चॅटिंग मधल्या गुजगोष्टी... विनीत वर्तक
चॅटिंग म्हटलं की आजही मला याहू मेसेंजर आठवते. इन्टरनेटची पाळेमुळे भारतात विस्तारत असताना अनोळखी लोकांशी संवाद साधण्याची संधी देण्याचं काम कोणी केलं, तर ते याहूच्या मेसेंजरने. 'हॅलो' आणि नंतर पुढला मेसेज 'ए.एस.एल' काय? असं विचारत सुरु झालेला प्रवास खूप पुढे जायचा. आपली ओळख लपवून शहर, राज्य, देश यांच्या भिंती ओलांडून कोणाशीही थेट संवाद साधण्याचं माध्यम म्हणजे आपल्याला मोकळेपणाने व्यक्त होण्याची गुरुकिल्ली होती. त्यामुळेच झपाट्याने त्यात गुंतायला वेळ लागला नाही. कधी अमेरिका ते कधी रशिया सगळंच कसं अगदी दाबल्या जाणाऱ्या बटणांवर येऊन थांबलं होतं.
सगळ्यात ओढ लावत होतं, ते एकाच वेळी अनेक लोकांशी वेगवेगळ्या स्तरावर बोलता येणं. नक्कीच मुलं कोणीतरी नवीन मुलीला, आणि मुली नवीन मुलांशी ओळख वाढवण्यात अग्रेसर होत्या, हे सांगायला नकोच. पडद्यामागची मज्जा असं काही समोर न आणता मिळत असेल, तर कोण थांबणार होतं? त्यामुळे प्रेमापलीकडे सेक्स याविषयी बोलण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं. एका हॅलो-ने सुरू झालेला प्रवास बेडवर पोचायला एक तास पण जास्ती होत होता. म्हणूनच याहू मेसेंजरने एका नवीन संस्कृतीची सुरूवात केली.
काळाच्या ओघात लपलेल्या माणसाची भीती वाटायला लागली. कारण अनोळखी माणसाकडून झालेल्या ओळखीचा कसा वापर केला जाईल याची ती भीती होती. मग हळूहळू चेहरे दाखवण्याची पद्धत सुरू झाली. काहीवेळा तर फोटो नसेल, तर सुरूवात करायची नाही बोलायला, असाच प्रघात टाकला गेला. नुसतं शब्दांपुरती मर्यादित न राहता, आता एकमेकांना ऐकण्याच्या आणि भेटण्याच्या गोष्टी सुरु झाल्या. त्याचवेळेस मोबाईल क्रांतीची सुरूवात झाली होती. मग अजून काय हवं होतं? दुग्धशर्करा योगच होता. मग चालू झालं ते ह्या भिंतीच्यापलीकडची नाती. कधी बाजूबाजूला बसून पण ओळख लपवणारी, तर कधी कधी जगाच्या दुसऱ्या टोकांवर असणारी.
कधी चांगले, तर कधी वाईट असे अनेक अनुभव सोबत घेत माणसांना जोडण्याची किमया या मेसेंजरने केली यात शंका नाही. हे जोडण्याचं स्वप्न कधीकधी खऱ्या आयुष्यातही सत्यात आलं. पण त्याचसोबत समोरची व्यक्ती नक्की तीच आहे का? ह्या विश्वासासाठी अजून वेगळं काही करू शकतो का, याचा शोध सुरू झाला. ऑर्कुट आलं आणि मेसेंजरचा काळ अस्ताला जाण्याची प्रक्रिया सुरु झाली. स्वतःचं प्रोफाईल तयार केल्याने ए.एस.एल. हा प्रश्न मागे पडत आता सुरूवात प्रोफाईल बघून सुरु झाली. ओर्कुट घरात स्थिरावते, तोच फेसबुकच्या आगमनाने एका नवीन विश्वाचा दरवाजा उघडला गेला, तो आजतागायत.
फेसबुकने चॅटिंगपलीकडे भावना पोचवण्याचं काम केलं. मग ते ग्रुपच्या स्वरूपात असो वा प्रतिक्रियेसाठी दिलेल्या लाईकच्या स्वरूपात. मोबाईलची क्रांती फेसबुकसाठी वरदान ठरली. कारण नुसत्या व्हर्चुअल चॅटिंगने आता कोणालाच थांबावंसं वाटत नव्हतं. आता सगळ्यांना घाई होती, की ते सत्यात कधी उतरते याची. पडद्यामागची मज्जा आता हवा तसा पडदा उघडून पण घेता येऊ लागली. म्हणजे समोरचा कसा, त्यावर त्याला आपल्या आयुष्यात किती शिरू द्यायचं, हे ठरवता येऊ लागलं. या पडद्याला हवं तेव्हा बंद करण्याचं आणि उघडण्याचं कंट्रोल माझ्या मते फेसबुकचं ब्रह्मास्त्र होतं, आणि आजही आहे. मोबाईलची क्रांती होतच होती. आता कम्प्युटर मोबाईलमध्ये येऊन स्थिरावल्यावर व्हाट्सअपचा उदय झाला. मोबाईलवर व्हाट्सअप तर कम्प्युटरवर फेसबुक लोकांचं विश्व आणि संस्कृती बनले.
चॅटिंगचा प्रवास आता फेसबुक ते व्हाट्सअप असा होऊ लागला. फेसबुकवर पास झाल्यावर समोरच्या व्यक्तीला व्हाट्सअपवर प्रवेश मिळू लागला, तर व्हाट्सअपवर जोडलेला कसा आहे, याची उत्तरं फेसबुकवरून शोधली जाऊ लागली. सध्या तरी चॅटिंगमधल्या गुजगोष्टी या दोन विश्वात प्रामुख्याने स्थिरावल्या आहेत. यापुढे काय होईल याबद्दल आत्ताच काही सांगता नाही येणार. पण एक मात्र खरं, की माणूस एकटा आहे. त्याला गुजगोष्टीची गरज कालही होती, आजही आहे, उद्या पण असेल. काल याहूने ती संधी दिली, आज फेसबुक, व्हाट्सअप देत आहेत, उद्या अजून कोणीतरी देईल. काल पडदा कायमचा बंद होता, आज तो जेव्हा वाटेल तेव्हा उघडू शकू, उद्या कदाचित पडदा नसेल. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट सेम राहील, ती म्हणजे चॅटिंगच्या गुजगोष्टी.
No comments:
Post a Comment