Thursday 24 August 2017

लेट्स सेलिब्रेट... विनीत वर्तक

आपल्याकडे नको तो आनंद आपण खूप सेलिब्रेट करतो. म्हणजे बघा आय.पी.एल. मध्ये मुंबई जिंकली म्हणून लोक केवढे खुश होते. खेळाचा आनंद हा त्यातला भाग असला तरी त्याने न काय मुंबईच नाव मोठ होणार होत न तुमच्या, आमच्या आयुष्यात काही फरक पडणार होता. न काही आर्थिक लाभ होणार होते. तसच बाहुबली च किंवा तत्सम कोणत्याही हिरोच्या चित्रपटाच. आपण उगीचच सेलिब्रेट करत असतो. पण ज्या गोष्टी खऱ्या तर आपण सेलिब्रेट करायला हव्यात त्याकडे आपण ढुंकून पण बघत नाही. आर्मीने सर्जिकल स्ट्राईक केल्यावर कोणी फटाके फोडल्याचे ऐकिवात नाही किंवा कोणत्याही क्षेत्रात भारताने एखाद उत्तुंग शिखर पादाक्रांत केल्यावर आपण कधी सेलिब्रेट करतो का? ज्या गोष्टीनी आपल्या आयुष्यात फरक पडणार आहे. ज्या गोष्टी आपला देश, राज्य, शहर, समाज ह्याच्याशी निगडीत आहेत. किंवा ज्या गोष्टीनी आपल्या आर्थिक समृद्धी मध्ये फरक पडणार आहे अश्या गोष्टी आपण कधीच सेलिब्रेट करत नाही. बऱ्याचदा त्या आपल्या आजूबाजूला घडतात ते पण आपल्याला माहित नसते. अशीच एक गोष्ट येत्या काही दिवसात घडत आहे सो लेट्स सेलिब्रेट.
सेलिब्रेट करायचं म्हणजे काही जास्ती करायचं नाही. निदान आपण त्या गोष्टीचा साक्षीदार झालो तरी ते एक सेलिब्रेशन झालंच कि. अगदी ते पण आपल्या घरात बसून टी.व्ही. वरून. वर्षोनुवर्षे चालणाऱ्या रटाळ मालिकांसाठी वेळ काढणारे आपण देशाच्या एखाद्या उत्तम कामगिरीसाठी वेळ काढायला चुकारपणा करतो. आपण तसेच आपल्या देशाचा मिडिया पण. एखाद्या टुकार बातमीसाठी किंवा ज्या चर्चेतून फलनिष्पत्ती काही होत नाही अश्या चर्चेनसाठी खूप वेळ असतो. पण देशाच्या प्रगतीच्या बातम्या कधीच ब्रेकिंग न्यूज बनत नाहीत. लालू, रबडी, नितीश-योगी, राहुल-सोनिया, मोदी-शहा, केजरीवाल-कपिल ते अगदी स्थानीय राजकारणा पर्यंत सगळ्यांचा बाईट सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत घेणाऱ्या मिडीयाला आपल्या वैज्ञानिक ते अभियंते ह्यांचा बाईट घेण्यासाठी वेळ नसतो. त्यांनी नाही घेतला म्हणून काय झाल आपण आपल्यापुरती तर सेलिब्रेट करूच शकतो. सो लेट्स सेलिब्रेट.
येत्या ५ जून ला भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रो आपला फ्याट बॉय म्हणजेच जी.एस.एल.व्ही. मार्क थ्री हे रॉकेट अवकाशात पहिल्यांदा सोडत आहे. ४३.३ मीटर उंच तर ४ मीटर चा घेर आणि ६४० टन म्हणजे जवळपास (६,४०,००० किलोग्राम) म्हणजे २०० हत्तींच वजन असलेल अस फ्याट बॉय अवकाशात झेपावेल तेव्हा गेल्या २५ वर्षातला अभ्यास, परिश्रम आणि अथक संशोधन ह्याची ती नांदी असणार आहे. एस २०० नी निर्माण होणारा ९३१६ किलोन्युटन च बल त्या सोबत भारतात निर्माण करण्यात आलेलं सगळ्यात शक्तिशाली अस सी.ई.-२० क्रायोजेनिक इंजिन. ( क्रायोजेनिक म्हणजे ह्यातील इंधन हे अतिशीत तापमानात म्हणजे उणे -१८३ डिग्री सेल्सियस ते उणे -२५३ डिग्री सेल्सियस ह्या तापमानाला साठवलेले असतात. ह्या इंधनाच्या ज्वलनाने जास्तीत जास्त बल निर्माण होत असते. त्यामुळे कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त बल निर्माण होते. पण अभियांत्रिकीच्या दृष्ट्रीने अस इंजिन निर्माण करण हे खूप जिकरीच समजल जाते.) हे इंजिन २७ टन वजनाच इंधन जाळून १८६ किलोन्युटन बल निर्माण करत ह्या फ्याट बॉय ला अवकाशात प्रक्षेपित करते.
अमेरिकेने निर्बंध घातल्यावर २५ वर्ष भारताने क्रायोजेनिक इंजिन निर्मितीवर घालवून त्या नंतर हा दिवस येतो आहे. खूप लोकांची खरे तर इस्रोतील दोन पिढ्यांतील संशोधन, परिश्रमाची फळे चाखायचा हा दिवस असणार आहे. अनेक लोकांच आयुष्य ह्या संशोधनात व्यतीत झाल आहे. ते सगळ बघण्याच भाग्य आपल्याला लाइव मिळत असताना हा दिवस आपण का सेलिब्रेट करू नये. आपल्या पेकी प्रत्येकाने अगदी आजच ठरवून थोडा वेळ प्रक्षेपण कालावधी साठी काढून ठेवू या. आपल्या मागच्या, आपल्या आणि आपल्या पुढल्या पिढीलाहि हे क्षण किती महत्वाचे आहेत ते सांगण्याची तसदी घेऊयात. ह्याच फ्याट बॉय च्या सहायाने भारत आपले अंतराळवीर पुढील काही वर्षात पाठवेल. काय माहिती त्यातला एखादा आपल्याच घरातला असेल. पण हे सगळ सत्यात उतरवण्यासाठी ज्यांनी २५ वर्ष अथक परिश्रम केले त्या सगळ्यांसाठी आपण हे प्रक्षेपण बघण्याची, त्याचा आनंद व्यक्त करण्याची संधी नक्कीच अनुभवूया. चला तर मग लेट्स सेलिब्रेट द जर्नी ऑफ इस्रो.

No comments:

Post a Comment