'आयफोन' बस नाम ही काफी है!...
तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं... असंच काहीसं 'आयफोन'च्या बाबतीत म्हणता येईल. त्याच्या प्रत्येक आवृत्तीला रांगा लागतात. त्याचं रूप सगळ्यांना आपल्या प्रेमात पाडते. कितीही महाग असो, अमेरिकेत असो वा भारतात असो, आयफोन आपल्याजवळ असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मीही त्यातून सुटलो नाही. २०१० साली अमेरिकेत कॅलिफोर्नियाला असताना जेव्हा आयफोन ४ घेतला तेव्हासुद्धा त्याचं जवळ असणं म्हणजे एक वेगळं समाधान देऊन जात होतं.एखादी वस्तू आपल्या मनावर गारुड कशी करते, हे दाखवायचं असेल तर आयफोनसारखं उदाहरण शोधून सापडणार नाही. २९ जून २००७, या दिवशी आयफोनचं आगमन जगाच्या पाठीवर झालं. बघता बघता त्याने जगातील एक एक बाजारपेठ अशी काबीज केली की, आजवर १ बिलियनपेक्षा आयफोन जगभरातील लोकांच्या हातात आहेत.
एप्रिल २००३ चा तो काळ... स्टीव जॉब्स या अॅपलच्या निर्माताच्या डोक्यात काही वेगळं घोळत होतं. काळाच्या पुढे विचार करणारे जे क्रांतिकारी असतात, त्यातलेच एक स्टीव जॉब्स होते. तेव्हा भरपूर नफा देणाऱ्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या बाजारपेठेत पुढे तितकासा वाव नसेल हे स्टीवच्या मनात घोळत होतं. पुढचा काळ हा मोबाईल क्रांतीचा असणार, हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. मोबाईल फोनच्या सेवेत मिसळून जाईल, असं अॅप्लिकेशन त्यांना हवं होतं. मोटोरोलासोबत त्यांनी आपल्या आय ट्युन्सला जोडत ७ सप्टेंबर २००५ ला हा ROKR E1 मोबाईल फोन ज्यात आय ट्युन्स होतं त्याचं लाँचिंग केलं. पण, जॉब्स मनातून कुठेतरी समाधानी नव्हते. म्हणूनच शेवटी अॅपलने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय एका क्रांतिकारी दिवसाची सुुरुवात होता. या दिवसांपासून अॅपलने आयफोन या नवीन तंत्रज्ञानावर काम करायला सुुरुवात केली.
९ जानेवारी २००७ ला स्टीव जॉब्स यांनी आयफोन बाजारात लवकरच दाखल होईल, अशी घोषणा केली. त्याचवर्षी जून महिन्यात आयफोन बाजारात दाखल झाला. बाजारात दाखल होताच गिऱ्हाईकांची मनं काबीज करण्यात आयफोन यशस्वी ठरला. पुढल्या एका वर्षात ६.१ मिलियन आयफोन विकले गेले. यामुळे नोकिया आणि सॅमसंगनंतर अॅपल ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल कंपनी बनली. पुढील येणाऱ्या काळात आयफोनची जादू वाढत गेली. २०१२ पर्यंत आयफोन आणि सॅमसंग मोबाईल यांनी बाजारातील ९९% हिस्सा काबीज केला तर, १% एच.टी.सी.चा होता. बाकी सगळ्या कंपन्यांना नुकसान होऊ लागलं होतं. इतका तडाखा आयफोनचा होता. ५.३ बिलियन डॉलर्सचा नफा २०१० मध्ये कमावणारी अॅपल अवघ्या दोन वर्षांत १४.२ बिलियन डॉलर्सचा नफा कमावू लागली होती. यात सगळ्यात सिंहाचा वाटा होता तो, आयफोनचा!
आयफोनला वजन दिलं ते त्याच्या दिसण्यानं... त्याचं आतलं प्रगत तंत्रज्ञान, ऑपरेटिंग सिस्टिम आणि त्याही पलीकडे त्यात असणाऱ्या सेन्सर्सनीही त्यात भरच टाकली. प्रोक्सिमा सेन्सर, एक्स्ल्रोमीटर, मॅग्नेटोमिटर, जाय्रोस्कोपिक अशा अनेक विविध सेन्सर्समुळे अनेक गिऱ्हाईकांना आयफोनने आपलंसं केलं.इकडे लक्षात घ्यायला हवं की आयफोन अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थांपासून ते बिझनेस करणाऱ्या व्यक्तीपर्यंत, त्यांना हवं तसं सगळं देऊ शकत होता. हेच आयफोनच्या प्रसिद्धीचं प्रमुख कारण ठरलं. एकामागोमाग एक आयफोनच्या आवृत्त्या येत गेल्या, पण जनमानसांवरचं त्याचं वलय अजूनही तितकंच आहे.
अमेरिकेमध्ये आपली पालंमूळं रोवणाऱ्या आयफोनचं लक्ष आता जगातील सर्वांत मोठी मोबाईल बाजारपेठ असणाऱ्या भारताकडे गेलं नसतं तर नवलच! स्टीव जॉब्सनंतर टीम कुक यांनी भारताकडे लक्ष केंद्रीत केलं. गेल्या काही वर्षांतील त्यांच्या गाठीभेटी बघितल्या तर भारताचं महत्व किती अधोरेखित होतं आहे ते दिसून येतं. मेक इन इंडियासारख्या भारताच्या योजनेत अॅपलने स्वतःला सहभागी करून घेतलं यातच त्यांची काळापुढे बघण्याची दृष्टी दिसून येते.
या महिन्याच्या अखेरीस आयफोन ८ बाजारात दाखल होतो आहे. ६४,००० रुपये इतकी मोठी किंमत घेऊन बाजारात दाखल होणारा आयफोन ८ पुन्हा काय चमत्कार करतो हे बघण रंजक असेल. भारतासारख्या बाजारात चीनी मोबाईल कंपन्यांची रेलचेल असताना आयफोनचं एक वेगळं स्थान आजही कायम आहे. पूर्ण विश्व बाजारात आयफोन ८ काय धमाका करतो, यापेक्षा भारतीय त्याला किती आपलंसं करतात, यावर अॅपल आणि टीम कुक ह्यांचं लक्ष असणार आहे. कारण भारतासारख्या बाजारपेठेत जर आयफोन चीनी कंपन्यांना शह देऊ शकला तर, अॅपलची वाटचाल पुन्हा एकदा एका नव्या क्रांतीकडे होईल, यात शंका नाही.
No comments:
Post a Comment