Thursday 24 August 2017

अडकलेला पतंग... विनीत वर्तक

चंद्रशेखर गोखल्यांची एक चारोळी मला खूप आवडते ती म्हणजे “अडकलेला पतंग आधी काढायला बघतात, नाही निघत म्हंटल्यावर फाडायला निघतात” ह्या चारोळीत इतका खोल अर्थ आहे कि माणसाच्या स्वभावाची एक काळी बाजू पटकन समोर येते. माझ नाही झाल ते मी दुसऱ्या कोणाच होऊ देणार नाही. हा आपला स्वभाव अडकलेल्या पतंगात दिसतो तर नात्यांमध्ये तर तो अजून प्रकर्षाने समोर यायला हवा. तसच होताना आपण सगळीकडे बघतो.
आजच्या जमान्यात तर भिंतीपलीकडली नाती खूप तयार होतात. तयार होतात तशी तुटत पण जातात. काळाच्या कसोटीवर तोलून रहाणारी काहीच असतात. पण ह्या तुटलेल्या नात्याचं त्या अडकलेल्या पतंगासारखी अवस्था असते. एकीकडे हवेतून उडण्याचे ते क्षण ताजे असताना आपण आपल काहीतरी गमावल्याच शल्य. मग जेव्हा कोणातरी दुसऱ्याची नजर तिकडे जाते तेव्हा मग दुसर कोणी त्यावर स्वामित्व सांगू नये म्हणून त्याची चिरफाड करण्याची चढाओढ दोन्ही कडून सुरु होते. अगदी विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी लोकांपुढे मांडून त्यावर होणाऱ्या चिखलफेकीचा असुरी आनंद घेतला जातो.
कधी कधी मग दोन्ही बाजूने युद्ध सुरु होते. एकमेकांवर विश्वासाने शेअर केलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी समाजात मांडण्याची स्पर्धा. ह्यात मधल्या लोकांना आनंद मिळत असतो. म्हणजे उघडपणे दुसऱ्याची बाजू घेणारे आपल्याला समोरचा किती चुकीचा हे सांगून तू केलस ते बर केलस असा सल्ला देण्यास हि कचरत नाहीत. पुढे अजून असच चालू राहुंदे ह्यासाठी पाठींबा हि. शब्दांनी केलेले वार हे तलवारीपेक्षा हि घातक असतात हे समजून सुद्धा आपण त्या शर्यतीत भाग घेतो. अडकलेला पतंग माझा नाही तर कोणाचा नाही हि भावना इतकी प्रबळ असते कि ह्यात आपण आपल किती नुकसान करत आहोत ह्याचा अंदाज हि आपल्याला येत नाही. जेव्हा तो फाटतो तेव्हा आपण वागलेल्या चुकीच्या वागण्याच एक खोट समाधान नक्की मिळते. पण ह्या सगळ्यात आपण स्वतःला किती खोल गर्तेत बुडवून टाकल ह्याचा अंदाज यायला वेळ लागतो.
अडकलेला पतंग तिकडेच रहातो. त्याची लक्तरे तिकडे लटकवयाची कि त्या पतंगाच्या सोनेरी आठवणी तश्याच जपून ठेवायच्या हे आपल्या हातात आहे. नात्याचं पण तसच असते. आपण घालवलेले क्षण जपायचे कि एकमेकांवर उलटून त्याचा सूड घ्यायचा हे आपण ठरवायला हव. एकांतात किंवा एकमेकांसोबत शेअर केलेल्या गोष्टी, अनुभवलेले क्षण जर सगळ्यांसमोर आणून आपण दबावतंत्र किंवा समोरच्याचा राग मनातून काढत असू तर आपल्या प्रवृत्तीचा आपणच विचार करायला हवा. कदाचित आज तुम्ही ड्रायव्हर सिट वर असाल पण उद्या रीसिविंग टोकाला असू तेव्हा निर्माण होणाऱ्या मानसिक आंदोलन, त्रास त्यातून निर्माण होणारे प्रश्न ह्या सगळ्याला आपण कसे तोंड देणार आहोत ह्याचा विचार झाला पाहिजे. 

सॉरी बोलून झालेला त्रास किंवा मला अस होईल अस वाटल नव्हत सांगून गोष्टी बदलत नसतात. अडकेला पतंग फाडता येतो पण चिकटवता येत नाही. तेव्हा फाडण्याआधी विचार करायला हवा. दोन व्यक्ती कोणत्याही लेवल वर जोडलेल्या असताना गोष्टी आपल्या मनाप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे नाही झाल्या तर शांतपणे वेगळ होण उत्तम. त्याचा बाजार केलात तर आपल्याही अंगावर शिंतोडे उडणार अगदी तुम्ही कितीही काळजी घेतली तरीच. चोरी करताना पण त्याचे अलिखित नियम असतात मग इकडे तर दोन जीवांचा प्रश्न असतो. काही नियम अलिखित आपण पाळायला हवेच.
समोरची व्यक्ती जर ह्या तत्वात बसणारी नसेल तर अश्या व्यक्तीपासून चार हात लांब राहिलेले बरे. व्यक्ती कर्तुत्वाने किती का मोठी असेना पण जर कॉमन सेन्स नसेल तर तेवढ्यास तेवढ राहिलेलं निदान आपला कॉमन सेन्स सांगत. आमचे एक सर नेहमी सांगायचे युज युर कॉमन सेन्स व्हीच इज नॉट सो कॉमन. तस करायला आपण शिकायला हव. कोणाच वाईट बघून आपल चांगल होत नसते न त्याच्या कर्माच फळ आपल्याला मिळणार असते. त्यामुळे कोण चूक आणि कोण बरोबर असा वाद घालताना आपल्या नात्याच्या मर्यादा प्रत्येकाने जपायला हव्याच. फेसबुक किंवा व्हात्स अप सारख्या सोशल प्लाटफोर्म वर आपल्या त्या नात्याचे वाभाडे काढून आपण खूप मोठ काहीतरी केल. ह्या आवेशात अनेक व्यक्ती वावरत असतात. पर्सनल च्याट , पर्सनल मेसेजेस, पर्सनल फोटो ते पर्सनल गोष्टी एकमेकात शेअर केलेल्या गोष्टींच्या पोस्ट करून आपण किती माती खातो ह्याचा अंदाज हि काही व्यक्तींना नसतो.
अगदी साध्या गोष्टीत पण काही नियम, एथिक्स असतात. जर ते नियम आणि एथिक्स आपल्याला पाळता येत नसतील किंवा समोरचा पाळत नसेल तर अश्या व्यक्ती सतत मानसिक त्रासातून जात असतात. कारण दुसऱ्याला त्रासात बघून होणारा कुत्सित आनंद आपल्या स्व ला सुखावत असेल पण मनातून आपण पूर्ण तुटतो. काही व्यक्तींना ह्याच काही पडलेलं नसते. ते दर काही दिवसांनी असे पर्सनल मेसेज उगाच शेअर करून आपण किती मोठे ह्यासाठी शाबाशकी हुजऱ्या लोकांकडून मिळवत असतात. म्हणून अडकलेला पतंग काढायचा कि फाडायचा हे आपण ठरवायचं. निघत नसेल तर त्याला तिकडे ठेवून शांतपणे पुढे जायचं कि दगड मारत त्याची लक्तरे वेशीवर लटकवण्यापेक्षा तो अडकलेला पतंग तिथेच छान दिसतो नाही का?

No comments:

Post a Comment