Wednesday 23 August 2017

सचिन मधल माझ बालपण... विनीत वर्तक

सचिन अ बिलियन ड्रिम्स हा चित्रपट काल बघितला. चित्रपट आवडला थोडा आणि नाही पण आवडला थोडा. आवडला सचिन चा प्रवास बघायला. आवडला नाही तो सचिन ह्या इमेज च केलेलं ग्लोरिफिकेशन. पूर्ण चित्रपट काढून नक्की काय मेसेज द्यायचा हे कळल नाही. हा सचिन च्या आठवणीत पुन्हा एकदा डुंबायचं असेल तर नक्कीच वेळ काढून बघावा असा चित्रपट. खूप काही क्षण आहेत जे हळवे करतात. तर खूप काही असे आहेत कि उगाच आहेत अस सतत वाटत रहाते. काही ठिकाणी तर त्याचा उबग येतो. पण अस सगळ असून सुद्धा मी चित्रपट अनुभवला तो माझ्या आठवणींसाठी. सचिन च्या सोबत अनुभवलेलं माझ बालपण ते आज पर्यंतचा प्रवास.
१९८३ चा तो काळ होता. मला अजून आठवते माझ्या मामाच्या घरी असताना वर्ल्ड कप च्या म्याचेस चालू होत्या. एकच टी. व्ही. समोर आजूबाजूच्या घरातील सर्वच म्याच बघण्यासाठी जमायचे. एका टी.व्ही. समोर कमीत कमी ३०-३५ जण. अर्थात मी त्याकाळी लिंबू टिंबू असल्याने काही कळायचं नाही पण प्रत्येकाच्या एक्स्पर्ट कमेंट मात्र प्रत्येक चेंडू मागे चालू असायच्या. रिमोट नसल्याने आणि दूरदर्शनवर एकच च्यानेल असल्याने जे समोर दिसायचं ते मुग गिळून बघायचं हेच आमच्या वाट्याला यायचं. काल चित्रपट बघताना ते पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेल. क्रिकेट म्याच बघायची मज्जा त्या काळी वेगळीच होती न. टेस्ट म्याच सुद्धा अगदी २०-२० पेक्षा जास्त मज्जा द्यायची. काल त्या काळात पुन्हा एकदा गेलो त्याच सगळ्या माणसांसोबत अगदी पुन्हा एकदा कृष्णधवल रंगात.
मुंबई सारख्या ठिकाणी सगळ्यांच्या वाट्याला काय शिवाजी पार्क नसायचं. गल्ली क्रिकेट हाच जीव का प्राण. एक टप्पा आउट ते अंडर आर्म आणि रबरी बॉल पासून टेनिस पर्यंत आमची उडी. त्यापलीकडे जायला मैदान नव्हती. तीन स्टंप आणि एक वीट हीच काय ती सोबत. डाव्या हाताला असलेल्या बिल्डींग च्या भिंतीला टप्पा न पडता बॉल लागला कि आउट हि काळ्या दगडावरची रेघ होती. तर उजव्या हातावर असलेल्या विहरीत बॉल न जाण्यासाठी काळजी. डावीकडे काचेच्या खिडक्या, उजवीकडे समोर विहीर आणि अगदी उजव्या हाताला हनुमानाच मंदिर ह्या सगळ्यातून क्रिकेट खेळण एक दिव्यच होत. अर्थात किती तरी वेळा काचा फोडल्या, किती तरी वेळा मार खाल्ला, किती तरी वेळा बॉल लागला पण गल्ली क्रिकेट ने माझ आयुष्य समृद्ध केल. काल चित्रपट बघताना सचिन सोबत मी पण तेच अनुभवत होतो.
माझ्या पिढी चा काळ संक्रमणाचा होता. कृष्णधवल मधून रंगीत तर नंतर एल.इ.डी. बघितलेली माझी पिढी क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्वरूपाला पण सामोरी गेली. भारताची म्याच बघताना सचिन आउट झाला कि टी.व्ही. बंद करण. तो खेळत असताना देवाचा धावा करण किंवा त्याची सेन्चुरी झाल्यावर आपणच काहीतरी महान केल्याच्या स्वप्नात जगण. हे सगळ पुन्हा एकदा अनुभवल. तेंडल्या, सचिन, ते तेंडूलकर ला इतक पण कळत नाहीत. असे अनेक अकलेचे तारे काल पुन्हा चमकले. आयुष्य रिवाइंड केल्यासारखं पुन्हा एकदा बालपणात गेल. पुन्हा एकदा त्या तुटलेल्या काचा समोर आल्या. आयुष्याच्या प्रवासात पटकन आपण किती पुढे आलो ह्याची नकळत जाणीव झाली.
सचिन क्रिकेट मध्ये लिजेंड होता आणि असेल. त्याने खूप काही दिल. आकाशात उंच उडून सुद्धा जमीन न सोडण्याचा नम्रपणा दिला. पण त्याने जनमानसात निर्माण केलेल्या इमेज च इतक ग्लोरिफिकेशन मनाला चटका लावून गेल. सचिन तू लिजेंड होतास आणि रहाशील. तू कोणाला आणि कोणी तुला ते सांगायची गरज नाही म्हणूनच तर बिलियन ड्रीम्स मध्ये आजही अनेक लोक तुला बघतात. त्यासाठी चित्रपटाची खरच गरज होती अस मला तरी वाटत नाही. निदान स्वतःच कौतुक स्वतः करून घेण्याची.
एका गोष्टीसाठी मात्र चित्रपट आतवर पोचला. सगळ बघत असताना मी नकळत माझ बालपण पुन्हा जगलो रे? अगदी त्या गल्लीमध्ये केलेल्या मस्ती पासून ते गल्ली मधील क्रिकेट पर्यंत. कृष्णधवल पासून एल.ई.डी. पर्यंतचा माझा प्रवास पुन्हा एकदा जिवंत झाला. खूप इमोशनल झालो कारण त्या बिलियन ड्रीम्स मध्ये एक ड्रीम्स माझ पण होत. खर तर आमच्या सगळ्याच पिढ्यांचं. सचिन बिलियन ड्रीम्स ने सचिन ची इमेज चांगली झाली का वाईट ते मला नाही माहित मात्र त्या बिलियन ड्रीम्स ला मात्र इग्नाईट केल हे नक्की.

No comments:

Post a Comment