Thursday, 24 August 2017

भारतीय सरस्वती... विनीत वर्तक

सरस्वती हि हिंदू संस्कृतीत बुद्धीची देवी समजली जाते. त्याच बुद्धीच्या जोरावर भारतीय शास्त्रज्ञांनी एका सुपर क्लस्टर आकाशगंगेचा शोध लावला आहे. ह्या क्लस्टर ला सरस्वती हे नाव देण्यात आल आहे. ज्यांना सुपर क्लस्टर आकाशगंगा म्हणजे काय? हे समजत नाही त्यांनी तिकडे पण जाती आणि धर्म आणून सरस्वती हे नाव का? अश्या तऱ्हेची चर्चा सुरु केली आहे. तूर्तास ते बाजूला ठेवून हा शोध किती महत्वाचा आणि भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे हे समजून घेऊ.
सुपर क्लस्टर आकाशगंगा म्हणजे काय तर सुरवात आपल्या पृथ्वीपासून. आपली सौरमाला ज्यात सूर्यापासून सगळे ग्रह येतात ती मिल्की वे ह्या आकाशगंगेचा भाग आहे. आपली आकाशगंगा व शेजारच्या काही आकाशगंगा मिळून एक लोकल क्लस्टर तयार होते. आपली मिल्की वे ज्या लोकल क्लस्टर चा भाग आहे त्यात ५४ पेक्षा जास्ती मिल्की वे सारख्या आकाशगंगा आहेत. हा ग्रुप जवळपास १० मिलियन प्रकाशवर्ष ह्या अंतरावर पसरला आहे. (१ प्रकाशवर्ष म्हणजे १ वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर. प्रकाशाचा वेग आहे ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद) असे अनेक लोकल क्लस्टर मिळून एक सुपर क्लस्टर तयार होते. आपली आकाशगंगा लानियाकीया ह्या सुपर क्लस्टर चा भाग आहे. ह्या सुपर क्लस्टर ची व्याप्ती आहे जवळपास ५०० मिलियन प्रकाशवर्ष. असे सुपर क्लस्टर ह्या विश्वात सुमारे १० मिलियन आहेत. ह्यावरून विश्वाच्या व्याप्तीचा थोडा अंदाज आपण लावू शकतो.
भारतीयांनी ज्या सुपर क्लस्टर चा शोध लावला आहे त्याची व्याप्ती बघून आपण स्तिमित होऊन जाऊ. सरस्वती सुपर क्लस्टर आपल्यापासून सुमारे ४०० कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हे सुपर क्लस्टर ६०० मिलियन प्रकाशवर्ष अंतरावर पसरल आहे. ह्याच वय १० बिलियन वर्ष असून तब्बल २० मिलियन बिलियन सूर्या इतक त्याच वस्तुमान असेल असा अंदाज आहे. आयुका आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, पुणे ह्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. आपल्या मिल्की वे ज्या लानियाकीया सुपर क्लस्टर चा भाग आहे. त्याचा शोध अवघ्या ३ वर्षापूर्वी लागला आहे. असे काही थोडेच सुपर क्लस्टर मानवाला माहित आहेत. म्हणूनच विश्वाच्या अश्या सुपर क्लस्टर बद्दल आपल्याला अजून खूप जाणून घ्यायचं आहे.
सरस्वती सुपर क्लस्टर च महत्व अजून एका कारणासाठी आहे. ते म्हणजे तीच पृथ्वीपासूनच अंतर. आता आपण जो प्रकाश बघत आहोत त्या क्लस्टर पासून ४०० कोटी वर्षापूर्वी निघालेला आहे. ४०० कोटी वर्षापूर्वीच विश्वाच दालन आपल्या समोर खूल झाल आहे. ह्या सगळ्यामुळे विश्वाची उत्पत्ती ते सुपर क्लस्टर ची निर्मिती, डार्क म्याटर तसेच इतर अनेक गोष्टींचा अभ्यास करता येणार आहे. अस सुपर क्लस्टर निर्मितीमागे असणार गुरुत्वाकर्षण आणि डार्क म्याटर कश्या तऱ्हेने आज जे विश्व बघत आहोत त्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत आहे ह्याचा अभ्यास करता येणार आहे.
आपण विश्वात खूप क्षुद्र आहोत. माणूस ह्या प्रचंड विश्वात अणु पण नाही आहे. ह्या विश्वाच्या निर्मिती पासून ते अंतरापर्यंत अजून आपण निश्चित काहीच सांगू शकत नाही आहोत. कारण हि अंतर इतकी प्रचंड आहेत कि कदाचित तिकडून निघालेला प्रकाश अजून आपल्या पर्यंत पोचलाच नाही आहे. आपण कोण? आपल अस्तित्व काय? अश्या साध्या प्रश्नांची उत्तर आपल्याला अजून मिळाली नाही आहेत. त्या उत्तरांच्या शोधात मानव आता उपलब्ध असलेल्या विज्ञानाचा वापर करून आपल्या परीने उत्तर शोधत आहे. ह्या मानवाच्या संशोधनात भारतीय पण तितकच मोलाच योगदान देत आहेत हे बघून खूप मस्त वाटल. ह्या सरस्वती च्या शोधाने आपल्या माहितीची अनेक दालने उघडतील ह्यात शंका नाही. ह्या शोधामागे अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व आयुका आणि भारतीय शास्त्रज्ञांना माझा सलाम.

No comments:

Post a Comment