Wednesday, 8 November 2017

एक नवीन क्रांती.. इंडियन स्पेस इंडस्ट्री...

एक नवीन क्रांती.. इंडियन स्पेस इंडस्ट्री...
१९ एप्रिल १९७५ चा तो दिवस भारतासाठी खूप महत्वाचा ठरला. कॉसमॉस ३ एम ह्या रॉकेट च्या साह्याने भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट सोव्हियत युनियन म्हणजेच रशिया च्या साह्याने प्रक्षेपित केला. गेल्या ४० वर्षात भारताने मागे वळून पहिले नाही. एकेकाळी रशिया ची मदत घेणारा भारत स्वतःचे उपग्रह स्वतःच प्रक्षेपित करू लागला. इतक्यावर न थांबता भारताने दुसऱ्या राष्ट्रांचे उपग्रह आधी मदतीतून तर नंतर धंदेवाईक दृष्ट्रीने प्रक्षेपित करण्याची जबाबदारी उचलली. ह्या सगळ्या प्रवासात भारताने म्हणजेच इस्रो ने आपल्या शिरपेचात यशस्वितेचे अनेक तुरे रोवले. एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करत भारताने जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. ज्या रशियाच्या मदतीने भारताने आपला पहिला उपग्रह सोडला त्याच रशियाचा विक्रम ४ पटींनी मोडावा हा कोणता चमत्कार नाही तर भारतीय संशोधक, वैज्ञानिक, अभियंते ह्यांच्या मेहनितच ते फळ होत. १९७५ ते आज तब्बल १५० पेक्षा जास्त मोहिमा इस्रो ने यशस्वी केल्या आहेत.
उपग्रह निर्मिती आणि त्याच प्रक्षेपण ह्या दोन्ही क्षेत्रात आपला उत्कर्ष साधताना इस्रो ने आपला एक वेगळा ठसा जागतिक पातळीवर उमटवला. चंद्रावर पाणी शोधणारी पहिली मोहीम, मंगळावर पहिल्याच प्रयत्नात उपग्रह मंगळाच्या कक्षेत स्थापन करणारा जगातला पहिला देश ह्यामुळे जागतिक पातळीवर इस्रो तसेच भारताच स्थान कमालीच उंचावल. ह्या सगळ्याला गुणवत्ते बरोबर किफायीतशीर किमतींच एक वेगळ कोंदण भारताने अवकाश क्षेत्रात निर्माण केल. ह्या सगळ्यामुळे जगाच लक्ष भारताकडे वेधल गेल आहे. काही वर्षापूर्वी भारतात जी इन्फोर्मेशन टेक्नोलोजी जी क्रांती झाली. त्याच धर्तीवर भारतात आता अवकाश तंत्रज्ञान क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
गुणवत्ते सोबत कमी पैश्यात दर्जा राखणारी स्पेस एजन्सी म्हणून इस्रो च स्थान उंचावलेल असताना कामाचा व्याप प्रचंड वाढत जातो आहे. एकेकाळी वर्षाला एखाद दुसर प्रक्षेपण करणारी इस्रो ला आता २० पेक्षा जास्ती उड्डाणाची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उपग्रह निर्मिती तसेच रॉकेट निर्माण त्यासोबत त्याच प्रक्षेपण ह्या सगळ्याच नियोजन इस्रोला स्वबळावर करण जड जाते आहे. म्हणूनच इस्रो ने आपल तंत्रज्ञान हे भारतातील उद्योगांसाठी खुल केल आहे. आधी हे उद्योग समूह इस्रो ला वेगवेगळे भाग बनवून द्यायचे पण आता पूर्ण उपग्रह प्रणाली त्याच निर्माण करण्याची जबाबदारी इस्रो ने ह्या उद्योगांकडे देण्याच ठरवलं आहे. इस्रो भारतासाठी कम्युनिकेशन, रिमोट सेन्सिंग, नेव्हिगेशन, वैज्ञानिक अश्या चार स्वरूपाचे उपग्रह बनवते. अश्या सगळ्या श्रेणीतील उपग्रह निर्मितीसाठी इस्रो ने आपले दरवाजे खुले केले आहेत.
१००० किलो पासून ते ४००० किलो पर्यंत वजन असणारे हे उपग्रह प्रचंड किंमतीचे असतात. एक २००० किलो वजनाचा उपग्रह बनवायला इस्रो ला २०० कोटी रुपयांचा खर्च येतो. म्हणजे वर्षाला १८-२० उपग्रह निर्मिती जर भारतातील उद्योगांनी जरी बनवले तर किती कोटी रुपयांची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. हे फक्त झाल इस्रोसाठी ह्यात जर परदेशी कंपन्या विचारात घेतल्या तर हा आकडा किती मोठा होईल. भारतातील उपग्रह निर्मिती चा खर्च हा जागतिक पातळीवर सर्वात कमी आहे. जे आय.टी. च्या बाबतीत झाल ते आता अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत होते आहे. ३०० बिलियन अमेरिकन डॉलर इतक्या प्रचंड किमतीची बाजारपेठ भारताकडे सरकण्याची पूर्ण शक्यता आहे. स्वस्त, मस्त आणि उत्कृष्ठ अश्या तिन्ही पातळ्यांवर आपण आपला उत्कर्ष केलेला आहे. इस्रो च्या तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यामुळे ह्या जटील तंत्रज्ञांनावर प्रभुत्व भारतीय कंपन्यांना गाजवता येणार आहे. ह्या सगळ्यामुळे भारतात ह्या क्षेत्रात प्रचंड रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
ह्याच पाहिलं पाउल म्हणजे श्रीगणेशा आज होत आहे. आज भारतात पहिल्यांदा इस्रो शिवाय एका प्रायवेट इंडस्ट्री ने बनवलेला उपग्रह प्रक्षेपित होतो आहे. आय.आर.एन.एस.एस.- १ एच ह्या उपग्रह निर्मितीतील २५% काम हे अल्फा डिझाईन टेक्नोलोजी ने केलेल आहे. ह्या निर्मिती ने प्रेरित होऊन इस्रो ने पुढील ३ वर्षासाठी वर्षाला १८ ह्या वेगाने उपग्रह निर्मितीसाठी भारतातल्या अनेक प्रायवेट कंपन्या, स्टार्ट-अप ना निमंत्रित केल आहे. हि खूप मोठी संधी, बाजारपेठ भारतात उपलब्ध झाली आहे ती इस्रोमुळे. इस्रोतील वैज्ञानिक, अभियंते, संशोधक ह्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा भारत एका नव्या क्रांती च्या उंबरठ्यावर उभा आहे. हरित क्रांती जमिनीवर आणि भारतात, माहिती-तंत्रज्ञान क्रांती कॉम्प्यूटर आणि जगात घडवणारा त्याची चव घेणारा भारत आता अवकाश क्रांती आणि ती हि अवकाशात घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. आपण त्याचे साक्षीदार आहोत हे आपल भाग्य आहे.
आज गणरायाच्या साक्षीने संध्याकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी इस्रो चा वर्कहॉर्स पी.एस.एल.व्ही. एक्स एल रॉकेट आपल्या ४१ व्या उड्डाणात ( ह्या रॉकेट ने सलग ४० उड्डाण यशस्वी केली आहेत ) १४२५ किलोग्राम वजनाचा आय.आर.एन.एस.एस.-१ एच उपग्रह घेऊन त्याला त्याच्या कक्षेत स्थापन करेल तेव्हा भारताने एका नवीन क्रांतीचा श्रीगणेशा केला असेल. इंडियन स्पेस इंडस्ट्री हे नाव येत्या काळात जगात तसेच भारतीयांच्या ओठांवर रुळणार आहे. एका नवीन क्रांतीसाठी भारताला सज्ज करणाऱ्या इस्रो ला मानाचा सलाम तसेच आजच्या उड्डाणासाठी शुभेच्छा.

No comments:

Post a Comment