Wednesday, 8 November 2017

गॉसिपिंग...

गॉसिपिंग... 
एखाद्या व्यक्तीच्या विषयी संबंधित असलेल्या गोष्टीची पूर्ण शहनिशा न करता त्यावर गप्पा करण म्हणजेच गॉसिपिंग. फेसबुक ने जस लोकांना एकत्र आणल तस त्यांच्या वैयक्तिक जिवनात ढवळाढवळ करण्याची संधी हि दिली. काहींनी स्वतःहून तर काहींनी आपला हक्क समजून ह्याची दुकान जागोजागी उघडली. ग्रुप हा लोकांचा समूह असताना तिथे घडलेल्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी च्याट चा ऑप्शन म्हणजे हातात कोलीत. मग ग्रुप वर घडलेल्या घटनेवर त्याने किंवा तिने काय मत दिल ह्याच्या चर्चा पडद्यामागे व्हायला लागल्या आणि गॉसिपिंग ची सुरवात झाली.
सोशल नेटवर्क ने जस लोकांना जवळ आणल तशी नवीन नाती पण बनत गेली. किंबहुना भावनांना नात्यात बसवण्यात फेसबुक कुठेच मागे राहील नाही. अगदी आई- वडील ते ताई, माई आक्का पर्यंत आणि मैत्र मैत्रिणी पासून प्रियकर आणि प्रेयसी पर्यंत सगळेच नातेसंबंध निर्माण होत गेले. आपल्या ह्या पसाऱ्यात सगळ्यांना चांगले अनुभव आले अस नाही. किंवा हि नाती काळाच्या कसोटीवर टिकून राहिली असहि झाल नाही. मग काय त्या नात्यात असताना विश्वासाने मोकळ्या केलेल्या भावनांचा बाजार मांडायला सुरवात झाली.
गॉसिप आता फक्त दोन तीन व्यक्तींपुरती मर्यादित न रहाता आता त्याचा पसारा वाढत गेला. व्हास्त अप च्या येण्याने तर अगदी दुसर लपून बोलण्याच माध्यम आपल्याला उपलब्ध करून दिल. फेसबुक च्या ग्रुप पासून सुरु झालेला हा प्रवास एकमेकांच्या खाजगी जिवनात शिरकाव बिनदिक्कतपणे करू लागला. आपण ह्यात काही चुकीच करतो आहोत ह्याच भान पण काही लोकांना राहील नाही. चोरी करताना पण चोरांचे काही एथिक्स असतात. नात्यात पण काही एथिक्स असतात ते आपण पाळायचे असतात आणि ते पाळता येत नसतील तर आपली प्रगल्भता हि शब्दांपुरती मर्यादित राहते अस असताना काहींनी बिनदिक्कतपणे कोणीतरी विश्वासाने सांगितलेल्या गोष्टींचा बाजार आणि गॉसिप ह्याची दुकान सुरु केली. हे सगळ करताना आपण कोणाच आयुष्य दावणीला बांधतो आहोत. ह्याच सोयरसुतक पण त्यांना नव्हत.
गॉसिप आता टार्गेट साठी वापरल जाऊ लागल. कोणाला तरी धडा शिकवायचा तर त्याच्या किंवा तिच्या बद्दल इतक गॉसिप करायचं कि त्यांनी स्वतःहून एकतर आपल आकाउंट बंद तरी करायचं किंवा सगळीकडे त्याच्या किंवा तिच्या बद्दल बोलून कोणाच्याही व्यक्तिमत्वाच सर्टिफिकेट दयायचे सगळ स्वामित्व आपल्याकडे आहे असाच आभास निर्माण करायचा. ह्या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीला किती मानसिक त्रासातून जाव लागेल ह्याबद्दल आपण निदान अनभिज्ञ तरी राहायचं किंवा दाखवायचं तरी. मग सॉरी बोलून वेळ मारून तरी न्यायची किंवा गिरे तो भी टांग उपर करत आपला कार्यक्रम पुढे सुरु ठेवायचा.
कोणीही व्यक्ती आपल्या पर्सनल आयुष्यात कोणाच्याही प्रेमात असेल, रिलेशनशिप मध्ये असेल किंवा अजून कोणत्या लेवल वर जोडलेली असेल तर त्याचा आपल्याशी काय संबंध? जोवर ती व्यक्ती स्वतःहून आपल्याकडे येत नाही किंवा त्याचा स्वीकार करत नाही तर आपण सगळीकडे जाऊन आपल्याला नक्की काही माहित नसताना त्याचा बोभाटा करण किती योग्य? कारण अश्या वेळी त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक लोकांची जबाबदारी असू शकते. आयुष्याच्या त्या वळणावर अनेक घरातील, कुटुंबातील तसेच प्रोफेशनल आयुष्यातील व्यक्ती असताना आपल्या गॉसिपमुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती गोंधळ उडत असेल ह्याची पुसटशी कल्पना तरी आपण गॉसिप करताना करतो का? ह्या गोष्टी एखाद्याच आयुष्य उधळावून लावत असताना आपण त्याबद्दल किती विचार करतो?
कोणीतरी सांगितलं म्हणून आपण लगेच समोरच्याला त्याच चष्म्यातून बघायला लागतो. बघताना एक मिनिट पण विचार करत नाही कि सांगणारा आणि ज्याच्या बद्दल आपल्याला सांगितलं त्याच्या बद्दल आपण बोलणारे कोण? ऐकून आपण सावध व्हावं हा हेतू असला तरी खरच आपल्याला असा अनुभव आलेला नसताना आपण समोरच्या बद्दल ग्रह करून मोकळ होतच कि. काय मिळते ह्या सगळ्यातून? नक्की कोणता बदला? आणि नक्की कोणत सुख मिळवत आहोत ह्यातून? कोणाच तरी आयुष्य दावणीला बांधून त्यातून मिळणाऱ्या सुखाने आपण खरच काही आनंदी होत का?
गॉसिप करून हाताशी काही लागत नाही. लागते ते फक्त आणि फक्त कोणाच तरी आयुष्य उध्वस्थ होण. खरच एखादी व्यक्ती आसयुयेतून काही करत असेल तर आपल्या व्यक्तीला सांगणे त्याला किंवा तिला सुरक्षित करणे नक्कीच चांगले. पण कोणीतरी काही तरी सांगितलं म्हणून त्यावर विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीबद्दल अजून ४ लोकांकडे आपल्याला खात्री नसताना काहीही सांगणे म्हणजे आपण पण ह्या सगळ्या साखळीचा भाग होण. गॉसिप एखाद्याच आयुष्य उध्वस्थ करू शकते. आज ती व्यक्ती असेल उद्या तुम्ही असू शकाल तेव्हा एक सेकंद आपल्याला तिकडे ठेवून विचार करा. कोणाच कोणाशी काय नात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जोवर गोष्टी आपल्यासोबत होत नाही किंवा समोरचा तस वागत नाही तोवर एखाद्याला कोणाच तरी ऐकून साच्यात बसवण हे प्रगल्भपणाच लक्षण नव्हे.
कोणाबद्दल गॉसिप करताना आपल्या हि लक्षात असू द्या. हीच वेळ जर आपल्यावर आली किंवा कोणी आपल्याबद्दल अस कोणी बोलल तर आपल्याला काय वाटेल ह्याचा विचार करून आपण पुढे गेलो तर कदाचित आपण नक्की काय करायचं हे आपल्याला समजेल. गॉसिप ने कोणाच चांगल नक्कीच होत नाही. पण वाईट नक्कीच होत. त्यात भाग घेऊन आपण त्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावतो ह्याची जाणीव आपल्याला असायला हवी. बाकी आपल कर्मसंचित ज्याच त्याने कस भरायचं हे पण ज्याच त्याने ठरवायचं.

No comments:

Post a Comment