आपण ह्या विश्वात एकटेच का? हा प्रश्न मानवाला त्याच्या उत्क्रांती पासून पडला आहे. ह्या पृथ्वी शिवाय ह्या विश्वात असा कोणता दुसरा ग्रह असेल कि ज्यावर अजून कोणी असे प्राणी असतील? किंवा पृथ्वी शिवाय आपण अन्य कोणत्या ग्रहावर वस्ती करू शकू का? अश्या प्रश्नांना आता प्रगत विज्ञानामुळे मूर्त स्वरूप मिळताना दिसत आहे. विश्वाचा आवाका इतका प्रचंड आहे कि त्यातली अंतर खरे तर माणसाच्या ह्या शोधापुढची खरी अडचण आहे. इंटरस्टेलर म्हणजेच आपल्या सौरमाले प्रमाणे विश्वात अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या सौरमालेमध्ये केलेला प्रवास. आपल्याला सर्वात जवळचा असणारा तारा म्हणजेच अल्फा सेंचुरी आपल्यापासून ४.३७ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या अफाट वेगाने प्रकाश ४.३७ वर्षात जितक अंतर कापेल तितक हे प्रचंड अंतर आहे. ह्यामुळेच इंटरस्टेलर मिशन हे उद्याच स्वप्न बनून राहील आहे.
आनंदाची बातमी हि कि ह्या स्वप्नातल्या मिशन ला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. ह्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था किंवा इस्रो चा सहभाग लक्षणीय आहे. रशियातील बिलोनियर युरी मिलनेर हा ब्रेकथ्रू स्टारशॉट नावाचा एक रिसर्च प्रोजेक्ट फंडिंग करतो आहे. हे प्रोजेक्ट सपोर्ट केल आहे जगातील नामवंत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग ह्यांनी. ह्या संस्थेने न्यानो उपग्रह तयार केले आहेत. ४ ग्राम वजन, ३.५ सेंटीमीटर लांब असणाऱ्या प्रोटोटाईप न्यानो उपग्रहांचा उद्देश इंटरस्टेलर प्रवासाचा आहे. ह्या प्रोटोटाईप उपग्रहांनां स्प्राईट अस म्हंटल जाते. ह्या स्प्राईट मध्ये सेन्सर, सोलार प्यानेल, रेडीओ एक्व्युपमेंट सोबत सिंगल सर्किट बोर्ड चा कॉम्प्यूटर असतो. ह्यातल्या पहिल्या प्रोटोटाईप स्प्राईट उपग्रहांच्या सिरीज ला भारताच्या इस्रो ने आपल्या पी.एस.एल.व्ही.- सी ३८ रॉकेट मधून गेल्या २३ जून २०१७ ला अवकाशात प्रक्षेपित केल आहे.
२३ जून २०१७ च्या प्रक्षेपणात इस्रो ने २९ न्यानो उपग्रह १४ देशांसाठी प्रक्षेपित केले आहेत. त्यात दोन न्यानो उपग्रह वेंटा- १ आणि म्याक्स वालीर ह्या दोन अभ्यास उपग्रहांचा समावेश आहे. ह्या दोन उपग्रहांच्या पाठीवर हे प्रोटोटाईप स्प्राईट प्रक्षेपित केले गेले. ह्यातील ६ पेकी एका स्प्राईट उपग्रहाशी संपर्क करण्यात ग्राउंड स्टेशन ना यश आल आहे. हा जगातील सर्वात छोटा उपग्रह ठरला आहे. आपण विचार करू शकत नाही पण अवकाश तंत्रज्ञानाच्या दृष्ट्रीने हि खूप मोठी उडी आहे. ३.५ सेंटीमीटर इतका इवलासा उपग्रह निर्माण करून जमिनीवरून त्याच्याशी संपर्क साधून त्याच स्थान, इतर माहिती ह्याच दळणवळण हि इंटरस्टेलर मिशन साठी खूप मोठी झेप आहे. इस्रो च्या उड्डाणाने इंटरस्टेलर मिशन आता स्वप्न न रहाता सत्यात उतरणाच्या दृष्ट्रीने एक पाउल पुढे टाकल आहे.
पुढल्या काळात असेच अनेक स्प्राईट अवकाशात सोडून त्याला अवकाशात लेझर द्वारे वेग देण्यात येणार आहे. त्यांच्या कमी वजनामुळे लेझर च्या हाय इंटेनसिटी मुळे प्रकाशाच्या वेगाच्या १५% ते २०% वेग ह्या स्प्राईट उपग्रहांना आपण देऊ शकणार आहोत. ह्यामुळे ह्या प्रचंड वेगाने इंटरस्टेलर प्रवास सत्यात उतरणार आहे. ब्रेकथ्रू स्टारशॉट च पाहिलं टार्गेट अल्फा सेंचुरी असणार आहे. प्रकाशाच्या वेगाच्या १५% ते २०% वेगाने जाऊन सुद्धा अश्या स्प्राईट उपग्रहांना तिकडे पोचण्यास जवळपास २० वर्षाचा कालावधी लागणार आहे. तिकडे पोहचून हे न्यानो उपग्रह तिथले फोटो काढून ते पुन्हा पृथ्वीवर प्रक्षेपित करतील. प्रोक्सिमा बी ह्या ग्रहाचे फोटो तिथलं वातावरण ह्याचा अभ्यास आपल्याला त्यामुळे करता येणार आहे. तसेच असे हजारो स्प्राईट पृथ्वी च्या भोवती प्रक्षेपित करून पृथ्वी च्या चुंबकीय क्षेत्राचा तसेच वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. येत्या दशकात हे स्वप्न सत्यात उतरेल अशी आशा आहे.
मानवाच्या पूर्ण इतिहासात आजवर फक्त नासाचे ५ उपग्रह आपल्या ग्रह्मालेच्या बाहेर प्रवास करू शकलेले आहेत. अवकाशातील अंतर हि नेहमीच संशोधक आणि अभियंते ह्यांच्यासाठी एक मोठा अडथळा राहिली आहेत. पण स्प्राईट च्या यशाने एक नवीन रस्ता आपल्याला उघडला गेला आहे. छोट वजन, त्याचा आकार, तसेच निर्मिती खर्च कमी असून त्याला लेझर मुळे प्रकाशाच्या २०% वेगात प्रवास घडवणे शक्य असल्याने इंटरस्टेलर मिशन उद्याच स्वप्न न रहाता उद्या सत्यात उतरणार आहे. ह्या सगळ्या प्रवासात भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो चा सहभाग हि भारतीयांच्या दृष्ट्रीने एक अभिमानाची गोष्ट आहे. पुढचा काळ न्यानो उपग्रहांचा आहे. इस्रो च्या पी.एस.एल.व्ही रॉकेट ला जगात न्यानो उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी पर्याय सध्यातरी नाही आहे. उद्या जर आपण हा प्रवास केला तर त्याची बीज हि इस्रो ने अवकाशात प्रक्षेपित केलेल्या प्रोटोटाईप स्प्राईट मध्ये दडलेली असणार आहेत. म्हणूनच हि घटना सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची तर इस्रो च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवणारी आहे ह्यात शंका नाही.
No comments:
Post a Comment