Thursday 24 August 2017

नात्यांचा सोहळा... विनीत वर्तक

दोन अपूर्णांक पूर्णांक होण्याच्या सोहळ्याला आपण लग्न अस गोंडस नाव दिल आहे. दोन वेगळे जीव, विचार, अनुभव, मत, शरीर सगळ्याच लेवल वर भिन्न असणारे जेव्हा ह्या सोहळ्याने एकरूप होतात. तेव्हा त्यांचा आनंद क्षणभर कि पुढली सात जन्म हे ठरवण्याची त्यांची डेस्टिनी त्यांनीच ठरवायची असते. अनेकदा हा एकच सोहळा त्यांच्या आयुष्यात होतो. मग प्रवास काटेरी सत्याचा होतो. काटे टोचतात म्हणून जर आपण काट्यांना बोलत राहिलो तर त्याने काही साध्य होणार नसते. रस्त्यातील काटे एकतर बाजूला करायचे किंवा आपल्या पायांना संरक्षण द्यायचं हे साध माहित असताना सुद्धा अनेकदा आपण नुसत काट्यांना दोष देत रहातो.
स्वभाव वेगळे असताना समजून घेताना आपण देहबोलीची एकच भाषा वापरतो. ती म्हणजे ओरडण्याची. हिला / ह्याला इतक ओरडून पण समजत नाही. हेच छोटे बेनबाव मोठे कधी बनत जातात आपल्याला कळत नाही. एखाद्या गोष्टीवरून उडणारे खटके मग अनेक गोष्टीवरून उडायला लागतात. आधी आवडणाऱ्या किंवा न आवडून पण दुर्लक्ष केलेल्या गोष्टी काट्या प्रमाणे टोचायला लागतात. मग ते अगदी कोणाशी फोनवरून बोलण असो वा एखादी मालिका बघण असो. शेवटी परिणीती दोन अतृप्त मन. कधी एकत्र राहणारी तर कधी काडीमोड घेऊन वेगळ होणारी.
दोन समांतर जाणाऱ्या रेषा कधी मिळत नसतात मग दोन वेगळ मन, शरीर घेऊन जन्माला आलेल्या व्यक्ती एक कश्या असतील. जन्माला आलेला प्रत्येक जण काय आय.एस.ओ. १८००० सर्टिफिकेट घेऊन जन्माला येत नाही. आपल्याला हव तसच वागाव किंवा आपल्याला आवडेल तेच करायला ते काही मशीन नाही न. मग जन्मतः असलेल्या डिफेक्ट साठी आपण आपल डोक किती वेळा आपटून घेणार आहोत. काही बदल हे नक्कीच अपरिहार्य असतात. ते नक्कीच करावेत. पण जर काही होत नसतील तर ते उत्स्फुर्तपणे स्विकारण्याची मानसिकता आपली असते का?
काही अपूर्णांक तर अगदी २०,३०, ४० वर्षानंतर पण तेच रडगाण गात असतात. कारण आपल्या क्रियेत जर बदल नाही केला तर प्रतिक्रिये मध्ये कसा बदल होईल. काही गोष्टी आहेत तश्या स्वीकारून तर काही अगदी वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊन बघण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आपण त्या व्यक्तीला बदलायला जातो. जे अशक्य असते. पण आपण प्रयत्न करत वैफल्यग्रस्त होतो. तेच जर आपण आपली प्रतिक्रिया बदलवली तर त्याचे परिणाम खूप वेगळे असू शकतात. कितीतरी असे वेगवेगळे रस्ते आहेत कि ज्याने आपण एखाद्या गोष्टीकडे बघू शकतो. त्याच वेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ शकतो. ज्याने आपल्याला हवे तसे बदल अगदी आवाज न करता हि घडू शकतात.
जेवणात मीठ नाही. पुन्हा एकदा भांडायला सुरवात करण्याआधी एकदा सांगून बघा. आज मी तुला भरवतो. आज माझ्या हातांनी खाऊ घालतो. पहिला घास तोंडात जाताच अळणी जेवणाचा घास जेव्हा तोंडातून उतरेल. तेव्हा परत कधीच जेवणात मीठ कमी पडणार नाही. कारण पुढल्या वेळेस दोन वेळेस मीठ टाकल का नाही ह्याची उजळणी होईल. हे झाल एक उदाहरण. असे अनेक वेगवेगळे रस्ते आहेत कि ज्या प्रतिक्रियांनी आपण अनेक गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू तर शकतोच पण त्यातून येणारे परिणाम सुद्धा अतिशय वेगळी छाप पडून जातात. नात्यांचा सोहळा हाच तर असतो. सतत काय कमी आहे सांगण्यापेक्षा काय जास्ती आहे ते सांगण म्हणजे पण प्रेमच.
फेसबुक आणि व्हात्स अप वर जितक्या स्माईली पाठवतो तितके आपल्या खऱ्या आयुष्यात हसण्यासाठी प्रयत्न करूयात. जास्ती काही करायची गरज नाही. दिसणाऱ्या गोष्टींच आकलन जर थोड्या वेगळ्या पद्धतीने केल तर अनेक गोष्टी खूप वेगळ्या दिसतील. शेवटी केलेला सोहळा फक्त त्या क्षणासाठी अनुभवायचा कि आयुष्यभरासाठी हे त्या दोन व्यक्तींनी ठरवायचं असत. आणि चंद्रशेखर गोखले म्हणतात तस “घर दोघांच असते. एकान पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं” हे जर जमल तर असे नात्यांचे सोहळे शेवटपर्यंत अगाध आनंदच देतात.

No comments:

Post a Comment