Thursday 24 August 2017

ढगांच्या पलीकडे... विनीत वर्तक

माझ्या जॉबमुळे काही गोष्टी अश्या अनुभवायला मिळतात कि एक सामान्य माणूस त्याची स्वप्नच बघू शकतो. त्यातल माझ्यासाठी एक सर्वसामान्य गोष्ट म्हणजे चॉपर चा प्रवास. लहानपणी अनेकदा आवाज करत डोक्यावरून भूरकरून उडत जाताना अनेकदा चॉपर बघितल होत. अगदी कमी उंचीवरून जाताना काय मज्जा येत असेल न असाच विचार मनाला शिवून जायचा. माझ्या जॉबमुळे ते स्वप्न प्रत्यक्षात आल. गेल्या १० वर्षात १०० पेक्षा जास्ती वेळा चॉपर ने केलेला प्रवास आता अंगवळणी पडला आहे. म्हणून आजकाल त्यातून जाताना मी प्रवासापेक्षा बाहेरच जग जास्ती अनुभवतो.
चॉपर ची मज्जा विमानाच्या प्रवासात नाही. उडल्यावर ते इतक वरती जाते कि जमिनीवरच काही दिसत नाही. म्हणून विमानात सुद्धा सगळ्यात जास्ती मज्जा किंवा भीती वाटते जेव्हा ते उडते किंवा उतरते तेव्हा. ह्याला कारण एकच ते म्हणजे कमी उंचीवर जमिनीवरच स्पष्ट दिसते व आपल्या उंचीचा, वेगाचा अंदाज बांधता येतो. चॉपर मध्ये पूर्ण प्रवास असाच होतो. म्हणजे अगदी जमिनीलगत. त्यामुळे गच्चीवरच्या झाडांपासून ते पाण्यातील होड्यांन पर्यंत सगळच सुस्पष्ट दिसते. पावसाळ्यात तर हा प्रवास अजून जास्ती रोमांचक होतो ते खाली आलेल्या पावसाच्या ढगांमुळे.
परवाच चॉपर ने जुहू वरून उड्डाण करताना पाउस कोसळत होता. हवेत थोडी उंची गाठताच ओल्या झालेल्या चिंब मुंबईचा आस्वाद मी घेत होतो. अगदी मुंबई च्या धावपट्टी पासून ते वांद्रे-वरळी सी लिंक पर्यंत. अजून थोडी उंची घेत चॉपर ने पाण्यावर झेप घेतली होती. खवळलेला अरबी समुद्र वरून बघताना भितीतली मज्जा अनुभवत होतो. तेवढ्यात पांढऱ्या धुक्यात सगळच अदृश्य झाल. चारही बाजूला फक्त सफेद शुभ्र चादर. चॉपर उडते आहे कि जागेवर आहे काहीच कळत नव्हत. ते वर जाते आहे कि खाली ह्याचा काहीच अंदाज लावता येईना. पण मधेच मागे जाणारा एखादा ढग पुढे जातो आहेत ह्याची जाणीव करून द्यायचा.
थोड्या वेळाने चॉपर ने ढगांच्या पलीकडची उंची गाठली. आता पुन्हा एकदा स्वच्छ दिसायला लागल. जे काही समोर दिसत होत ते खूपच सुंदर होत. पाण्याचा काळा रंग जाऊन आता त्याने हिरवा रंग परिधान केला होता. खाली उतरलेले ढग जणूकाही आपल्या जन्मदात्या कडे त्याच्या ओढीने त्यात मिसळण्याचा प्रयत्न करत होते. ढगांच्या सावल्या त्या पाण्यावर अनेक रंग, आवेग निर्माण करत होत्या. त्यांच्यातील बाष्पाने झाकोळलेला समुद्र काळा तर बाजूला हिरवा तर त्या दोघांमध्ये निळा अस काहीस वेड लावणार चित्र ते दिसत होत. कलाकाराने कागदावर कुंचल्याने रंगाचे शिंतोडे उडवावेत आणि त्या तयार होणाऱ्या रेषांमध्ये आपण आकार शोधावेत. तसच काहीस माझ सुरु होत.
हवेतून नुसत उडण आणि ढगांच्या पलीकडे उडण ह्यात खूप फरक आहे. वरतून सूर्य तळपत होता. मात्र त्याचा सर्व प्रकाश आपल्या एका बाजूवर थोपवणाऱ्या ढगांनी दुसऱ्या बाजूला काळोखी रात्र निर्माण करण्याचा आभास केला होता. हे सगळ मी ढगांच्या पलीकडून अनुभवत होतो. हा अनुभव अविस्मरणीय असाच होता. त्यांचे आकार, पाण्यावरच प्रतिबिंब, त्यांचा भास आणि ते सगळ ढगांच्या पलीकडून अनुभवण म्हणजे माझ्या जॉब ने दिलेला माझा बोनस. निसर्गाच्या अदभूत चमत्काराचा साक्षीदार दर पावसाळ्यात मला होता येत ह्या साठी नक्कीच काहीतरी पुण्य केल असेल.
निसर्गाच्या त्या अदाकारी ला बघत असताना पाण्यातल्या चौकोनांनी माझ लक्ष वेधल. ते चौकोन म्हणजे दुसर तिसर काही नसून तेल विहिरींचे ज्याकेट होते. माझ दुसर घर जवळ आल्याची ती खुण होती. लगेचच क्याप्टन ने कॉकपिट मधून घोषणा केली कि “गेट रेडी फॉर ल्यान्डींग”. पुन्हा एकदा खिडकीतून नजर आपसूक बाकीच्यांकडे वळली. ढगांच्या पलीकडून पुन्हा एकदा अलीकडे येत होतो. एक धाकधूक मनात होतीच. पण ढगांच्या पलीकडे अनुभवलेले ते क्षण मात्र मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त झाले

No comments:

Post a Comment