Wednesday 8 November 2017

सहानभुतीच्या निमित्ताने...

सहानभुतीच्या निमित्ताने...
आपल्याकडे लोकांच लक्ष जाव म्हणून आपण नेहमीच काही न काही वेगळ करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अगदी कपड्याच्या रंगसंगती पासून ते ओठांवर लावणाऱ्या लिपस्टीप पर्यंत. केसांच्या रचनेपासून ते नखांच्या पॉलीश पर्यंत. आभासी पडद्यापाठीमागे काही दिसत नसताना हे सर्व लक्ष वेधण्याचे उपाय लागू पडत नाहीत. एकतर तुमच्याकडे गुणवत्ता हवी विचारांची, ते मांडण्याची, ते पोचवण्याची ह्यापेकी काही एक जमत नसेल तर मग कला हवी सहानभूती जमा करण्याची.
माझ्या आयुष्यात किती अडचणी आहेत ह्याचा डोंगर आपल्याला रचता यायला हवा किंवा तस नसेल तरी ते दाखवता यायला हव. त्यावर मात कशी केली किंवा कोणी आपला फायदा कसा घेतला हे सांगत त्यावर दुखांचे इमले तरी चढवता यायला हवेत. स्त्रियांच्या बाबतीत तर हे सहानभुतीच अस्त्र थोड अधिक सोप्प आहे. डोळ्यातून थेंब पडत नाही तोच ते पुसणारे आणि न मागता खांदा देणारे तयारच असतात. पुरुषांच्या बाबतीत मात्र एकतर आर्थिक किंवा व्यवहारावर सहानभूती जमा करता यायला हवी.
आयुष्यात कोणाला सगळ सहज मिळते? प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतेच. ते कोणाला सुटलेल नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी आर्थिक, कौटुंबिक कलह नसतात? पण ते सांभाळून ते निस्तारून प्रत्येकजण आयुष्याच्या रस्त्यावर वाटचाल करत असतो. अर्थात काही वेळा ह्या गोष्टी डोंगऱ्या एवढ्या मोठ्या असतात, अनपेक्षित असतात. मन तोडणाऱ्या तर आयुष्य उध्वस्थ करणाऱ्या हि असतात. पण अस कोणाच्या आयुष्यात किती वेळा होते? म्हणजे अनेकदा होत असेल तर त्याला ती व्यक्ती हि जबाबदार असू शकते? ह्याचा विचार कोणीच करत नाही. पण काही जणांना ह्या दुःखाचा बाजार मांडायची सवयच असते. कारण त्या नंतर मिळणाऱ्या सहानभूती वर त्यांच्या स्व ला आनंद मिळत असतो.
सहानभूती दाखवून आपल दुःख जगासमोर मांडण्याची आता स्पर्धाच सुरु झाली आहे. मी किती कर्जात, मी किती आजारात किंवा मी सध्या हॉस्पिटलमध्ये भरती. असे एक न अनेक निमित्त काढून पोस्ट टाकण्याची संधी काहीजण शोधत असतात. काहीवेळा नक्कीच वर उल्लेख केलेल्या गोष्टी खूप खऱ्याखुऱ्या असतात आणि आयुष्याच्या त्या वेळेस खरेच सहानभूती ची गरज हि भासते. पण म्हणतात न सुक्या सोबत ओलही जळते तस कोण खर आणि कोण खोट हे समजून घ्यायला वेळ आणि मानसिकता किती जणांची असते.
आभासी विश्वातली सहानभूती हि आभासी असते हे सत्य माहित असून सुद्धा आपल्या माणसांना बाजूला टाकून आपण आभासी विश्वात आधार शोधतो. काहीवेळा आयुष्यातील कटू अनुभवांमुळे ती गरज हि बनत असेल. पण सहानभूतीचा बाजार मांडण कितपत योग्य? आपली दुःख हि आपल्यालाच झेलावी लागतात. आपले गुंते आपल्याला सोडवायला लागतात मग आभासी दुनियेत मिळणाऱ्या सहानभूतीने नक्की आपण काय साधतो ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. जर ते फक्त लाईक आणि पोस्ट ला मिळणाऱ्या प्रसिद्धी साठी असेल तर भावनांचा असा खेळ मांडणे कितपत योग्य? तस नसेल तर त्या वेळी आपल्या माणसांची सहानभूती सोडून आभासी दुनियेतल्या लोकांकडून आभासी सहानभूती मिळवण कितपत योग्य?
काहीवेळा आपण एकटे पडतो तेव्हा खरच आपल्याला माणसांची गरज लागते. त्यांच्या नुसत्या शब्दांची लागते तर कधी कोणीतरी ऐकून घेणार हव असते. पण पोस्ट टाकून पूर्ण जगाकडे त्याची विनवणी करण कितपत योग्य आहे ह्याचा ज्याचा त्याने विचार करावाच. आपले आभासी मित्र मैत्रीण ह्यांना आपण अनेक वेगवेगळ्या मार्गाने सांगूच शकतो. ज्याला आपण कधी बघितलं नाही, बोललो नाही, माहित नाही अश्या व्यक्तीकडून सहानभुतीची अपेक्षा कितपत योग्य आहे. सहानभुतीच्या अनेक पोस्ट बघून हाच चिचार मनात आला कि सहानभुतीच्या निमित्ताने का होईना आपल्याला आपल्या अंतरंगात डोकावून बघण्याची खूप गरज आहे.

No comments:

Post a Comment