Thursday 24 August 2017

ह्याकसॉं रिज... विनीत वर्तक

भारतात किंवा बॉलीवूड मध्ये सैनिकांच्या शौर्यावर मोजकेच चित्रपट निघतात. बॉर्डर, लक्ष्य सारखे चित्रपट सोडले तर बाकी सगळा आनंदी आनंद आहे. हॉलीवूड मध्ये मात्र युद्धातील सैनिकांवर निघणारे चित्रपट अगदी विस्मृतीत गेलेल्या शूरवीरांनां प्रकाशात तर आणतातच पण त्यातून जे कथानक समोर येते ते थक्क करणार असते. कुठेही प्रेम ह्या भावनेला अतिरंजित न करता गाणी आणि नृत्या पलीकडे सैनिकाच आयुष्य जवळून बघण्याचा सुवर्ण योग ह्या चित्रपटामुळे मिळतो. ह्याकसॉं रिज हा त्याच पठडीतला चित्रपट. मेल गिब्सन निर्माता असलेला हा चित्रपट डेसमोंड डॉस ह्या एका शूरवीर अमेरिकन सैनिकाची कहाणी आपल्यासमोर मांडतो तेव्हा आपण निशब्द होतो.
डेसमोंड डॉस हे नाव भारतीयांना अपरिचित आहे. डेसमोंड डॉस हा अमेरिकेच्या सैन्यात कॉर्पोरल लेवल ला कोम्ब्याट मेडिक म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला कार्यरत होता. मेडिक म्हणून काम करताना डेसमोंड ने ब्याटल ऑफ ऑकीनावा मध्ये भाग घेतला होता. ऑकीनावा हे जपान च्या जवळच साधारण ५५० किमी वर एक बेट असून दुसऱ्या महायुद्धात जपान वर युद्ध करण्यासाठी अमेरिकेला हवाई तळाची गरज होती. हवाई हल्यासाठी कसही करून ऑकीनावा हे बेट आपल्या कब्जात अमेरिकेला हव होत. ह्यासाठी हे युद्ध अमेरिका व मित्र राष्ट्रे ह्याच्या विरुद्ध जपान आणि ऑकीनावा इथले रहिवाशी अस लढल गेल. ८२ दिवस चाललेलं हे युद्ध दुसऱ्या महायुद्धातील सगळ्यात रक्तरंजित युद्ध होत. ह्या एका युद्धात तब्बल ३ लाख लोक मारली गेली असा अंदाज आहे. अमेरिकेने २०,१९५ सैनिकांना गमावलं तर जपान ने १,००,००० सैनिकांना गमावलं. ह्याच्या पलीकडे जवळपास ५५,००० अमेरिकन सैनिक जखमी झाले तर तिकडे त्या काळी वस्ती असलेल्या ३,००,००० लोकांपेकी किती मेले, जखमी झाले, हरवले ह्याबद्दल नक्की आकडा माहित नाही. ह्या अंकांवरून आपण अंदाज लावू शकू कि हे युद्ध किती रक्तरंजित असेल.
डेसमोंड डॉस हा एक सैनिक असूनही त्याने एकही जपान च्या सैनिकावर गोळी झाडली नाही किंवा आपल्या धारणेला बगल देत बंदूक हातात उचलली नाही. पण त्याच वेळी बायबल मधल्या तत्वाला जागत त्याने युद्धात एक- दोन नाही तर तब्बल ७५ अमेरिकेन सैनिकांचे प्राण एकट्याने वाचवले. आपल्या जिवाची पर्वा न करता डेसमोंड ने भर युद्धात जपान आणि अमेरिका असा भेदभाव न करता माणुसकीची सेवा केली. त्याच्या ह्या अतुलनीय शौर्याबद्दल अमेरिकेने मेडल ऑफ ऑनर दिला. डेसमंड डॉस हा हे मेडल मिळवणारा पहिला कंसायटेनियुस ओब्जेक्टर होता. (कंसायटेनियुस ओब्जेक्टर म्हणजे ज्या व्यक्तीने आपल्या तत्वासाठी, विचारासाठी किंवा धर्मासाठी सैनिकी सेवा करण्यासाठी नकार दिला आहे. अमेरिकेत असा कायदा आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती सैन्यात राहून पण सैनिकी सेवा करण्यास नकार देऊ शकते. )
डेसमोंड डॉस चा हा प्रवास इतक्या सुंदर पद्धतीने मेल गिब्सन ने समोर ठेवला आहे कि आपण देहभान विसरून पुन्हा इतिहासात डोकावतो. आपल्या तत्वासाठी लढण काय असते ते डेसमंड काढून शिकावं. युद्धात बंदूक न घेता हि खूप मदत करू शकतो हे डेसमंड काढून शिकावं. शूरवीर किंवा पराक्रमी फक्त युद्ध लढून नाही बनत तर आपल्या सेवेने सुद्धा पराक्रम गाजवता येतो. प्रेम हे फक्त बोलून संपवायचं नसते तर निभवायचं असते. डेसमंड च पूर्ण आयुष्य आपल्याला खूप काही सांगून जाते खूप काही शिकवून जाते. सगळी शक्ती संपली असताना सुद्धा त्या परिस्थितीत डेसमंड देवाला सांगतो. अजून एकाला मला वाचवायचं बळ दे. अजून एक करत डेसमंड ज्या पद्धतीने ७५ सैनिकांना मृत्युच्या दाढेतून परत आणतो. ते म्हणजे अतुलनीय शौर्य. आपल्या तत्वांसाठी आपल आख्ख आयुष्य पणाला लावणाऱ्या डेसमंड डॉस चा हा प्रवास बघण म्हणजे अवर्णनीय अनुभव आहे.
ह्याकसॉं रिज सारखे चित्रपट तुम्हाला नुसते आनंद नाही देत तर आयुष्य शिकवतात. युद्ध, त्याचे तोटे, त्यात होणारा रक्तरंजित संहार बघून आपण थबकतो. त्याच वेळी डेसमंड डॉस ला बघून कुठेतरी माणुसकी जिवंत आहे ह्याचा विश्वास आपल्याला मिळतो. मला पुन्हा एकदा स्तिमित करणाऱ्या डेसमंड डॉस ला माझा कडक स्याल्यूट. तर हा प्रवास इतक्या सुंदरपणे आपल्या समोर आणणाऱ्या मेल गिब्सन चे अभिनंदन. अजिबात चुकवू नये असा चित्रपट. अगदी शोधून शोधून एकदा तरी बघाच ह्याकसॉं रिज.

No comments:

Post a Comment