सामान्य असणं... विनीत वर्तक
दहावी आणि बारावीचे निकाल लागले, की पेपरात आत्महत्येच्या बातम्या यायला सुरूवात होते. अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या, आणि घर सोडून जाणं अश्या अनेक बातम्या येत असतात. त्याहीपेक्षा निराशेच्या गर्तेत डुंबणारे कमी नसतात, बरं याचं मार्कांशी काही देणंघेणं नसतं. ९०% मिळालेला, ५ मार्क कमी मिळाले म्हणून, ७५% वाला ५% टक्के कमी मिळाले म्हणून, तर नापास झालेला ५ मार्क अजून जास्ती मिळायला हवे होते म्हणून, मार्काची तफावत काहीही असो, निराशेचा झटका तितकाच असतो.
आपलं मन इतकं सुंदर आहे, की ते परिणामांपेक्षा भावनांवर प्रतिक्रिया देतं, म्हणून तर मार्कांचा व्यवहार त्याला कळत नाही. तुम्ही ९०% मिळवा, अथवा ३५% त्याच्याशी मनाला काहीच पडलेलं नसतं. तुम्ही समाधानी आहात का? ह्या एका प्रश्नावर ते सारखंच प्रतिक्रिया देतं, म्हणून तर १००% मिळवणारा जितका आनंदी तितकाच ३५% वाला पण असू शकतो. पण असं असताना अपेक्षांचं ओझं नकळत पालक म्हणून आपण मुलांवर इतकं टाकतो, की मुलाला असामान्य बनवण्यासाठी त्याला सामान्य पण बनू देत नाही, ही आजच्या पिढीची शोकांतिका आहे.
दोन डोळे, दोन हात, दोन पाय, एक धड आणि मेंदूसोबत त्यातील सगळे अवयव व्यवस्थित चालणारा जीव जन्माला येणं, हेच मुळी वरदान असतं. कदाचित सामान्य असल्याने त्याची किंमत पालकांना कमीच असते. आजूबाजूला बघितलं, की यातलं एक काहीतरी नसलेले जीव जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांचं संगोपन आणि जडणघडण किती कठीण असू शकते याचा अंदाज येतो. त्यावेळेस माणसाने निर्माण केलेले टक्क्यांचे इमले कोसळून पडतात. एक सामान्य जीवन त्या जीवांच्या पदरी यावं, ही एक माफक अपेक्षा तेव्हा हे पालक करतात.
आपला जीव जेव्हा एक सामान्य म्हणून जन्माला येतो, तेव्हा त्याचा सामान्य असण्याचा मुळात किती पालक महोत्सव करतात? आपल्याला आपण सामान्य असणं किती मोठं पुण्य आहे, याचा अंदाज येत नाही. जोवर आपण ह्यातलं एक काहीतरी गमावत नाही. शर्टचं साधं बटन लावणं किंवा बुटाच्या नाड्या बांधणं हे अगदी अंगवळणी पडलेलं आणि सहज सोप्पं वाटणारी गोष्टपण एखाद्यासाठी मैलाचा दगड असू शकते, ही वस्तुस्थिती आपण कधी लक्षात घेत नाही. पळताना सेकंदात मोजणारे अंतर दरवेळी मेडल आणेल असं नाही. पण किती का असेना ते अंतर कोणाच्या आधाराविना गाठता येणं, हीच एक यशस्वी झेप असते. पायांच्या क्रिया थांबलेल्या किंवा पायच नसलेल्या कित्येक लोकांना असं मुक्त असण्याची किंमत काय असते, ते एकदा पालकांनी जरूर विचारायला हवं.
शरीरातील कोणताही अवयव असो, त्याचं असणं, आणि त्यानं सामान्यरीतीने काम करणं निदान आपल्या पाल्याच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट आहे. ९०% च्या बदली ७५% टक्के मिळाले, म्हणून काही आभाळ कोसळणार नाही. फारफार तर आवडत्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळणार नाही, किंवा आवडता किंवा जास्ती पैसे देणारा म्हणू आपण, असा अभ्यासक्रम निवडता येणार नाही. पण म्हणून आयुष्य अंधःकारमय होत नाही. आयुष्य अंधःकारमय तेव्हा होते, जेव्हा तुमच्यामधली एक गोष्ट काम करणे बंद करते. मग तो मेंदू असो वा अगदी हाताचं बोट.
टक्यांच्या आणि बेभान स्पर्धेत अंदाधुंदपणे आपली मुलं जुंपणाऱ्या सगळ्या पालकांनी याचा विचार करावा. आपण काय पणाला लावतो आहे, आणि त्यातून कायमिळणार आहे? मिळालेले टक्के कदाचित कमी असतील, पण आपल्या पाल्याने एक सामान्य असण्याचं समाधान प्रत्येक पालकांनी अनुभवयाला हवं. सर्टिफिकेट पुन्हा मिळतील, मार्क कमी जास्त होतील, पण सामान्य असण्याचं समाधान चिरकाल टिकून राहील. आज त्याचीच गरज जास्ती आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाने निराश न होता, आयुष्यात ह्याच सामान्य गोष्टींच्या जोरावर असामान्य कर्तृत्व निर्माण करण्याची संधी आणि आत्मविश्वास आपल्या मुलांना दिला, तर असल्या कागदी घोड्यांच्या शर्यतीत तुमचा घोडा 'हारके भी जितने वाला बाजीगर' असेल यात काही शंका नाही.
No comments:
Post a Comment