Thursday, 24 August 2017

सह्याद्रीमधला झिंगाट... विनीत वर्तक

पावसाळा सुरु झाले कि वेध लागतात ते पावसाळी पिकनिक आणि तिर्थक्षेत्रानां जाऊन झिंगाट करण्याचे. महाराष्ट्रावर सह्याद्राची कृपा असल्याने असे झिंगाट पोइंट अनेक ठिकाणी हळूहळू निर्माण झाले. ह्यातल सर्वात मोठ तिर्थक्षेत्र म्हणजेच मुंबई- पुण्याच्या मध्ये असलेला भुशी डयाम. मी तिर्थक्षेत्र मुद्दामून म्हणतो आहे कारण जसे तिकडे जाऊन आपण आपल अस्तित्व विसरून त्या शक्तीशी समरूप होतो. तसेच इकडेही समरूप होण्यासाठी लोक जमतात. फरक इतकाच कि तिकडे भक्तीभाव असतो इकडे मादिराभाव असतो. पण तल्लीनता कुठेच कमी नसते.
असे अनेक पोइंट महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत. दरवर्षी दारू पिऊन होऊन अपघात होण्याचे प्रकार तर असंख्य आहेतच पण त्या पलीकडे ह्यात माज आणि ग्ल्यामर येत आहे. म्हणजे तुम्ही एकतर दारू प्यायला नाहीत तर गावठी, मागासलेले किंवा निसर्गाची मज्जा अनुभवता न आलेले अरसिक प्राणी आणि आपल्यापुरते झालात तर तुमच्यात दम नाही. म्हणजे काय कि तल्लीन होईन तर भक्तीच प्रदर्शन हवेच मग ते कितीही ओंगळवाण किंवा जीवावर बेतलेल का असेना पण करायला हव. मग तुमचा भक्तीभाव निसर्गा पर्यंत पोहोचतो आणि मग तुम्हाला त्या क्षेत्री जाण्याच समाधान लाभते. ह्या सगळ्या काळात आपण जे काही करतो ते बाकीच्यांनी समजून घ्यायचं हाच तो माज.
निसर्गाच्या त्या सुंदरतेत तल्लीन होताना थोड हलक झाल तर काय बिघडल? अर्थात काहीच बिघडत नाही जोवर ते हलक होण आपल्या सीमेमध्ये असते. पण निसर्गाच्या अदाकारीत आपण सीमा केव्हाच ओलांडून टाकतो आपल्याला कळण्याच्या आधी. दारू प्यावी का नाही हा वेगळा प्रश्न कारण त्याच व्यसन आणि माज होईपर्यंत काहीच वाईट नसते हे माझ मत. भारतीय लोक विशेष करून दारू दाखवायला पितात. म्हणजे मी १ लिटर पितो कि २ लिटर ह्यावरून माझी मजल केवढी आहे. ते ठरवतो. खरे तर भारताबाहेर दारूत पाणी मिक्स करून कोणी दारू पितच नाहीत. त्यात बर्फ टाकतात कारण त्याचा ब्लेंड अनुभवणे हे कुठेतरी असते. त्यामुळे दारू कशी प्यावी इथपासून आपली सुरवात आहे. असो हा भाग विषय सोडून आहे.
निसर्गाला अनुभवयाला आणि झिंगाट करायला दारू ची गरज हवीच कशाला? जेव्हा निसर्ग तुमच्यासमोर असा ओसंडून वहात असतो तेव्हा नशेची खरच गरज आहे का? ह्याचा विचार प्रत्येकाने करावा. आपण त्या निसर्गात असताना एका वेगळ्याच धुंदीत असतो त्यात दारूची सोबत नशेवर नशा देते आणि क्षणांचा नाश करते. तिर्थक्षेत्री दारू सेवन करून माज करणाऱ्या तरुणांना आवरायला आणि त्यांची धुंदी उतरवायला पोलीस किंवा इतर दल कुठे कुठे पुरे पडणार आहेत? आपली काळजी आणि आपल्या सोबत आलेल्या लोकांची काळजी व सन्मान ठेवणे इतक साध तत्व जर आपण धुंदीत विसरून जात असू तर आपण आपल्यात डोकावण्याची गरज आहे.
सेल्फी आणि मोबाईल शुटींग करून निसर्गाला कवेत नाही पकडता येत. त्यासाठी ते क्षण मनात भरायला लागतात हे आपल्याला शाळेत शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. सरसकट व्यवस्थेवर दोष देऊन काहीच होणार नाही. प्रोब्लेम आणि त्याच उत्तर दोन्ही आपल्या हातात आहे. निसर्गात झिंगाट नक्की व्हा. कारण आजच्या स्ट्रेस असलेल्या जीवनात ते गरजेचे आहे. पण त्यासाठी आपल्या सीमा लक्षात असू द्या. डोंगराच्या कड्यावरून उडी मारण्याची आणि हवेतून विहारण्याची इतकीच खाज असेल तर दुबई, अमेरिका इकडे जाण्याची ताकद निर्माण करा. तिकडे २०० डॉलर्स मध्ये अति उंचावरून हवेत उडण्याची झिंग अनुभवता येते. तितकी आपली कुवत नसेल तर दारू पिऊन उगाच सह्याद्री मध्ये ते साहस करण्याची हिंमत दाखवू नका.
आपल्या घरी कोणीतरी आपली वाट बघते आहे. त्याच भान आपण नेहमीच ठेवल पाहिजे. निसर्गाचा मान आणि घराच भान आपण ठेवू तेव्हा हा रांगडा सह्याद्री आपल्याला वेगळा जाणवेल. अगदी कोकणापासून ते गुजरात पर्यंत. सह्याद्री अनुभवायला ट्रेकर व्हायलाच पाहिजे अस नाही. कारण ट्रेकर हा शब्द आपण असा काही वापरतो जणू काही डोंगरात जाऊन आल्यावर आणि एखादा ट्रेक केल्यावर कोणत्याही डोंगरावर जाण्याच स्वामित्व आपल्याला मिळालेलं असते. म्हणून ट्रेकर न होता सुद्धा आपण सह्याद्री अनुभवू शकतो. त्याच प्रमाणे झिंगाट न करता सुद्धा. दोन्ही टोकावर जाण्याची घाई नको. अतिसाहस आणि अतिझिंगाट ह्या दोन्ही वेळेस “नजर हटी दुर्घटना घटी” हे सगळ्यांनी लक्षात ठेवल पाहिजे. तूर्तास ह्या रांगड्या सह्याद्री चा आनंद आपल्या सीमेत राहून घ्या हीच विनंती.

No comments:

Post a Comment