Wednesday 8 November 2017

आयुष्याला घडवणारी माणस...

आयुष्याला घडवणारी माणस... 
आयुष्य घडवणारी माणस खूप असतात. पण आयुष्याला घडवणारी माणस थोडीच असतात. शाळा, कॉलेज ते अगदी आयुष्याच्या उत्तरार्धा पर्यंत अनेक माणस आपल्या आयुष्यात येतात. काही राहतात तर काही निघून जातात. तर काही न येऊन सुद्धा आपल्या आयुष्यावर प्रभाव ठेवून जातात. कळत नकळत अनेक व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. पण काही माणस आपल आयुष्य घडवतात. त्यांचे शब्द, आचरण, स्वभाव, व्यक्तिमत्व ह्याचा प्रभाव तर आपल्यावर असतोच पण त्यापलीकडे आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याच काम त्यांनी केलेलं असते.
शाळेपासून सुरु झालेला हा प्रवास शेवटापर्यंत सुरु असतो. जेव्हा कळायला लागते तेव्हापासून ते अनुभव समृद्ध झाल्यावर पण अशी घडवणारी माणस आपल आयुष्य उजळून टाकत असतात. आपण ज्या रस्त्याने जात असतो. तो रस्ता किंवा पूर्णपणे आपल्या विचारांची बैठक बदलवण इतक सोप्प असते का? काय असते अश्या माणसात? खर सांगायच झाल तर ती पण आपल्या सारखीच सर्वसाधारण असतात. कदाचित आपल्यावर झालेला प्रभाव आणि त्यातून आपल्यात होणारे बदल हे दुसऱ्यांवर पण होतील अस नाहीच. म्हणून हि माणस माणसांच्या कळपात मिसळून पण जातात. आयुष्याच्या प्रवासात आपण पुढे चालत रहातो आणि अशी माणस आपला प्रभाव सोडून आपल्या मनातून निघून पण जातात.
आपण कृतज्ञ रहायचं कि कृतघ्न बनायचं हे आपल्या हातात असते. अशी माणस कोणती अपेक्षा न ठेवता आपल्या आयुष्यावर त्यांची छाप सोडून जातात. कधी तरी दोन शब्द, एक भेट, तर कधी आयुष्यातला एक काळ ते एक तप आपण अश्या लोकांसोबत घालवतो. ते कोणीही असतात. आई- वडील, भाऊ, बहिण, प्रियकर, प्रेयसी, शिक्षक, गुरु, मित्र, मैत्रीण किंवा कोणत्याही नात्यात न बसणारे अगदी फेसबुक च्या आभासी भिंतीपलीकडे असणार कोणीतरी. पण आयुष्याची शिकवण म्हणा किंवा एखादा निर्णय ज्याने पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते अस काहीतरी ते देऊन जातात. आपण आनंदात इतके रममाण होतो कि अश्या लोकांच्या त्या पाठींब्याला किती लोक लक्षात ठेवतात?
निरपेक्ष भावनेने आयुष्य घडवणाऱ्या माणसांना काही नको हि असते. आपली आठवण ठेवली हेच खूप झाल इतकीच माफक अपेक्षा असताना आपण ती ठेवतो का हा खरा प्रश्न आहे. आयुष्यात धावता धावता असे अनेक क्षण येतात कि जिकडे आपल्याला आठवण हि होते पण किती लोक त्या आठवणीला शब्दातून व्यक्त करतात? ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली त्यांच्यासाठी आपण किती वेळ काढतो? अगदी काही नाही तर किती वेळा फोन करून चौकशी करतो? ते कोणी असो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो. काळाच्या ओघात लुप्त झालेले असो पण त्यांना शोधण इतक अवघड असते का? आपल्याला घडवणारी माणस आपल्यासाठी खूप मोठी असतात. पण त्यांना त्यांची जागा आपण देतो का? ह्याचा विचार आपण प्रत्येकाने वेळ काढून करायला हवाच.
आपल आयुष्य घडवणाऱ्या माणसांची भेट, बोलण किंवा नुसत त्यांना बघण पण अत्युच्य समाधान देऊन जाते. कोणाला कळो वा न कळो पण अश्या लोकांचा आपल्या आयुष्यावरील प्रभाव आपल्याला नक्कीच समजत असतो. मग जे आपल्याला आत जाणवते ते व्यक्त करायला किंतु कसला? पण आपण नेहमी एक पाय मागे घेऊन चालतो. आपला स्व , आपला समाज किंवा अजून आपले काही ह्यांना कस वाटेल ह्याचा विचार करून काढता पाय घेतो. पण खरच अशी गरज असते का? आपल आयुष्य घडवणारे आपणच असतो पण कोणाच तरी आयुष्य घडवणारे खूप कमी असतात. त्यांना तो मान देण हे आपल्या प्रगल्भतेच लक्षण आहे. तो कसा, किती, केव्हा, कश्या प्रकारे हे ज्याच त्याने ठरवायचं पण एक नक्की कि अस माणूस आपल्या आयुष्यात लाभण हे खूप मोठ नशीब असत.

No comments:

Post a Comment