Thursday, 24 August 2017

उमलणं आणि फुलणं... विनीत वर्तक

उमलण हे आधी तर फुलणं त्यानंतर आहे. अश्या ओळी चंद्रशेखर गोखल्यांच्या एका चारोळीत आहेत. जेव्हा हे वाचल तेव्हाच किती मोठा अर्थ त्यात आहे जाणवलं होत. ह्या दोघातल्या अंतराची जाण यायला मात्र थोडा वेळ लागला. मुंबई- पुणे- मुंबई ह्या मराठी चित्रपटात पण एक सुरेख वाक्य आहे. आपण न नात्यांना उमलूच देत नाहीत. ह्या दोन शब्दांच्या अर्थातील फरक मला तेव्हा जास्ती जाणवला. उमलणं किती स्वाभाविक आहे तर फुलण्यामध्ये कृत्रिमता आहे. बोलताना आणि विचार करताना सुद्धा त्यातला फरक आपल्याला नक्की जाणवतो.
आजकाल आपण नात्यांना फुलवायला लागलो आहोत. म्हणजे खूप साऱ्या अश्या गोष्टी करायच्या कि ते खूप फुलायला हव. पण अस करताना त्यातली सहजता आपण गमावून बसतो आहोत हे लक्षात हि येत नाही. आपण खूप फुलवल तरी त्याने समाधान होतच नाही. आपण सतत एकाकडून दुसऱ्याकडे शोधत रहातो. फुलांचा मळा बघून जितक छान वाटत नाही. त्यापेक्षा कैक जास्त एखादी पावसाची सर येऊन गेल्यावर दवबिंदू असलेल्या एका नाजूक फुलाला बघताना येते. कारण ते उमलणं असते पण आपण कधी हा विचार करतच नाही.
कोणतही नात फुलवण्याची आपल्याला घाई असते. कधी एकदा ते फुलते कि मग आपल्याला खूप छान वाटेल अस आपल्याला वाटत असते. त्यासाठी आपण अनेक कृत्रिम गोष्टी पण करतो. अगदी छान दिसण्यापासून ते आपला मूळ स्वभाव बदलण्यापर्यंत. आपण इतक केल्याने तरी ते फुलेल अशीच आशा आपल्याला असते. कधी तरी ते फुलते पण. त्या फुलण्याला उमलण्याची सहजता असत नाहीच. कारण कृत्रिमता किती सहज असली तरी कृत्रिम असते हे सत्य आहे. कदाचित आपल्याला हव आहे ते मिळवणाच्या नादात आपण त्यातल ते उमलणं कधीच संपवून टाकतो. नाती उमलायला हवीत कदाचित ती पूर्ण उमलणार नाहीत. पण जितकी उमलतील तितकी फुलण्यापेक्षा जास्तीच आनंद देतील.
हे फक्त मनापुरती मर्यादित नाही. शारीरिक श्रुंगारामध्ये हि तितकच खर आहे. आश्वासक स्पर्श हा कोणताही असू शकतो. हातात हात घेण्यापासून ते चुंबन ते अगदी मिठी. काही वेळा तो शरीराच मिलन पण असतो. किंवा काही वेळा मिलन सोडून सगळ्या लेवल वर असतो. पण अनेकदा आपण मिलन हेच पूर्णत्व मानून ते मिळवायला निघतो. कदाचित ते मिळवतो हि पण त्या मिळवण्यामध्ये उमलणं असते का? ह्याचा विचार आपण कधी नाही करत. एका मिठीत जो आश्वासक स्पर्श असेल तो संभोगात असेलच अस नाही. ह्या दोन्ही क्रिया खूप वेगळ्या आहेत. मिठीतून जर इतक मिळते तर मग पुढे पण इतकच मिळेल ह्या भ्रमात आपण अनेक पावल चालतो. सगळ करूनही जेव्हा ते आश्वासक मिळत नाही तेव्हा आपण चूक केल्याची भावनाच मनात निर्माण होते.
काही नाती हि शब्दांमधून उमलतात तर कधी स्पर्शानंमधून त्या स्पर्शामध्ये हि अनेक टप्पे असतात. कोणत्या टप्प्यावर ती उमलतात आणि कोणत्या टप्प्यावर ती फुलतात हे ओळखता येण हीच तर आपली प्रगल्भता. बाकी परमोच्च भावना नेहमीच परमोच्च क्षण देते अस काही नसते. आपला सेक्स चा अभ्यास हा फक्त संभोगापुरती मर्यादित असेल तर भावनांच्या उमलणं आणि फुलण्याला आपल्या गाठी काहीच अर्थ नसतो हे सत्य स्वीकारायला हव. आजकाल असा विचार करणारे खूप कमीच आहेत आणि म्हणूनच फेसबुक आणि व्हात्स अप वर फुलणाऱ्या नात्याचं पिक आहे पण त्यातली उमलणारी किती असा प्रश्न केला तर अगदीच नगण्य असच उत्तर येत.
गोखले म्हणतात तस फुलणं नंतर आहे. नाती फुलवण सोप्प आहे. ती फुलतात जस आपण खत, पाणी टाकू तशी. पण कठीण आहे ते नात उमलणं. कारण तिथे खूप काही लागते खत आणि पाण्यापलीकडे. तिकडे सहजता असते, एक परिपूर्णता असते. अशी अनेक नाती असू शकतात. तिकडे स्वामित्व हे त्या क्षणापुरती असते. फुलण्यात एक लक्ष असते तर उमलण्यात सहजता असते. बघा कदाचित आपण नकळत नाती फुलवण्यात व्यस्त आहोत. त्यांना उमलू द्या कदाचित ती त्या फुलवण्यापेक्षा जास्ती समाधान आणि आनंद आपल्याला त्यांच्या उमलण्यातून देतील.

No comments:

Post a Comment