ऑलम्पिक, क्रिकेट वर्ल्ड कप, विम्बल्डन ते फिफा विश्वकप असे अनेक कप आपण दरवर्षी बघत असतो. किंबहुना ते जेव्हा खेळले जातात त्याच्या आधीपासून अनेक अंदाज बांधले जातात. ह्या वर्षी हे कप कोणता देश जिंकणार किंवा कोणता संघ जिंकणार. काही दरवर्षी तर काही ४ वर्षाच्या नंतर आपल्या भेटीला येत असतात. पण ह्याच्या मधल्या काळात हे कप जिंकण्यासाठी प्रचंड मोर्चेबांधणी होत असते. स्पर्धा कुठे भरवायच्या इथपासून सुरु झालेला प्रवास तो जिंकेपर्यंत चालूच असतो. ते पदक आपल्या गळ्यात याव अशी अपेक्षा प्रत्येक भाग घेणाऱ्या खेळाडूची असते. असाच एक कप महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून आयोजित केला जातो. तो म्हणजे पाणी कप.
दरवर्षी कमी पावसामुळे महारष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्म्हत्येच प्रमाण वाढत होत. पाण्याच दुर्भिक्ष दरवर्षी च रडगाण होत. पाउस वाढवता येत नसताना किंवा त्याच्या लहरीपणाचा अंदाज नसताना पाण्याची साठवणूक आणि त्याच नियोजन हाच पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याचा प्रभावी उपाय आहे हे समोर आल. राळेगणसिद्धी, हिवरे बाजार सारख्या गावांनी पाण्याची साठवणूक कशी गावाचा कायापालट करून देऊ शकते हे दाखवून दिलच होत. नाना पाटेकर ह्यांची नाम आणि अक्षय कुमार सारख्या सिनेतारकांनी केलेल्या कार्य हे जखमांवर तात्पुरता उपाय असताना कुठेतरी पावसाच्या पाण्याच योग्य नियोजन आणि साठवणूक हेच लांबच्या प्रवासात शेतकरी तसेच गावांना पाण्याच्या संकटापासून मुक्त करण्याचा योग्य मार्ग आहे हे दिसून येत होत.
पाण्याच नियोजन आणि साठवणूक कशी वाढवता येईल त्यात सामान्य गावकऱ्यांना समाविष्ट करून एकूणच जमिनीतील पाण्याचा साठा कसा वाढवता येईल ह्या साठी पाणी फौंडेशन ने आमीर खान च्या सत्यमेव जयते सोबत पुढाकार घेत गेल्या वर्षी पाणी कपाची सुरवात केली. पहिल्या वर्षी पायलट स्वरूपावर महाराष्ट्रातील ११६ गावांमध्ये हि स्पर्धा घेतली गेली. एकीच बळ काय असते ह्याचा अंदाज पहिल्याच वर्षी महाराष्ट्रात बघयला मिळाला. सर्वसामान्य माणूस जेव्हा एका विधायक कार्यासाठी एकत्र येतो तेव्हा त्याने तडीस नेलेल्या कामाची मोजदाद करायला अंक कमी पडतात. २०१६ मध्ये एकट्या आंबेजोगाई तालुक्यात ४२०३ गावकरी मिळून जवळपास १ कोटी पेक्षा जास्ती खर्चाच काम अवघ्या ४५ दिवसात संपूर्ण केल. त्यांच्या ह्या कार्याला लोकांनी आपल्या परीने मदत करून एकट्या ह्या तालुक्यात तब्बल १३ कोटीची काम पूर्ण केली गेली. ह्याचा परिणाम कि एका तालुक्याने कित्येक कोटी लिटर पाण्याच संवर्धन करणारी रचना निर्माण केली. तीन तालुक्यात घेतलेल्या ह्या स्पर्धेमुळे ह्या तीन तालुक्यात तब्बल १३६८ कोटी लिटर पाण्याचा साठा निर्माण झाला. जे पाणी आजपर्यंत वाहून जात होत. ते अडवून जमिनीचा पोत तर वाढलाच पण पाण्याच्या दुर्भिक्षा पासून ह्या तालुक्यांची सुटका होण्यासाठी वाटचाल सुरु झाली.
२०१६ च्या स्पर्धेच्या यशाने ह्या वर्षी स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यात आली. ह्या वर्षी ३० तालुक्यामधील १३०० गावांनी भाग घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग बघताच शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी स्वतः अश्या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिल. आपल्या हेलिकॉप्टर अपघातानंतर हि फक्त पाणी फौन्डेशन च्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री काही वेळात पोहचले होते ह्यावरूनच शासकीय लेवल वर ह्या स्पर्धेचा प्रभाव आपल्याला दिसून येईल. कारण ह्या स्पर्धेने सामान्य लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. बुंद बुंद से सागर बनता हे कुठेतरी सामान्य माणसापासून ते शासकीय यंत्रणापर्यंत जाणवलं गेल. ह्या स्पर्धेने शहरातील तरुण पिढीला पुन्हा गावाकडे नेल. श्रमदाना सारख्या कार्यक्रमातून अनेक तरुण, तरुणींनी मग ते शहरातले असो वा गावातले आपल्या परीने मदत केली, लोकांनी भांडण, द्द्वेश बाजूला ठेवून एकमेकांसोबत बंधुभावाने काम केल. ज्या बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्ती आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या त्या जिल्ह्यात ह्या वर्षी ह्या स्पर्धेमुळे एकही आत्महत्येची घटना नोंदवण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा अगदी मुख्यमंत्र्यान पासून ते सामान्य कर्मचाऱ्या पर्यंत जिकडे काम केल गेल तिकडे अवतरल्या. ह्यामुळे गाव आणि शासकीय यंत्रणा ह्यांच्यातील समन्वय साधला गेला.
ह्या स्पर्धेत केलेल्या कामामुळे किती पाणी नियोजन झाल आणि साठवणूक झाली ह्याचे आकडे काही महिन्यात येतीलच पण ३ तालुक्यात आपण जर १३०० कोटी लिटर पेक्षा जास्त पाण्याच संवर्धन करू शकतो. तर त्याच्या दहापट म्हणजेच ३० तालुक्यात पाणी स्पर्धेच काम झाल्यावर येणारे आकडे किती मोठे असतील ह्याचा अंदाज शेबंड मुल पण लावू शकेल. ह्या वर्षीच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ काल पुण्यात साजरा झाला. जिंकलेल्या गावांना तब्बल ५० लाख, ३० लाख, २० लाख रुपयांची घसघशीत बक्षीस देण्यात आली. तसेच तालुका पातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या गावांना १० लाखाच बक्षीस देण्यात आल. ह्यात अनेक सामाजिक संस्था, देणगीदार ह्यांनी सढळ हस्ते मदत केली. तसेच शासकीय यंत्रणेने गरजेचा असलेला सपोर्ट ह्या स्पर्धेच्या मागे लावून धरला ह्यासाठी मुख्यमंत्री तसेच शासकीय अधिकारी कौतुकास पात्र आहेत.
मला सांगायला खूप आनंद होतो कि विवेकानंद सेवा मंडळ ह्या माझ्या अश्याच एका सेवाभावी संस्थेतील सहकारी अमित दातार, अनिकेत प्रभुदेसाई, नरेंद्र गोडसे व ह्यांच्या टीम ने काम केलेल्या जयभयवाडी ह्या गावाला महाराष्ट्रातील १३३० गावांमधून १५ लाखांचा दुसरा पुरस्कार तर वाठवाडा (ता. कळंब जिल्हा:- उस्मानाबाद ) ह्या गावाला तालुका पातळीवर पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळाल आहे. अमित, अनिकेत, नरेंद्र तुमच्या आमच्या सारखेच काम करून आपली पोटाची खळगी भरणारे आहेत. पण ज्या समाजातून आपण आलो जे ज्ञान शिकलो त्या ज्ञानाचा उपयोग समाजाला कश्या रीतीने होईल असा विचार करत पाणी कपाच्या ह्या कामाला त्यांच्या टीम ने वाहून घेतल. बक्षीस आणि पैसे ह्याची अपेक्षा न करता त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना काल मिळालीच पण त्याही पलीकडे ह्या गावातल पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेलं योगदान शब्दांपलीकडे आहे. तुम्हा सर्वाना व तुमच्या टीम ला माझा सलाम. पुढल्या वर्षी हि स्पर्धा १०० तालुक्यात घेतली जाणार आहे. आपण पण ह्याचा भाग होऊ शकतो. चला तर मग भाग होऊया एका मोहिमेचा ज्यात तुमच, आमच ह्या राज्याच, ह्या देशाच हित आहे. पुढल्या वर्षी आपण पण पाणी कपाचा भाग होऊया.
No comments:
Post a Comment