Thursday 24 August 2017

उड्डाणा पलीकडे... विनीत वर्तक

काल इस्रो च्या जी.एस.एल.व्ही मार्क ३ रॉकेट ने जीस्याट-१९ ह्या उपग्रहाला १००० सेकंदा पेक्षा कमी वेळात त्याच्या निश्चित कक्षेत पोहचवल. गेल्या २५-३० वर्षापासून बघितलेलं स्वप्न पूर्ण होताना बघणं इस्रो च्या आजी- माजी अधिकारी, अभियंते आणि वैज्ञानिक ते सामान्य कामगार वर्गासाठी आनंददायक असेलच. कालच उड्डाण अनेक गोष्टींसाठी महत्वपूर्ण होत. मग ते स्वबळावर बनवलेलं क्रायोजेनिक इंजिन असेल किंवा रॉकेट उड्डाणाच्या प्रत्येक स्टेजेस. तसेच जो उपग्रह काल प्रक्षेपित केला गेला तो हि अनेक गोष्टीनी उपयुक्त असल्याने व एका नवीन डिजिटल क्रांतीची सुरवात करणार असल्याने महत्वाचा होता.
कोणत्याही रॉकेट प्रक्षेपणाची यशस्विता मोजली जाते ते म्हणजे आखलेल्या रस्त्यावरून जाण किंवा त्या प्रमाणे खरोखर रॉकेट ने पल्ला अथवा रस्ता गाठला का ह्यावर. सर्वसामान्य लोकांच्या दृष्ट्रीने रॉकेट हवेत उडल कि ते यशस्वी झाल अस असल तरी खरी परीक्षा तिथेच सुरु होत असते. लिफ्ट ऑफ नॉर्मल अस म्हंटल कि परीक्षेची पहिली घंटा झाली निदान वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी च्या भाषेत. रॉकेट च्या उड्डाणापूर्वी मिशन डायरेक्टर उड्डाणासाठी गो अहेड देतात. हि प्रोसेस साधारण १०-१५ मिनीटान आधी होते. ह्या नंतर रॉकेट चा पूर्ण कंट्रोल हा त्यावरील कम्प्युटर ने घेतलेला असतो. म्हणजे सगळ्या प्रक्रिया ह्यापुढे ऑटोमेटेड होत असतात. ठरल्या वेळेप्रमाणे बुस्टर च प्रज्वलन झाल्यावर हाच कॉम्प्युटर पुढील सगळ्या प्रक्रिया ठरवत जातो. ह्यात प्रचंड प्रक्रिया दोन्ही बाजूने चालू असतात. म्हणजे प्रज्वलन झाल्यावर रॉकेट ने गाठलेली उंची, दिशा, वेग तसेच इंधनाच योग्य मिश्रण, योग्य त्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी बुल्स आय असण अत्यंत गरजेच असते. ह्यात थोडा पण बदल झाल्यास योग्य तो बदल करण्याची क्षमता त्या कॉम्प्युटर ला दिलेली असते.
हवेचा रोख, इंधनाच प्रज्वलन, रॉकेट ची दिशा ह्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे आणि प्रत्यक्षात राखण अतिशय कठीण काम आहे. कारण एक छोटी चूक किंवा हवेतील बदल रॉकेट ची दिशा, वेग ह्यात कमालीचा बदल करू शकतो. एखादी स्टेज संपून दुसरी चालू होताना वेळेच बंधन अतिशय महत्वाच असते. इकडे लक्षात घेतल पाहिजे कि पहिली स्टेज १२९ सेकंदात संपते त्याच वेळेस दुसरी स्टेज च प्रज्वलन होऊन ठरवलेल बल निर्माण करण अतिशय गरजेच असते. त्या वेळेस पहिल्या स्टेज मधील रिकामी झालेल्या इंधन टाक्या मूळ रॉकेट पासून विलग होण हि प्रक्रिया पण. हीच प्रक्रिया तिसऱ्या स्टेज बाबतीत पुन्हा रिपिट होते. एकाच वेळेस प्रचंड अश्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया रॉकेट मध्ये होत असतात. हे सर्व हवेचा विरोध, पृथ्वीच गुरूत्वाकर्षण, तसेच निर्माण होणार बल, तापमान ह्या सगळ्या बदलांना लक्षात घेऊन होत असते. शेवटचा भाग म्हणजे उपग्रहाला कक्षेत पोचल्यानंतर विलग करण. हे हि तितकच महत्वाच आहे. विलग झाल्यानंतर उपग्रहावरील कॉम्प्युटर कंट्रोल घेऊन रॉकेट ने पोचवलेल्या कक्षेचे आकडे पुन्हा जमिनीवर पाठवतो. ह्यानंतर एखाद प्रक्षेपण यशस्वी झाल कि नाही हे ठरते. तोवर आपण आनंद मनवत असलो तरी वैज्ञानिकांचा जीव टांगलेला असतो.
कालच्या प्रक्षेपणाच्या वेळी आपण टी.व्ही. वर दोन रेषा बघितल्या असतील. ह्या दोन रेषेवर दोन बिंदू सतत चमकत असतात. हळू हळू पुढे जात असतात. ह्या दोन रेषा म्हणजेच रॉकेट ची ठरवलेली दिशा, त्याची कक्षा, त्याचा वेग. जेव्हा रॉकेट मधील इंजिन पूर्ण क्षमतेने आणि बुल्स आय पर्फोर्म करत असतात. तेव्हा हे चमकणारे बिंदू आधी आखलेल्या रेषेलाच अगदी तंतोतंत फॉलो करतात. ह्याचा अर्थ रॉकेट अगदी टेक्स्ट बुक प्रमाणे काम करत असते. रॉकेट मधील प्रत्येक घटना हि क्लोज लूप सिस्टीम मध्ये असते. म्हणजे कोणताही कमांड दिल्यावर तो पूर्ण झाला का? झाला असेल तर किती? ह्या सगळ्याची बित्तमबातमी कॉम्प्युटर कडे येत असते व ती माहिती सतत कमांड सेंटर कडे तो पाठवत असतो. म्हणून प्रत्येक स्टेज, इंजिन हे ठरल्याप्रमाणे काम करते आहे कि नाही हे कमांड सेंटर मध्ये कळत असते. कालच्या उड्डाणात बघितल असेल तर हे चमचमणारे बिंदू अगदी आखून दिलेल्या रेषेवरून पुढे जात होते. हे इस्रो साठी सगळ्यात महत्वाच होत. ह्याचा सरळसरळ अर्थ होता रॉकेट मधील सर्व इंजिन आपल काम चोख पद्धतीने करत होती.
नुसत क्रायोजेनिक इंजिन बनवून ते चालवण आणि प्रत्यक्षात एखादा पे लोड घेऊन ते अवकाशात प्रक्षेपित करण ह्यात जमीन- आकाशाचा खरच फरक आहे. इस्रो ने ह्या इंजिनाच्या २०० वेळा चाचण्या घेतल्या होत्या. अवकाशात असलेली परिस्थिती कृत्रिम रित्या जमिनीवर निर्माण करून ह्या चाचण्या घेण्यात आल्या. तरीसुद्धा पूर्ण क्षमतेने जेव्हा सी.ई.२० च प्रज्वलन झाल. तेव्हा इस्रो च्या कंट्रोल रूम मधील सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कारण इंजीनच योग्य प्रज्वलन होण हेच मुळी गेल्या २५-३० वर्षातल्या परिश्रमाच फळ होत. एकीकडे इंधन प्रज्वलनातून प्रचंड तापमान निर्माण होत असताना क्रायोजेनिक तपमानात हायड्रोजन ठेवण हे प्रचंड शिवधन्युष पेलण्यासारख होत. हायड्रोजन वायू रुपात ठेवण शक्य नसते. त्यामुळेच उणे -२५३ डिग्री सेल्सियस ह्या तपमानात त्याला ठेवता येण खूप महत्वाच होत. इस्रो च्या क्रायोजेनिक इंजिनाने आपल काम फत्ते करताच अगदी टेक्स्ट बुक प्रमाणे मोहीम फत्ते झाल्याची घोषणा इस्रो चे डायरेक्टर ए.एस. किरण कुमार ह्यांनी केली.
गेल्या २५-३० वर्षात क्रायोजेनिक आणि पहिल्या उड्डाणात अपयशाच भूत इस्रो च्या मानगुटीवर सतत बसल होत. अनेक अपयशाला सामोरे जायला लागत होत. कुठेतरी एक उड्डाण हव होत कि जे हे सर्व अपयश पुसून टाकेल. माझ्या मते कालच्या उड्डाणाने सर्व अपयश धूतल गेल आहे. आपण स्वबळावर क्रायोजेनिक इंजिन बनवू शकतो तसेच ३ ते ४ टन उपग्रहांच प्रक्षेपण करू शकतो हा मोठा विश्वास इस्रो च्या सर्वच टीम ला मिळाला असेल ह्यात शंका नाही. इकडे एक लक्षात घेतल पाहिजे कि हा आनंद साजरा करायला पण इस्रो कडे वेळ नाही आहे. कारण २३ जून ला पी.एस.एल.व्ही सी ३८ उड्डाणासाठी रेडी होतो आहे. सरकारी नोकऱ्यात लोक फक्त पाट्या टाकायला जातात हा समज इस्रो च्या बाबतीत तरी पूर्णतः खोटा आहे अस माझ तरी मत आहे. पैश्यापलीकडे देशप्रेम, संघटन भावना, विजिगीषू वृत्ती असेल तेव्हाच अशी यशस्वी उड्डाण होऊ शकतात. म्हणूनच एक सामान्य माणूस म्हणून आपण ह्या उड्डाणा पलीकडे बघयला हव. ह्या उड्डाणाचे स्वप्न बघितल्या पासून ते त्यात योगदान देणाऱ्या सर्वच इस्रो च्या टीम चे एक भारतीय म्हणून आभार. आम्हाला तुमचा अभिमान आहे.

No comments:

Post a Comment