उद्या इस्रो भारताचा जी स्याट १७ हा उपग्रह एरियन ५ इ सी ए ह्या रॉकेट मार्फत प्रक्षेपित करत आहे. ह्या एका महिन्यात तिसऱ्या उपग्रहाच उड्डाण इस्रो करत आहे. ह्या महिन्याच्या सुरवातीला आपल्या सगळ्यात शक्तिशाली रॉकेट मधून जी स्याट १९ हा उपग्रह प्रक्षेपित केला. त्या नंतर आपल्या सगळ्यात भरवशाच्या वर्क हॉर्स द्वारे काट्रोस्याट सिरीज मधील दुसरा उपग्रह प्रक्षेपित केला. उद्या एका महिन्यात तिसऱ्या उपग्रहाच्या उड्डाणासाठी इस्रो पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
जी स्याट १७ हा दळणवळण प्रणाली मधील उपग्रह असून ह्याच वजन ३४७७ किलोग्राम आहे. ह्या उपग्रहाच्या सोलार प्यानेल ने ६००० व्याट इतकी उर्जा निर्माण केली जाणार असून ह्या उपग्रहावर २४ सी ब्यांड १२ अपर सी ब्यांड सोबत इतर अनेक ट्रान्सपोंडर लावलेले आहेत. ह्या उपग्रहामुळे भारताच्या कम्युनिकेशन वाढणाऱ्या गरजा भागवण्यास मदत होणार आहे. हा उपग्रह पृथ्वीपासून ३६,००० किमी वर उंचीवर भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित केला जाईल. भूस्थिर कक्षेत ह्याच्या व पृथ्वीच्या परीवलनाचा वेग सारखा असल्याने हा एका ठिकाणी अढळ होईल.
कोणाच्याही मनात प्रश्न येऊ शकतील कि इतक्या वजनाचे उपग्रह घेऊन जाण्याची जी.एस.एल.व्ही मार्क ३ ची क्षमता असताना आपण एरियन रॉकेट का वापरत आहोत? ह्याच उत्तर दडल आहे एका दुसऱ्या शक्यतेत जर जी.एस.एल.व्ही मार्क ३ जर अयशस्वी झाला असता तर मग जी स्याट १९ प्रक्षेपित झाला नसता. अश्या परिस्थितीत प्लान बी म्हणून भारताने जानेवारीत एरियन कडे ह्या दुसऱ्या उपग्रहाच प्रक्षेपण बुक केल. पहिल्या उड्डाणात यशस्वी होण्याची खात्री कमी असताना असा ब्याक अप प्लान ठेवणे भारताच्या वाढत्या गरजेसाठी गरजेचे होते.
इस्रो एकाच वेळी तीन वेगळ्या रॉकेट आणि उपग्रह प्रणाली वर ह्या दरम्यान काम करत होती. तीन उपग्रह तीन वेगळ्या रॉकेट प्रणाली द्वारे प्रक्षेपित करणे इतक सोप्प नाही. तीनही उपग्रहांच महत्व वेगळ आहे. त्यांची कक्षा, त्यावर लावण्यात येणाऱ्या गोष्टी, सौर प्यानेल ते किचकट रॉकेट आणि उपग्रह प्रणाली मधील गोष्टी प्रत्येक स्तरावर यशस्वी होण अत्यंत गरजेचे असते. एक चूक आणि पूर्ण मोहीम हि अयशस्वी ठरवली जाते. ह्यात गुंतलेला पैसा मोठा असला तरी आपल्या कामावरचा आणि आपण विकसित केलेल्या प्रणाली वरचा विश्वास हेच सगळ्यात महत्वाच असते. एक चूक आणि आपण लगेच ४-५ वर्ष मागे जातो. कारण कोणत्या प्रणाली मध्ये चूक झाली तिची पायामुळ कदाचित ५ किंवा जास्ती वर्षाआधी ठरवलेल्या गोष्टीत असू शकतात. त्यात बदल म्हणजे पुढच्या ५ वर्ष त्यावर काम केलेल्या प्रत्येक प्रणाली मध्ये बदल. ह्या सगळ्यात खर्ची होणार मनुष्य बळ तसेच पैसा हा अमाप असतो व म्हणूनच रॉकेट सायन्स हे सगळ्यात कठीण समजले जाते.
ह्या सगळ्यांमुळे इस्रो च यश हे खूप महत्वाच आहे. तीन वेगळ्या रॉकेट प्रणाली, तीन वेगळे उपग्रह आणि ह्यातील दोन प्रक्षेपणात १०० पेकी १०० मार्क हे यश अनेक वर्षांच्या मेहनतीच आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रश्न येउच शकतो कि इतके सगळे उपग्रह पाठवून त्याचा सर्वसामान्य माणसाला फायदा काय? तर आज आपण अगदी सहजपणे मोबाईल खिशात ठेऊ शकतो ते इस्रो मुळे. आज वादळाच अवलोकन ३ दिवस आधी करू शकतो ते इस्रो मुळे, आज आपल्या सीमा मग त्या जमिनीवर असो वा समुद्रात, रात्र असो वा दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतो ते इस्रो च्या उपग्रहांमुळेच. ह्या पलीकडे मंगळ आणि चंद्र मोहिमेने काय दिल तर पृथ्वीशिवाय माणसाच्या दुसऱ्या ग्रहावरील वस्तीसाठी इतर देशांप्रमाणेच भारत कुठेही मागे नाही. तिकडे जो पहिला तो जिंकला ह्या नियमात भारत मागे नाही. ह्या शिवाय सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात वरदान ठरणारे अनेक शोध हे अवकाश विज्ञानातून लागलेले आहेत. त्यामुळे एकाच वेळी १०४ उपग्रह, पहिल्या प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश ह्या सोबत एका महिन्यात लागोपाठ तिसऱ्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाला सज्ज होऊन इस्रो ने हम भी लंबे रेस का घोडा है हेच जगाला दाखवून दिले आहे. ह्या तिसऱ्या महत्वाच्या उड्डाणासाठी इस्रो ला शुभेछ्या.
No comments:
Post a Comment