Wednesday 8 November 2017

Every Second counts…

Every Second counts…
घड्याळाच्या काट्यावर फक्त मुंबईकरांची नजर असते अस नाही. प्रत्येक मिनिटाला एक पर्व मानून जिवाच्या आकांताने ट्रेन पकडणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला प्रत्येक मिनीटाच महत्व वेगळ काही सांगायला नकोच. पण ज्या घडाळाच्या जोरावर मुंबईकर धावतात ते चुकल तर? होणारा गोंधळ कोणताही मुंबईकर सांगूच शकेल. असाच एक गोंधळ सध्या अवकाशात चालू आहे. भारताच्या नाविक प्रणाली मधील एका उपग्रहावरील तिनही रुबिडीयम घड्याळ बंद पडली आहेत. नाविक हि जी.पी.एस. प्रणाली ७ उपग्रहांच्या एकत्रीकरण करून चालवली जाते. ह्यातील एक उपग्रह आय.आर.एन.एस.एस.- १ ए वरील तिन्ही रुबिडीयम
घड्याळ बंद पडलेली आहेत. ह्यामुळे ह्या उपग्रहाला बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. ह्या महिन्याच्या अखेरीस तातडीने इस्रो आय.आर.एन.एस.एस.- १ एच हा उपग्रह प्रक्षेपित करत आहे.
एका घड्याळामुळे एक पूर्ण उपग्रह निकामी झाला ह्यावरून घड्याळाच महत्व अधोरेखित व्हावं. उपग्रहामधील हि घड्याळ अतिशय अचूकतेने फ्रिक्वेन्सी सिग्नल दाखवतात. ३६,००० किमी. वरून काही मीटर मध्ये आपल लोकेशन दिसण्यासाठी जी.पी.एस. प्रणाली मधील उपकरण अतिशय उच्चतम अचूकता असावी लागतात. एका सेकंदाच्या काही सूक्ष्म भागापेक्षा जेव्हा तुमचे सिग्नल अचूक असतील तेव्हाच हि प्रणाली काम करू शकते. म्हणून फोन वर जी.पी.एस वापरताना खूप सोप्प वाटल तरी त्या मागे प्रचंड अशी तंत्रज्ञानातील प्रगती कारणीभूत आहे. तर अशी हि अचूक वेळ दाखवण्यासाठी रुबिडियम अणु घड्याळ वापरली जातात.
अणु घड्याळ हे मानवनिर्मित सर्वात अचूक वेळ मोजण्याच यंत्र आहे. ह्यात अणूतील इलेक्ट्रोन चा वापर करून वेळ सांगता येते. अणु च्या भोवती फिरणारे इलेक्ट्रोन आपली कक्षा जेव्हा बदलतात तेव्हा एकतर ते उर्जा बाहेर टाकतात किंवा आत्मसात करतात. ह्या उर्जेची फ्रिक्वेन्सी हि त्यांच्या दोन कक्षांच्या उर्जेतील फरकांवर अवलंबून असते. ह्यामुळे ह्या कक्षाबदलांना गणितात बसवून आपण अचूक वेळ सांगू शकतो. उदाहरण द्यायचं झाल तर एका पूर्ण दिवसातील दहा च्या १४ व्या घातातील एक भाग इतक्या प्रचंड अचूकतेने आपण वेळेला वेचू शकतो. ( १० गुणिले १० अस १४ वेळा करून जे उत्तर येईल त्यातला एक भाग). ह्यात अनेक वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणु वापरण्यात येतात व त्यावरून ह्या अणु घड्याळानां त्याचं नाव मिळते. इस्रो ने वापरलेल्या घडाळ्यात रुबिडियम चे अणु वापरले जातात म्हणून ह्याला रुबिडियम घड्याळ अस म्हणतात.
जगात घड्याळात सर्वश्रेष्ठ घड्याळ कुठली अस म्हंटल तर शेंबड पोर पण सांगेल स्विसमेड. अवकाशात पण ऑरीओला स्प्रेट्राटाईम ह्या स्विस कंपनी ने बनवलेली घड्याळ उपग्रहात बसवली गेली होती. चीन, इस्राइल, युरोपातील अनेक देश ह्याच कंपनीकडून आपल्या उपग्रहात ह्या कंपनी ची घड्याळ बसवतात. पण ह्या कंपनी ने बनवलेल्या एका साच्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. कारमध्ये जसे अनेकवेळा तयार करताना बिघाड होतात तसे. जमिनीवर त्याला तयार करणारा कार परत बोलावून त्यातील दोष दूर करू शकतो पण अवकाशात सोडलेला उपग्रह कसा परत आणणार? ह्यामुळेच भारताला पर्यायी उपग्रहाची गरज भासली. इकडे हि इस्रो ची दूरदृष्टी कामाला आली. नाविक प्रणाली मधील उपग्रह जर कोणत्याही कारणाने खराब झाला तर त्याचा ब्याक अप म्हणून इस्रो ने अजून २ उपग्रह बनवून जमिनीवर तयार ठेवले आहेत. ह्याचा प्रत्यय आपल्याला लगेच आला. उपग्रह खराब होताच इस्रो ने आपला ब्याक अप उपग्रह उड्डाणासाठी लगेच सज्ज केला. जर हा उपग्रह नसता तर आपल्याला अजून एक – दोन वर्ष उपग्रह तयार होण्याची वाट बघावी लागली असती. त्या काळात नाविक च्या अचूकतेवर परिणाम झाला असता.
इस्रो ने उपग्रहाला तयार करून ह्या महिन्याखेरीस आपल्या वर्कहॉर्स रॉकेट वरून अवकाशात सोडत आहे. अणु घड्याळातील हा त्रास दूर करण्यासाठी इस्रो ने स्वतः अशी घड्याळ बनवण्याचं ठरवलं आहे. इस्राइल देशाने ह्या मध्ये हि सर्वोतोपरी आपल तंत्रज्ञान देण्याच मान्य केल असून तसा करार काही महिन्यांपूर्वी आपले पंतप्रधान इस्राइल मध्ये असताना भारत आणि इस्राइल ह्यामध्ये झाला आहे. युरोपियन देशाने बनवलेल्या रुबिडियम घड्याळावर अवलंबून रहाणे म्हणजे एका पूर्ण उपग्रहाच्या कार्यक्षमतेच्या चाव्या त्याच्या हातात देणे. म्हणूनच इस्रो ने ह्यावर काम करायला सुरवात केली आहे. अणु घड्याळ वाचताना सोप्प वाटल तरी त्याची मांडणी आणि तंत्रज्ञान खूप किचकट आहे. म्हणूनच भारत हि घड्याळ बाहेरून विकत घेत होता.
आपल्यासाठी एक वर्ष, एक महिना, एक आठवडा, एक तास, किंवा फारफार तर मुंबईकरांच्या भाषेत एका मिनीटाच महत्व असल तरी जेव्हा गोष्टी अवकाश तंत्रज्ञानाशी निगडीत असतात तेव्हा Every Second Counts असच म्हणाव लागेल.

No comments:

Post a Comment