भविष्यकाळात प्रवास करणं शक्य आहे!...
काळ आणि वेळ कोणाला चुकलेली नाही, असं आपण नेहमी म्हणतो. घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगणारे आपण वेळेचं महत्व जाणतोच. पण हीच वेळ किती सापेक्ष असू शकते हे आपल्याला माहीतही नाही. २० व्या शतकातील ख्यातनाम शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनने स्पेशल रिलेटिव्हिटिचा सिद्धांत मांडला. हे समजून घ्यायला साधं उदाहरण बघितलं, तर आपण चक्रावून जाऊ.
बाईकवरून वेगाने जाणारे आपण आपला वेग बघतो तो स्थिर असलेल्या वस्तूंपासून म्हणजे झाड, बिल्डींग किंवा रस्ता. या सर्व गोष्टींच्या सापेक्ष आपण वेगात असतो. पण खरंच या वस्तू स्थिर आहेत का? आपली पृथ्वी विषुववृत्ताजवळ जवळपास १६०० किमी /तास या वेगाने परिवलन करते. मग या गोष्टी स्थिर कशा? मग सूर्याला आपण स्थिर मानलं, तर असं खरंच आहे का? आपला सूर्य आणि पूर्ण सौरमाला तब्बल ८ लाख २८ हजार किमी/तास वेगाने आपल्या आकाशगंगेत म्हणजेच मिल्की वे मध्ये भ्रमण करत आहेत. म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीला एक प्रदक्षिणा पृथ्वीला घालायला फक्त २ मिनिटे ५४ सेकंद पुरेशी आहेत, इतका हा वेग प्रचंड आहे. मग आपण जो वेग, काळ मोजतो तो किती सापेक्ष आहे?
मग या जगात स्थिर काय आहे कि ज्याला आपण मानून गती आणि वेळेची तुलना करू? आईनस्टाईनने सांगितलं प्रकाश! प्रकाशाचा वेग म्हणजे ३ लाख किमी/सेकंद हा स्थिर आहे. म्हणजे समजा तुम्ही तुमची बाईक प्रचंड वेगाने चालवली, कित्येक हजार किमी/तास वेगाने जरी चालवली, तरी त्याच्या हेडलाईटमधून निघणारा प्रकाश हा ३ लाख किमी/सेकंद याच वेगाने प्रवास करतो. तुमच्या बाईकचा स्पीड १० किमी/तास असो अथवा १०,००० किमी/तास. तुमच्या बाईकचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक होत नाही. प्रकाश सगळीकडे त्याच्या ठरलेल्या वेगानेच प्रवास करतो.
आईनस्टाईनने अजून एक गोष्ट आपल्या सिद्धांताने सिद्ध केली, ती म्हणजे जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या वेगाने प्रवास करता, तेव्हा वेळ/काळ संथ होतो. हे तुम्हाला जाणवेल, जेव्हा तुम्ही परत तिकडेच याल जिथून प्रवास सुरु केला होता.
एक उदाहरण घेऊ....
तुम्ही १५ वर्षांचे असताना समजा प्रकाशाच्या वेगाने म्हणजे जवळपास ९९.५% पट वेगाने अवकाशात प्रवास सुरु केला आणि आपल्या आयुष्याचे ५ वाढदिवस अवकाशात साजरे करून पुन्हा पृथ्वीवर आलात तर तुमचं वय फक्त २० वर्षांचं असेल, पण जे पृथ्वीवर तुमचे मित्र होते, त्यांचं वय असेल ६५ वर्ष. कारण वेळ तुमच्यासाठी संथ झाली. म्हणून, तुम्ही जे ५ वर्षाचं आयुष्य अनुभवलं ते पृथ्वीवरच्या मित्रांनी ५० वर्षात अनुभवलं. समजा, तुम्ही २०१० साली प्रवास सुरु केला, तर तुम्हाला २०६० मध्ये पोचायला फक्त ५ वर्ष लागली. यालाच म्हणतात Time Travel.
आईनस्टाईनची प्रतिभा इतकी उच्च होती, कि त्याने अजून एक सिद्धांत मांडला. तो म्हणजे जनरल रिलेटिव्हिटी. हा सिद्धांत असं सांगतो कि जिथे गुरुत्वाकर्षण असते, तिथेही वेळ संथ होते. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर पण वेळ संथ होते, जेव्हा आपण तिची तुलना गुरुत्वाकर्षण नसलेल्या ठिकाणांशी करू. मग ज्या कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणापुढे प्रकाशही झुकतो, तिथे काळ-वेळ प्रचंड संथ असतील. विज्ञानाने हे सिद्ध झालं आहे, कि असे वर्महोल किंवा कृष्णविवरातून Time Travel हे शक्य आहे.
काही वैज्ञानिकांनी याच सिद्धांताचा वापर करून अशी एखादी मशीन कि जी या क्षेत्रातून प्रवास करू शकेल, या दृष्टीने संशोधन सुरु केलं आहे. सध्यातरी कागदावरच शक्य असलेला प्रवास वास्तवात शक्य नाही. ज्या गोष्टी खऱ्या आहेत, त्यांना कधी असा प्रवास करणं शक्य होईल? याबाबत खात्री देता येत नाही. पण हे शक्य आहे. जर असं तंत्रज्ञान आपण बनवू शकलो तर! आपण १०,००० वर्षांचा भविष्यातील प्रवास एका वर्षात करू शकू! विज्ञानाने हे सिद्ध केलं कि आपण भविष्यात जाऊ शकू, पण भूतकाळात जाण्यासाठी असं कोणतं Time Travel विज्ञानाने सिद्ध केलेलं नाही.
मानवनिर्मित सगळ्यात दूर गेलेली वस्तू म्हणजे व्होयेजर १ हे यान ६१,००० किमी/तास वेगाने पृथ्वीपासून १८.८ बिलियन किलोमीटर वर गेलेलं आहे. हे अंतर आपल्याला खूप वाटलं, तरी अवकाशाच्या समुद्रातल्या पाण्याच्या थेंबाएवढंही नाही. अजून खूप पल्ला आपल्याला गाठायचा आहे. जर त्या टोकाला आपल्याला जायचं असेल, तर Time travel शिवाय पर्याय नाही. २० व्या शतकात आईन्स्टाईनने माणसाचं Time Travel चं स्वप्न कागदावर विज्ञानाच्या सहाय्याने सिद्ध केलं. पण त्याला सत्यात उतरवायला आपल्याला काही शतकांची वाट बघावी लागणार हे नक्की. पण Time Travel उद्याचं सत्य आहे, यात शंका नाही!
No comments:
Post a Comment