Wednesday, 8 November 2017

व्यावहारिक मैत्री...

व्यावहारिक मैत्री... 
मैत्री एक सुंदर नात पण ते टिकवण तितकच अवघड असते. विशेषतः त्यात व्यवहार आला कि अशी नाती किती पोकळ असतात ते प्रकर्षाने दिसून येते. अडचणीच्या काळी मदत करणारा आपला खरा मित्र-मैत्रीण जेव्हा दिलेल्या मदतीची आठवण सतत करून देऊन हक्क गाजवतात तेव्हा हेच मदतीचे हात नकोसे वाटू लागतात. खरे तर केलेली मदत हि उजव्या हाताची डाव्या हाताला कळू नये अस असताना त्या मदतीसाठी आपल्या स्वाभिमानाला दुखावणारे असे व्यावहारिक मित्र – मैत्रीण अनेक असतात.
आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण हतबल असतो. भावनिक, शारीरिक, आर्थिक दृष्ट्या. मदतीची अपेक्षा ज्यांच्याकडून करावी असे नातेवाईक पण अश्या वेळी बाजूला पळतात. मग कोण आधार देतो ते आपले मित्र- मैत्रिणी. पण ह्या आधाराची किंमत जर त्यांनी लावली तर होणारा त्रास आणि दुखावला जाणारा आपला स्वाभिमान ह्याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते. पैसे देऊन आपण व्यक्तीचा स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही ह्याची जाणीव मैत्री मध्ये हवीच. एकतर मैत्रीत व्यवहार नकोच आणि केलाच तर आपल्या शब्दाला आपण जागायला हवे.
आपण पैसे दिले म्हणून त्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीवर आपला हक्क मानणारे व्यवहारी मित्र मैत्रीण अनेक असतात. आपण मदत केली म्हणून त्या पुढच्या प्रत्येक कृती आपल्याला विचारून, सांगून करावी अश्या अविर्भावात नकळत ते असतात. तस केल नाही तर मग त्यांना दुखावल जात त्याच्या इगो ला धक्का बसतो आणि काही परिस्थती समजून न घेता आपल्या मदतीची जाणीव समोरच्याला करून देतात. मदत हि नेहमीच निस्वार्थी असायला हवी पण उपकारांची जोडवी त्याला असे मित्र लावतातच.
मैत्रीतला व्यवहार पण मैत्री सारखा निखळ हवा. आपण समोरच्याला मदत केली म्हणून आपण त्याला विकत घेत नाही न तो आपला गुलाम होतो. पण हे कळण्याइतपत जर मैत्रीची प्रगल्भता नसेल तर अशी मैत्री काय कामाची? ज्यात मैत्री हि व्यवहारात तोलली जाते. अडचणीच्या वेळेस खरे मित्र मैत्रिणी दिसतात अस म्हणतात. पण त्या खऱ्या मैत्री मध्येहि व्यवहार आला कि वेगळीच नाती आपल्या समोर येतात. आपले कधी काळी घनिष्ठ नाते असणारे ते सर्वच अचानक सूर बदलून जेव्हा बोलतात तेव्हा नक्की हेच का ज्यांना आपल मानत होतो असा प्रश्न मनात पडतो.
मित्र - मैत्रिणी हे प्रत्येकाच्या आयुष्याच अविभाज्य अंग आहे. ते कोणाला नाहीत असा माणूस शोधून मिळणार नाही. आपणही कोणाचे तरी मित्र – मैत्रीण असतोच. मैत्रीच छान नात निभावून नेता येण हि दोन्ही बाजूंची परिपक्वता आहे. पण मैत्रीच्या नात्याचा आधार घेऊन कोणाच्या तरी स्वामित्वावर, स्वाभिमानावर हक्क गाजवण हे तकलादू मैत्रीच लक्षण आहे. मैत्रीतील व्यवहार किंवा व्यवहारातील मैत्री जपताना त्यातून व्यवहार बाजूला काढता यायला हवा. आपण कोणत्याही टोकाला असलो तरी व्यवहाराचा मैत्रीवर परिणाम म्हणजे आपली अपरिपक्वता. आपण व्यवहारा बद्दल बोलताना समोरच्याचा मनाचा विचार आपण करायला हवा. आपल्या बोलण्याने आपण नकळत कोणाच्या स्वाभिमानाला तर ठेच नाही न पोहचवत ह्याची काळजी घ्यायलाच हवी.
मैत्री खूप सुंदर नात आहे. एकमेकांच्या विश्वासावर ते उभ आहे. त्या विश्वासाच्या जोरावर तर आपण मैत्रीत व्यवहार करत असू तर त्या विश्वासाला एकदा संधी द्यायला हवी. नुसत्या गैरसमजातून अथवा उपकार केलाच्या भावनेतून समोरच्याला वागवणार असू तर अश्या मैत्रीत व्यवहार न आणलेला बरा. व्यवहार केला तरी तो नियम घालून करावा म्हणजे उगाच कोणाच्याही विश्वासाचा, भावनांचा चुराडा होत नाही. व्यवहारातली मैत्री म्हणजे सापाशी असलेली मैत्री. कधी फुत्कारेल ते सांगता येणार नाही. म्हणून एकतर मैत्रीत व्यवहार करूच नये आणि केलाच तर प्रत्येक पावलावर काळजी घ्यावी. काही चुका केल्या तर निदान केलेल्या मदतीचा बाजार मांडून मैत्रीच्या नात्याला कलंक तरी नक्कीच लावू नये.

No comments:

Post a Comment