Thursday 24 August 2017

वेध भविष्याचा... विनीत वर्तक

१५ फेब्रुवारी २०१७ पूर्ण जगाच लक्ष भारताकडे लागल होत. अवघ्या ३० मिनिटात १०४ न्यानो उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात भारताने यश मिळवलं. १९६९ ते २०१७ ह्या काळातला इस्रो चा प्रवास थक्क करणारा आहे. स्पेशली गेल्या ५-१० वर्षात ज्या तऱ्हेने मोहिमा यशस्वी केल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील एक समर्थ स्पेस एजन्सी म्हणून इस्रो कडे बघितल जात आहे. १०४ उपग्रहांपलीकडे मंगळ मोहीम व चंद्र मोहिमेमुळे इस्रो च जगातील स्थान पक्क होण्यास मदत झाली आहे.
उपग्रहाच निर्माण, रॉकेट निर्माण, त्यातली अभियांत्रिकी प्रणाली, तसेच त्याच प्रक्षेपण आणि त्या नंतर त्याचा संवाद आणि त्यातून मिळणारा फायदा इतपर्यंत सगळ्या पातळीवर इस्रो ने काम केलेलं आहे. उपग्रह निर्माण करणारे देश खूप आहेत. रॉकेट बनवणारे थोडेच. त्यातही ७३ मिलियन डॉलर मध्ये कल्पनेपासून प्रत्यक्ष उपग्रह मंगळाच्या कक्षेत स्थापन करण्याचा कालावधी ३ वर्षापेक्षा कमी आणि इतक्या कमी पैश्यात पहिल्याच प्रयत्नात पाठवणारा जगातील पहिला देश आणि अशी हनुमान उडी घेणारी इस्रो जगातील एकमेव स्पेस एजन्सी आहे. मंगळयान लक म्हणून यशस्वी झालेली मोहीम नव्हती हे दाखवण्यात पाठोपाठ केलेल्या १०४ उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रो च्या तंत्रज्ञांनावर आता जगातील बरेच देश भरोसा ठेवू लागले आहेत.
इस्रो वर असलेला भरोसा आता पैश्याच्या रुपात दिसायला सुरवात झाली आहे. कमर्शियल उपग्रह प्रक्षेपणातून इस्रो ने २०१५-२०१६ मध्ये ४० मिलियन अमेरिकन डॉलर ची कमाई केली आहे. हि रक्कम खूप मोठी वाटत असली तरी जगातील उपग्रह च्या बाजारातील हा फक्त ०.६% इतकाच हिस्सा आहे. ३०० बिलियन अमेरिकन डॉलर इतकी किंमत असलेल्या बाजारात इस्रो ला प्रचंड पल्ला गाठता येऊ शकतो. किंबहुना आज पर्यंत इस्रो ने आपल्या लौकिकास साजेसा बाजारातील हिस्सा कमावलेला नाही आहे हे वास्तव आहे. हे लक्षात घेऊनच इस्रो ने आपल्या मार्यांदांवर काम करायला सुरवात केली आहे. इकडे दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एकतर इस्रो च पाहिलं ध्येय हे देशाच्या गरजा भागवण आहे. त्यात इस्रो कडे दोन गोष्टी कमी होत्या ते म्हणजे प्रक्षेपण स्थळ आणि असेम्ब्ली बिल्डींग. एकच प्रक्षेपण स्थळ असल्यामुळे एका वेळी एकाच रॉकेट वर इस्रो काम करू शकत होती. पण आता दुसर प्रक्षेपण स्थळ कार्यान्वित झाल आहे. ह्यामुळेच एका महिन्यात इस्रो दोन रॉकेट च उड्डाण काही महिन्यांपूर्वी करू शकली होती. दुसरी असेम्बली बिल्डींग च काम सुरु असून ती येत्या वर्षाखेर कार्यान्वित होण अपेक्षित आहे.
दोन असेम्बली बिल्डींग आणि दोन प्रक्षेपण स्थळ ह्यामुळे इस्रो ला एकाच वेळी वेगवेगळ्या रॉकेट वर आणि वेगवेगळ्या स्टेजेस वर काम करता येणार आहे. २०२० पर्यंत ३०० बिलियन अमेरिकन डॉलर च्या बाजारातील हिस्सा काबीज करण्यासाठी वर्षाला २० रॉकेट उड्डाण करण्याच इस्रो च लक्ष आहे. ह्यातील ५०% जरी कमर्शियल उड्डाण पकडली तरी इस्रो च्या नफ्यात कित्येक मिलियन डॉलर ची वाढ अपेक्षित आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया ह्या सगळ्या योजनांमध्ये आकाशातील हिस्सा ह्यापुढे खूप मोठा असणार आहे. टीम इंडस, अर्थ टू ओर्बिट, एस्त्रोम टेक्नोलॉजी, बेलाट्रीक्स एरोस्पेस, स्याटशुअर सारख्या स्टार्ट अप कंपनी ह्या मध्ये महत्वाच योगदान देत आहेत. ह्या सगळ्या कंपन्यान मध्ये तरुण रक्ताचा सहभाग प्रचंड आहे.
भविष्याचा वेध घेताना २ चंद्र मोहिमा, शुक्र मोहीम, सूर्या वरची आदित्य मोहीम, निसार मोहीम, मंगळ मिशन २, ह्या शिवाय भारताच्या गरजा भागवायला लागणारे लष्करी तसेच दूरसंचार उपग्रह व त्या सोबत कमर्शियल रॉकेट लोन्चेस ह्या सगळ्या मोहिमांनी इस्रो ची पुढील काही वर्षाची दिनदर्शिका भरलेली आहे. ह्या सगळ्यामुळे ह्या क्षेत्रात कमालीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी पलीकडे दुसर कोणत क्षेत्र भारतात क्रांती घडवणार असेल तर ते अवकाश क्षेत्र असणार आहे. येणाऱ्या काळात दूरसंचार, दळवळण त्या पलीकडे आपल्या सारख दुसर कोणी तरी विश्वाच्या ह्या पसाऱ्यात आहे का? ह्याचा शोध घ्यायला नवीन नवीन देश सुसज्ज होणार आहेत. त्या सर्व गरजा कमी पैश्यात पूर्ण करणारा देश म्हणून भारत अग्रेसर असणार ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment