अत्याचाराचे बळी ठरतो.
आपल्या करियर, अभ्यास, घर, कुटुंब , मित्र- मैत्रिणी सरसकट हा टोकाचा नियम लागू होतो. वर दिलेले दाखले त्यातला छोटासा अंश आहेत. एखादी विचारसरणी पकडून त्याच्या मुळाशी जाऊन आपले विचार प्रगल्भ करणे नक्कीच हवे. पण आपल्या त्या विचारात सतत रमणे म्हणजे टोकावर जाणे. प्रगल्भ प्रतिभा नेहमीच दुसऱ्या बाजूचा विचार करते. विचार केला ह्याचा अर्थ ते पटले असा होत नाही तर त्यातून आपण काय शिकू शकतो हाच तो सुवर्णमध्य. राजकारणात आपल्याला एखादा पक्ष, एखादा नेता आवडला म्हणजे त्यांनी केलेलं सगळच बरोबर किंवा त्यांनी उचललेली सगळी पाउल बरोबर अस करून टोक गाठलं कि तोंडावर आपटलोच. त्याच वेळी एखाद्या पक्ष, नेता आवडून सुद्धा त्यांच्या न पटणाऱ्या गोष्टींवर केलेली टीका हा सुवर्णमध्य.
आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा अनेकवेळा जे गैरसमज होतात त्याच मुख्य कारण टोकाची भूमिका हेच असते. मला कोणीतरी समजून घ्यावं म्हणताना आपण कोणाला तरी समजून घेण्याची तयारी दाखवतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. टोकावर बसून दुसऱ्या टोकाचे आकलन करण्यापेक्षा थोड अंतर त्या टोकाच्या दिशेने चाललो तर परिस्थितीची कल्पना आपण विचार करतो त्यापेक्षा स्पष्ट बघण्याची दृष्टी मिळेल. प्रत्येकवेळी उत्तर मिळतील अस नाही. कदाचित आपल टोक सोडून मीच का प्रत्येकवेळी जाव हा हि प्रश्न मनात येईलच. पण अस करताना आपण काहीच गमवत नाही आहोत तर कदाचित काहीतरी नवीन कमवू हा विश्वास त्यावेळी जागृत असेल तर सुवर्णमध्य गाठायला वेळ लागणार नाही.
आपण कुठवर चालायचं मध्यापर्यंत कि दुसऱ्या टोकापर्यंत ह्याचा निर्णय ज्याचा त्याने परिस्थिती बघून घ्यायचा कारण सुवर्णमध्य नेहमीच मध्यात मिळेल अस गणित आयुष्यात लागू होत नाही. आयुष्यात लागू होते ती त्या टोकाला समजून घेण्याची मानसिकता आणि प्रगल्भता. ती आपल्यात रुजवली तर टोकांच्या गणितात अडकून पडणार नाही. मग आपली वाटचाल नेहमीच त्या दोन टोकांमध्ये असलेल्या सुवर्णमध्या कडेच होत राहील.
No comments:
Post a Comment