आवड आणि स्वप्न...
पहिल्या श्वासापासून आपला प्रवास सुरु झाला कि आपण आयुष्यात अनेक स्वप्न बघू लागतो. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर कुठेतरी आपल्याला जाणवते कि नक्की आपली आवड कशात आहे? आपल्या स्वप्नांना आपल ध्येय बनवताना आपण आपली आवड बाजूला ठेवतो. आपली आवड आणि आपली स्वप्न ह्यातल्या चुकीमुळे आपली स्वप्न कधी आपली आवड बनतात तर आपली आवड आपल स्वप्न राहून जाते. नक्की काय मिळाल काय निसटल हे लक्षात येण्यात इतका वेळ निघून जातो कि मग वाटते आता कुठे? आता आपल वय राहील का? आता कस शक्य आहे?
आपल शिक्षण, करियर, लग्न, संसार आणि मुल- बाळ ह्यात आयुष्याची वर्ष कशी पटकन निघून जातात कळत नाही. आत्ता कुठे स्वप्न बघत सुरु झालेलं आयुष्य बघता बघता मागे पडते. ज्यांच्यासाठी सगळ बाजूला ठेवल ती फुलपाखर कोशातून निघून कधी उडून जातात कळत पण नाही. अश्या वेळेस स्वप्नातलं खूप काही असत आपल्या आजूबाजूला अगदी पैश्यापासून ते नात्यांपर्यंत पण तरीपण कुठेतरी आपल्याला आवडणार वाटणार काहीतरी राहतेच. त्याचा मुहूर्त आयुष्याच्या स्वप्नांना पूर्ण करताना आपण पुढे पुढे ढकलत रहातो. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा शरीर साथ देते अस नाही. किंवा सगळ नीट असूनही आपल्याला मुहूर्त काढताच येत नाही.
आवडीला खरच मुहूर्ताची गरज असते का? जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते ती करायला, जोपासायला कसला आला आहे मुहूर्त, वयाची बंधन आणि कोण काय म्हणेल किंवा कोणाला काय वाटेल ह्याचा विचार? आपली स्वप्न आणि आपली आवड ह्यात एक मोठा फरक आहे. स्वप्न आपण अनुभवलेली नसतात तर आवड आपण जोपासलेली असते. म्हणजेच आवड कशात आहे हे कळायला एकदा तरी ती गोष्ट आपण अनुभवलेली असते. स्वप्न हि पूर्ण होतात अस नाही. कारण अनेक असू शकतात पैश्या पासून ते आपल्या क्षमतान पर्यंत. पण कोणतीही आवड हि अनुभवलेली असल्याने तिला पुन्हा अनुभवयाला तितकीशी अडचण नक्कीच नसते.
आवडीला मुहूर्त नसतो तो ह्याचसाठी. आपण बरेचदा स्वप्न आणि आपली आवड ह्यात गल्लत करतो. दोघांपासून लांबच रहातो. जेवण बनवण्यापासून ते त्याचा आस्वाद घेण्यापर्यंत, लिहिण्यापासून ते वाचनापर्यंत आपल्या आवडी असतात. पण अमुक एक पदार्थ बनवता येण किंवा अमुक एक पदार्थाचा आस्वाद घेता येण हे स्वप्न असू शकते. लिह्ण्यातून लेखक बनण किंवा आपल पुस्तक येण हे स्वप्न असू शकते किंवा आपल पुस्तक कोणीतरी वाचाव हे पण. ह्या दोन्ही मधला फरक खूप कमी जणांना कळतो. तो कळत नाही म्हणून आपण आवडीला स्वप्न बनवून फक्त मनात तिचे इमले बांधतो. तर स्वप्नांना आपली आवड मानून ती पूर्ण करण्यात पूर्ण आयुष्य वेचतो.
जेव्हा हि गल्लत होते तेव्हा तिकडे पोचून हि हाताशी ते एक समाधान लागत नाही. कारण सगळीच स्वप्न पूर्ण होत नाहीत तर सगळ्या आवडी स्वप्नवत नसतात. धावण्याची म्यारेथोन जिंकण हे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल पण धावण्याची, हेल्दी राहण्याची आपली आवड तर आपण नेहमीच जोपासू शकतो. जेव्हा आपण ती जोपासतो तेव्हा दररोज त्यातून मिळणार समाधान हे ती स्पर्धा जिंकण्यापेक्षा जास्ती आनंद देऊन जाते. स्वप्न आयुष्यात एकदा अनुभवता येतात. कारण एकदा स्वप्न सत्यात आली कि त्याचा अनुभव होतो. आवड आयुष्यभर आपल्या सोबत असते तिला आपण नेहमीच जोपासून शकतो. त्यासाठी वेळ काढू शकतो.
धकाधकीच्या आपल्या आयुष्यात ह्या दोन्ही गोष्टीना मुहूर्त मिळण तस कठीणच. पण दोघातला फरक लक्षात आला तर निसटणारे अनेक क्षण आपण वेचू शकतो. आपली आवड आणि आपली स्वप्न हि वेगळी करता यायला हवीत. म्हणजे नक्की आपल्याला काय हव आहे आणि आपण कशाच्या पाठी धावतो आहोत ह्याची जाणीव आपल्याला होईल. स्वप्न पूर्ण करताना आपल्या आवडीला तर बाजूला नाही न टाकत ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. सगळीच स्वप्न पूर्ण झाल्यावर आनंद मिळेलच अस नाही पण आपली आवड जोपासण्याचा आनंद आणि समाधान हे ठरलेल असते. अजूनही वेळ गेलेली नाही विचार करा नक्की आपण कशाच्या पाठी धावतो आहोत स्वप्नांच्या कि आपल्या आवडीच्या.
No comments:
Post a Comment